बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जून 2021 (16:21 IST)

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी

'डेल्टा प्लस' व्हेरियंटमुळे महाराष्ट्रात 21 रुग्णांपैकी 80 वर्षांचा एक रुग्ण ज्याला सहव्याधी होत्या, त्याचा दुर्दैवानं मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.
 
शुक्रवारी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट संक्रमित एका रुग्णाचा मृत्यू झाला. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात मृत्यूची ही पहिली घटना आहे. रत्नागिरीच्या संगमेश्वर भागात एका 80 वर्षीय व्यक्तीचा बळी गेल्याचे समजते. संक्रमित व्यक्तीला इतर आजारही होते.
 
महाराष्ट्र राज्यात या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून बाकीचे पेशंट स्थिर आहेत, बरेचसे पेशंट बरे होऊन घरीसुद्धा गेलेत. "त्यामुळे घाबरण्यासारखा विषय अजिबात नाहीये. कोणतेही निर्बंध लावण्याचं सध्या काही कारण नाही. सध्या कोव्हिडच्या अनुषांगिक वर्तणूक आपण पाळली, तर अडचणीचा कुठलाही विषय राहणार नाही" , असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
 
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (23 जून) झालेल्या बैठकीत डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यात निर्बंध लावावेत का, याबद्दल चर्चा झाली. तिसऱ्या लाटेबद्दल केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं बोलत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप अधिक संसर्ग असणाऱ्या जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यातही त्यांनी घाईघाईनं निर्बंध शिथिल करुन नका असं जिल्ह्याधिकाऱ्यांना सांगितलं. नव्या लाटेचा धोका लक्षात घेता सरकारनं अधिक निर्बंधांची तयारी सुरु केली आहे, असंही या सल्ल्याकडे पाहिलं जातं आहे.