रविशंकर लिंगुटला
ब्रिटनहून भारतात परतलेल्या अखिल एनामशेट्टी या तरुणावर हैदराबाद इथल्या गांधी हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) उपचार सुरू आहेत.
व्यवसायाने वकील असलेल्या अखिल यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
ब्रिटनहून भारतात येईपर्यंत अखिल यांनी सर्व खबरदारी घेत एका जबाबदार नागरिकाची भूमिका पार पाडली होती.
ब्रिटनहून परतल्यानंतर ते स्वतः हॉस्पिटलला गेले आणि कोरोना चाचणी करून घेतली. खरंतर त्यांना आजाराची कुठलीच लक्षणं नव्हती. तरीदेखील त्यांनी ही चाचणी केली.
मार्च महिन्यात भारतात परतल्यानतंर खबरदारी म्हणून ते कुटुंबीय किंवा मित्र कुणालाच भेटले नाहीत.
अखिल युनिवर्सिटी ऑफ एडिनबरामधून ह्युमन राईट्स विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.
बीबीसीशी बोलताना आपण चाचणी करण्याचा निर्णय का घेतला, विलगीकरण कक्षातलं वातावरण कसं आहेस, वैद्यकीय सुविधा कशा आहेत, याविषयीच्या स्वतःच्या अनुभवावर त्यांनी मनमोकळेपणाने बातचीत केली.
अखिल यांची कहाणी त्यांच्याच शब्दात...
ब्रिटन सरकारने सुरुवातीला पावलं उचलली नाहीत.
कोरोना विषाणुचा सामना करण्यासाठी ब्रिटनने सुरुवातीला 'हर्ड इम्युनिटी' म्हणजेच सामूहिक रोगप्रतिकार शक्तीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लोकांना संसर्ग होऊ दिला. जेणेकरून लोकांमध्ये या विषाणुविरोधात 'नॅचरल इम्युनिटी' म्हणजेच नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती उत्पन्न होईल.
क्लब, स्टेडियम, विद्यापीठं आणि गर्दीची ठिकाणं बंद केली नाही.
सरकारच्या या दृष्टिकोनावर बरीच टीका झाली. अखेर जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तेव्हा सरकारने लॉकडाऊनच्या दिशेने पावलं उचलायची सुरुवात केली.
एव्हाना युकेमध्ये रहायचं की भारतात परत जायचा, हे विचार आमच्या मनात घोळत होते.
त्याचदरम्यान भारत सरकारने 16 मार्च रोजी घोषणा केली की 18 मार्चपासून युके आणि युरोपातून येणाऱ्या फ्लाईट्सना भारतात उतरवणार नाही. त्यामुळे आम्ही सगळे अस्वस्थ झालो.
गडबडीतच परतीचं तिकीट केलं बुक
आम्ही तात्काळ तिकीट काढलं. माझी फ्लाईट 17 मार्चची होती. फ्लाईट लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून मुंबई मार्गे हैदराबादला जाणार होती.
मला संसर्ग झाला आहे की नाही, हे मला माहिती नव्हतं. मात्र, तरीदेखील मी काळजी घ्यायला सुरुवात केली.
तिकीट बुक करतानाच मी तेलंगणातल्या वारंगलमध्ये राहणाऱ्या माझ्या आई-वडिलांना कॉल करून सांगितलं की चाचणी केल्याशिवाय मी त्यांना भेटणार नाही.
मी त्यांना आधीच सांगितलं की तुम्ही मला घ्यायला हैदराबादला येऊ नका. मी माझ्या मुंबईतल्या मित्रांनाही विमानतळावर येऊ नका म्हणून सांगितलं.
मी कोव्हिड-19 विषयी बरंच वाचलं होतं आणि शक्य ती काळजी मी घेत होतो.
घरी नाही हॉटेलवर गेलो
मी 19 मार्चला सकाळी हैदराबादला पोचलो. माझा घसा जरा खवखवत होता. मी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या हेल्थ डेस्कवर गेलो.
मी त्यांना माझी ट्रॅव्हल हिस्ट्री सांगितली आणि मला जाणवत असलेली लक्षणंही सांगितली.
त्यांनी मला सांगितलं की मला क्वारेंटाईनमध्ये जाण्याची गरज नाही. तसंच सकाळी गांधी हॉस्पिटलला जाण्याच्या सूचनाही मला देण्यात आल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत मी एका हॉटेलवर थांबलो. तिथेही मी सगळी काळजी घेतली. रुम बॉयलादेखील माझ्या खोलीत येऊ दिलं नाही.
चाचणीचा अहवाल
मी चाचणी केली आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आले. माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह होते. ते बघून मला खूप आश्चर्य वाटलं.
मी आणि माझे आई-वडील सुशिक्षित आहोत आणि आम्हाला कोरोनाविषयी माहिती होती. त्यामुळे आम्ही घाबरलो नाही.
मला फारसा कसलाच त्रास नव्हता. फक्त श्वास घेताना थोडा त्रास जाणवायचा.
हॉस्पिटलमधील वातावरण
गांधी हॉस्पिटलमधल्या विलगीकरण कक्षातलं वातावरण घाबरवणारं नाही. इथे बरीच स्वच्छता आहे. माझ्या खोलीत चांगला उजेड येतो. हवाही खेळती आहे. त्यामुळे मी अॅक्टिव्ह राहू शकतो.
रोज बेडशीट आणि हजमट सूट बदलतात. आम्हाला बाटलीबंद पाणी, पॅक्ड फूड मिळतं.
सकाळच्या न्याहारीनंतर डॉक्टर तपासणीसाठी येतात.
कुटुंबीय आणि मित्रांची ओढ
मला माझ्या कुटुंबीयांची आणि मित्रांची आठवण येते. मी त्यांना मिस करतो. भारतात असूनही स्वतःच्या कुटुंबीयांनाच न भेटणं थोडं अवघड आहे. मात्र, आपण काहीच करू शकत नाही. मी मोबाईलद्वारे त्यांच्या संपर्कात आहे.
घबराट पसरवणे योग्य नाही
प्रसार माध्यमं या प्रकरणात थोडा बेजबाबदारपणा दाखवत आहेत, हे सांगताना मला अजिबात संकोच वाटत नाही. वास्तव सांगणं आणि जनजागृती करण्याऐवजी ते सनसनाटी बातम्या देत आहेत.
सोशल मीडियादेखील एक समस्या आहे. फेक न्यूज आणि अफवांचं पेव आलं आहे. लोकांनी केवळ प्रामाणिक माध्यमांवरच विश्वास ठेवायला हवा.
हॉस्पिटलमध्ये मला हेदेखील कळलं की काही रुग्ण तर परदेशातून परतल्यावर थेट घरी गेले, कुटुंबीयांसोबत वेळ घालवला आणि नंतर चाचणी केली. काही लोक तर सामूहिक कार्यक्रमांमध्येदेखील सहभागी झाले.
या दृष्टिकोनामुळे समाजात घबराट पसरली आहे आणि अधिकाऱ्यांना लोकांना शोधून शोधून त्यांना चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये आणावं लागतंय. जागरुकता आणि जबाबदार वर्तनाने या सगळ्यातून मार्ग काढता येतो.
थर्मल स्क्रिनिंग पुरेसं नाही
विमानतळांवर होणारं थर्मल स्क्रिनिंग पुरेसं नाही. अनेकांना वाटतं की स्क्रिनिंगमुळे विषाणूची माहिती मिळते. तसं नाहीय.
केवळ चाचणी करूनच संसर्ग आहे की नाही, हे कळू शकतं. अनेकदा रुग्णांमध्ये लक्षणं दिसतच नाहीत. माझ्या बाबतीतही असंच घडलं.
सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण चाचणी करायला हवी होती. संसर्ग नसेल तरच त्यांना देशात पाऊल ठेवायची परवानगी द्यायला हवी होती.
असं केलं असतं तर संसर्गाची साखळी सहज मोडता आली असती. लोकांनीही जबाबदारीने वागायला हवं.
संकोच बाळगू नका
तुम्हाला संसर्ग झाला तरी त्यात संकोच वाटावा, असं काही नाही.
संसर्गाची लक्षणं दिसत असेल तर सर्वोत्तम मार्ग हाच आहे की हॉस्पिटलमध्ये जा, चाचणी करा आणि लवकरात लवकर अॅडमिट व्हा.
असं केल्याने तुम्ही अनेकांचे प्राण वाचवू शकता. हे तुमचं स्वतःचं कुटुंब, शेजार-पाजार, समाज आणि संपूर्ण मानवतेसाठी उत्तम आहे.
तसंच लोकांनीही कोव्हिड-19 च्या रुग्णांना अपमानास्पद वागणूक देऊ नये. त्यांच्यासोबत भेदभाव करता कामा नये.
डिस्चार्ज
रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे, हे सांगण्यासाठी 48 तासात त्याच्या दोन चाचण्या निगेटिव्ह यायला हव्या. ही गोष्ट आपल्या हातात नाही.
तेलंगणामध्ये आतापर्यंत केवळ एकच रुग्ण बरा झाला आहे. मला वाटतं मीही लवकरच बरा होईल.
घरी रहा, सुरक्षित रहा. आपण यातून लवकरच बाहेर पडू.