मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 2 एप्रिल 2020 (12:31 IST)

तबलीगी जमात नेमकं काय काम करते?

भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार मंदावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 मार्चला पूर्ण देश बंद केला आहे, अर्थात लॉकडाऊन.
 
"देशात सध्या 1,637 कोरोना व्हायरसचे रुग्ण आहेत, आणि गेल्या 24 तासात हा आकडा 386 नी वाढला आहे. ही वाढ प्रामुख्याने तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांमुळे झाली आहे," असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी बुधवारी सांगितलं.
 
हेच तबलीगी जमात गेल्या दोन दिवसांपासून विविध चर्चांचं केंद्रस्थान बनलं आहे. देशभरातून हजारो लोक दिल्लीच्या निझामुद्दीन भागात एका धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र आले आणि नंतर आपापल्या गावी परतले.
 
आता त्यातले 24 लोक पॉझिटिव्ह आढळल्याने हे लोक देशभरात कोरोनाचा प्रसार करणारे 'सुपरस्प्रेडर' ठरतील, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली जात आहे.
 
पण तबलीगी जमात म्हणजे काय? इतक्या मोठ्या संख्येने लोक तिथं का जमा झाले? आणि आता त्यांच्यापासून पुढे आपल्याला काय धोका आहे?
 
नेमकं काय झालं?
दिल्लीच्या निजामुद्दीन भागात 15 ते 17 मार्च दरम्यान एक कार्यक्रम झाला. त्यात अनेक लोक सहभागी झाले होते. देशात कोरोनाच्या केसेस वाढत असतानाच अनेक लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
 
हे लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून आले होते आणि ते परत आपापल्या भागात गेले. त्यापैकी 1,830 जणांची ओळख पटली आहे, असं दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितलं आहे.
 
दिल्लीतील जमातचं हे मुख्यालय किंवा 'मरकज' आता पूर्णपणे रिकामं करून सील करण्यात आलं आहे. या ठिकाणी 2,361 जण होते, त्यापैकी 617 जणांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे आणि उरलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती शिसोदिया यांनी दिली.
 
 
या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या कोरोनाची लक्षणं काही लोकांमध्ये दिसत असतानाही त्यांची माहिती दिल्लीच्या तबलीगी जमातच्या आयोजकांनी प्रशासनाला दिली नाही, म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असं दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटलं.
 
तबलीगी जमात म्हणजे काय?
तबलीगी जमातचा अर्थ आहे की अशा लोकांचा समूह जो अल्लाह आणि दीनचा प्रचार-प्रसार करतो. इस्लामच्या प्राचीन परंपरांना मानणारा हा समूह आहे.
 
'मरकज'चा अर्थ आहे केंद्र आणि जमातचा अर्थ आहे समूह.
 
तबलीगी जमात ही एक धार्मिक संस्था आहे. 1926 सालापासून ही संस्था कार्यरत आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात या संस्थेचं मुख्यालय आहे. इस्लामचे अभ्यासक मौलाना मुहम्मद इलियास यांनी ही संस्था स्थापन केली होती.
 
तबलीगी जमातचा पहिली जाहीर कार्यक्रम 1941 मध्ये झाली होती. त्यावेळी अंदाजे 25,000 जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाचे माजी कुलगुरू जफर सरेशवाला हे अनेक वर्षांपासून तबलीगी जमातशी संबंधित आहेत. त्यांच्या मते ही मुसलमानांची जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. याची केंद्रं 140 देशात आहेत.
 
भारतातील सर्व मोठ्या शहरात या संस्थेची मरकज म्हणजेच केंद्रं आहेत. या केंद्रांमध्ये वर्षभर 'इज्तेमा' सुरू असतो, म्हणजेच लोक इथं येत-जात राहतात.
 
तबलीगी जमातचाच इज्तेमा दिल्लीतील निजामुद्दीन भागात आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम 15 ते 17 मार्च या दरम्यान पूर्वनियोजित होता, असं जमातचं म्हणणं आहे.
 
सहा कलमी कार्यक्रम -
तबलीगीच्या धर्मप्रचाराचे सहा कार्यक्रम आहेत -
 
कलमा - कलमाचं वाचन करणे
सलात - दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे
इल्म - इस्लामचं शिक्षण घेणे
इकराम ए मुस्लीम - मुस्लीम समुदायातील लोकांचा सन्मान करणे
इख्लास ए नियत - प्रामाणिक उद्देशाने काम करणे.
दावत ओ तबलीग - इस्लामचा प्रचार करणे
प्रचार कसा केला जातो?
जमातीतील 8-10 लोकांचा एक गट केला जातो. नंतर कोणत्या गटाने कुठं प्रचारासाठी जावं, हे सांगितलं जातं. ठरल्याप्रमाणे हे लोक गावोगाव जातात आणि तिथं इस्लामचा प्रचार करतात.
 
जे लोक त्यांच्यात सामील होतात त्या लोकांना इस्लामचं महत्त्व सांगितलं जातं. नमाज पठण झाल्यावर कुराणचं वाचन केलं जातं, असं बीबीसी हिंदीने आपल्या बातमीत सांगितलं आहे.
 
'धर्मप्रचारासाठी 40 दिवसांची सुट्टी'
महाराष्ट्रातही विविध ठिकाणी तबलीग जमातचं काम चालतं. याबाबत माहिती देताना मुस्लीम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी सांगतात, "मुस्लीम समाजातील लोकांना धर्मपरायण करण्याच्या दृष्टीने काम करणाऱ्या लोकांचा हा समूह आहे. या लोकांची नोंदणी नसते. मुस्लीम समाजातील लोकांना धर्म, कुराण, नमाज पठणाचं महत्त्व इत्यादी गोष्टींचं महत्त्व पटवून देण्यासाठी या जमातीतील लोक गावोगावी फिरतात. ऐहिक जीवनापेक्षा पारलौकिक जीवनावर त्यांचा भर असतो."
 
"बीड, परभणी, उस्मानाबाद, उदगीर या ठिकाणचे अनेक लोक तबलीगमध्ये सहभागी झाले आहेत. हे लोक आपल्या कामातून सुट्टी घेऊन किंवा त्यांचे छोटे-मोठे व्यवसाय बंद ठेऊन 40 दिवस इस्लामच्या प्रचाराचं ते काम करतात. पाच-सहा जणांचा समूह करून ते फिरतात, मशिदीमध्येच झोपतात. स्थानिक लोकच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतात," असं डॉ. तांबोळी सांगतात.
 
जमातीतील लोकांना मुस्लीम समाजात मान दिला जातो. छोट्या शहरातील काही कुटुंबीय आपल्या व्यसनाधीन मुलांना जमातीत मुद्दामहून पाठवतात. त्या समूहात राहिल्यानंतर एक तर त्यांना मद्यपान करता येत नाही आणि नंतर त्या व्यक्तीच्या मनावर हे बिंबवलं जातं की मद्यपान किंवा इतर व्यसन करणं गैर आहे, अशी माहिती तांबोळी देतात.
 
'सुधारणावादी चळवळींना विरोध'
डॉ. शमसुद्दीन तांबोळी सांगतात, "तबलीगी जमात सारख्या संघटनांचा सुधारणावादी चळवळीला विरोध आहे. सुधारणावादी चळवळींचं ध्येय समाजाला आधुनिक शिक्षण देणे, आर्थिक प्रगती साधण्यास साहाय्य करणे, विज्ञानवादी समाज निर्माण करणे, हे असतं अशा चळवळींना धार्मिक संघटनांचा विरोध असतो. त्यापैकी एक तबलीगी जमात ही देखील आहे. जगात जे काही वाईट घडतंय किंवा दिसतंय ते शुद्ध धर्माचरण न केल्यामुळे आहे असं एक गृहीतक या संघटनेनी मनात धरलेलं आहे.""इस्लाममध्ये असलेल्या सुफी विचारधारेलाही तबलीगीचा विरोध आहे," अशी माहिती तांबोळी देतात.
 
महाराष्ट्रातले किती जण यात सहभागी झाले होते?
दिल्लीतल्या निजामुद्दीन इथली मुस्लिम संस्था तबलीगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातूनही या कार्यक्रमाला अनेकजण उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.
 
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेकजण या कार्य्रकमाला उपस्थित होते. पोलीस आणि आरोग्य यंत्रणांतर्फे त्यांचा शोध घेतला जात आहे.
 
दिल्लीच्या कार्यक्रमात अहमदनगर येथील 29 जण सहभागी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
 
दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले औरंगाबादचे 47 जण शहरात परतले आहेत. त्यातील 40 जणांची तपासणी करण्यात आली आहे.
 
पुणे आणि पिंपरी चिंचवडचे 32 जण या कार्यक्रमाला होते. या सगळ्यांचा शोध घेऊन पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत.
 
शिवाय, नागपुरात तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 54 जणांची ओळख पटवून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे, अशी माहिती नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
 
याव्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यातील 16, नांदेड जिल्ह्यातील 13 तर परभणी जिल्ह्यातील तीन जण, अकोला जिल्ह्यातील 10 आणि चंद्रपूरच्या एकाचा यात सहभाग होता.
 
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सामील झालेल्या लोकांची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत.
 
त्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने तपासाला सुरुवात केली आहे.
 
परदेशातही होतात कार्यक्रम
तबलीगी जमातचे कार्यक्रम भारतातच होतात, असं नाही. त्यांचं जाळं भारताबाहेरही आहे. सिंगापूर, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये तबलीगी कार्यरत आहे.
 
तबलीगी जमातच्या एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन मलेशियातील क्वालालांपूरमधील एका मशिदीमध्ये करण्यात आलं होतं. 27 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांमुळे आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातम्याही माध्यमांमधून आल्या.
 
अल् जझीराच्या एका बातमीनुसार मलेशियात कोरोना संसर्गाचे जेवढे रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी दोन तृतीयांश रुग्ण हे तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ब्रुनेईमध्ये याच मशिदीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 40 पैकी 38 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं.
 
10 ते 12 मार्चला पाकिस्तानतल्या रायविंड येथे जमातचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात हजारो जण सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यावर लोक आपापल्या घरी पोहोचले. स्थानिक लोकांनी या जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांची तक्रार केली.
 
सिव्हिल रुग्णालयाने रायविंडहून परतलेल्या 20 लोकांपैकी दोघांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली होती. त्यानंतर पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी तबलीगी जमातचा विरोध केला जात आहे.
 
'लॉकडाउन झाल्यावर कार्यक्रम झाला नाही'
सध्याचा घटनाक्रम पाहता सोमवारी (30 मार्च) रात्री तबलीगी जमातनं एका प्रसिद्धिपत्रकात म्हटलं की या कार्यक्रमाच्या तारखा वर्षभरापूर्वीच निश्चित झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केल्यानंतर तबलीगी जमातनेही आपला कार्यक्रम तातडीने रद्द केला होता.
 
"देशभरात लॉकडाऊनची घोषणा होण्यापूर्वीच काही राज्यांनी रेल्वे आणि बस सेवा थांबविण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, जे लोक परत जाऊ शकत होते, त्यांना परत पाठविण्याची पूर्ण व्यवस्था तबलीगी जमातनं केली होती. परंतु त्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे अनेक लोक परत जाऊ शकले नाहीत आणि ते मरकजमध्येच अडकून पडले," असंही निवेदनात सांगण्यात आलं आहे.
 
जमातच्या निवेदनात अडकून पडलेल्या लोकांची संख्या 1 हजार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या गोष्टी पोलिसांना 24 मार्च रोजी सांगण्यात आल्या, जेव्हा पोलिसांनी केंद्र बंद करण्यासंबंधी नोटीस पाठवली होती.
 
पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यात आलं असून कार्यक्रम थांबविण्यात आल्याचं तसंच दीड हजार लोक परत गेल्याचंही कळविण्यात आलं, असं तबलीगी जमातचं म्हणणं आहे. मात्र 1 हजार लोक अडकल्याचंही पोलिसांना सांगण्यात आलं. त्यानंतर 26 मार्चला एसडीएमसोबत एक बैठक झाली आणि त्यानंतर 6 जणांना चाचणीसाठी नेण्यात आलं.
 
"त्यानंतर 33 लोकांना चाचणीसाठी नेण्यात आलं. तेव्हाही आम्ही स्थानिक प्रशासनाला विनंती केली होती, की लोकांना घरी परत पाठविण्यासाठी गाड्यांची सोय करण्यात यावी. 28 मार्चलाही लाजपत नगरच्या एसपींकडून कायदेशीर कारवाईसंबंधी नोटीस बजावण्यात आली होती, त्यालाही आम्ही 29 मार्चला उत्तर दिलं होतं."
 
या कार्यक्रमाच्या आयोजकांवर FIR दाखल करण्याची शिफारसही दिल्ली सरकारनं केली आहे. ज्यावेळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी दिल्लीत 5 जणांपेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालणारं कलम लागू झालं होतं, असं दिल्ली सरकारचं म्हणणं आहे.
 
निजामुद्दीन इथं असलेल्या 1500-1700 लोकांपैकी जवळपास 1 हजार लोकांना तिथून काढण्यात आलं होतं. आरोग्य विभागाचे कर्मचारी इथं काम करत होते.
 
'आयोजकांवर कारवाई होणार'
आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी (30 मार्च) केंद्र सरकारच्या कोरोना साथीबद्दलचा आपडेट देताना सांगितलं, की धार्मिक आयोजनात सहभागी झालेल्या लोकांची तपासणी, क्वारंटाईन करणं आणि अन्य चाचण्या प्रोटोकॉलप्रमाणेच होतील.
 
गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आयोजकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या राज्यात वेगळं ठेवण्यात येईल असं केंद्रीय गृह खात्याने सांगितलं आहे.