Caronavirus: शिर्डीचं साईबाबा मंदिर अनिश्चित काळासाठी बंद
करोनामुळे महाराष्ट्रातील अनेक देऊळ बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. करोनाच्या प्रतिबंधासाठी पुढील १५ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. अशात शाळा, कॉलेज आणि कंपन्यांमध्ये सुट्ट्या जाहीर झाल्यामुळे प्रार्थना स्थळांवर गर्दी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांद्वारे गर्दी रोखण्याच्या सूचना देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डीमधील साई संस्थानने अनिश्चित काळासाठी मंदिर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सुचना मिळेपर्यंत भक्तांना साईंचे दर्शन घेता येणार नाही असं ट्रस्टने स्पष्ट केलं आहे.
शिर्डीमधील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टने भक्तांसाठी मंगळवारी दुपारी तीन वाजल्यापासून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी किती दिवस राहील याबद्दल सूचना देण्यात आलेली नाही.