शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2020 (08:01 IST)

दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द

इयत्ता दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण हे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या प्रचलित व विहित कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत कार्यवाही  करण्यात येईल. त्याचप्रमाणे नववी आणि अकरावीची परीक्षादेखील रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.
 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात टाळेबंदी लागू आहे. या पार्श्वभूमीवर इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र राज्यातील परिस्थिती बघता ही टाळेबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली असल्याने नववी व अकरावीच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा न घेता, पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चाचण्या, प्रात्यक्षिके आणि अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांची वर्गोन्नती करून त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने शासनास सादर केला होता. यावर निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यक त्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत, असेही मंत्री प्रा. गायकवाड यांनी सांगितले.