मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (23:35 IST)

कोव्हिड : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट संक्रमितांना रुग्णालयात जावं लागण्याचा धोका दुप्पट

कोरोनाच्या अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयात न्यावं लागण्याचा धोका हा दुपटीनं अधिक असल्याचं ब्रिटनमध्ये झालेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे.
 
तज्ज्ञांच्या मते 'द लँसेंट' या प्रसिद्ध पत्रकामध्ये प्रकाशित झालेल्या या महत्त्वाच्या अभ्यासावरून लोकांचं पूर्ण लसीकरण होणं का गरजेचं आहे? हे लक्षात येतं. त्यांच्या मते कोरोना व्हायरसच्या कोणत्याही व्हेरिएंटमुळं निर्माण होणारा धोका हा लसीकरणानं कमी होतो.
 
सध्या डेल्टा सर्वात मोठा धोका बनल्याचं पाहायला मिळतंय. ब्रिटनमध्ये समोर येणारी जवळपास सर्व प्रकरणं डेल्टा व्हेरिएंटमुळं असल्याचं समोर आलं आहे.
 
पीएचई आणि एमआरसीचं संशोधन
मेडिकल पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) आणि मेडिकल रिसर्च काऊंसिल (एमआरसी) च्या नेतृत्वात मार्च आणि मे दरम्यान झालेल्या या अभ्यासात 43,338 प्रकरणांचा समावेश करण्यात आला. या प्रकरणांत अल्फा आणि डेल्टा दोन्ही व्हेरिएंटची लागण झालेल्यांचा समावेश होता.
त्यात संसंर्गाचं सर्वाधिक प्रमाण लस न घेतलेल्यांचं होतं. या शोधानुसार बहुतांश रुग्णांना रुग्णालयात जाण्याची गरजच पडली नाही. मात्र डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांपैकी 196 (2.3%) रुग्णांना आणि अल्फा व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांपैकी 764 (2.2%) रुग्णांना रुग्णालयात जावं लागलं.
वय, लिंग आणि पिढीच्या फरकाचा अभ्यास केला असता अल्फाच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांना रुग्णालयात जावं लागण्याचा धोका दुपटीनं अधिक होता. त्यामुळं सर्वांचं लसीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे.
 
पीएचईनं नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर रुग्णालयात जाण्याची शक्यता अत्यंत कमी होते. फायझर-बायोटेकच्या लशीमुळं 96 टक्के सुरक्षा मिळते, तर अॅस्ट्रोझेनेकाद्वारे 92 टक्के सुरक्षा मिळते. लस घेतल्यानं संसर्गापासून सुटका होत नसली तरी रुग्णालयात जाण्यापासून बचाव होत असून मृत्यूचं प्रमाणही कमी होत असल्याचं इतर शोधांमधूनही समोर आलं आहे.
 
ब्रिटनच्या 88 टक्के लोकसंख्येला मिळाला किमान एक डोस
इंग्लंडमध्ये सध्या जवळपास 4.8 कोटी म्हणजे 16 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या जवळपास 88 टक्के नागरिकांना कोरोनाच्या लशीचा किमान पहिला डोस मिळाला आहे. तर सुमारे 78 टक्के म्हणजे 4.2 कोटी नागरिकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.
"आम्हाला आधीपासूनच माहिती होतं की, लस डेल्टा व्हेरिएंटच्या विरोधात चांगली सुरक्षा प्रदान करते. ब्रिटनमध्ये 99 टक्के नव्या रुग्णांसाठी डेल्टाच जबाबदार आहे. त्यामुळं ज्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले नसतील, त्यांनी लवकरात लवकर ते घ्यावे,'' असं पीएचई चे डॉ. गेविन डबरेरा म्हणाले.
 
"तुम्हाला कोव्हिडची लक्षणं असतील तर तुम्ही घराच राहावं आणि लवकरात लवकर पीसीआर टेस्ट करावी, हे अजूनही गरजेचं आहे,'' असं ते म्हणाले.