शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 21 डिसेंबर 2023 (09:24 IST)

‘कोव्हिडचा धोकादायक आणि आधीपेक्षा गंभीर संसर्गाचा धोका, अनेक आठवडे होऊ शकतो त्रास’

corona
- जेम्स गॅलाघर
आताच्या काळात कोव्हिडची लागण होणं म्हणजे नेमकं कसं असंत? माझ्या एका मित्राला यामुळं खूप जास्त त्रास झाला आणि त्याला त्याचं आश्चर्य वाटलं, तेव्हापासून मला हा प्रश्न सतावतो आहे.
 
त्याला तिसऱ्यांदा कोव्हिड झाला होता आणि आधीच्या अनुभवांपेक्षा यावेळचा त्याचा अनुभव अत्यंत वाईट होता.
 
"मला वाटलं होतं प्रत्येकवेळी आपण आजारी पडतो, तेव्हा आधीच्या तुलनेत जरा कमी त्रास व्हायला हवा," आजारी असताना अंथरुणावरुन त्यांनं हा संदेश पाठवला होता.
 
कोव्हिडच्या जागतिक साथीदरम्यान याचविषयी बरीच चर्चा झाली होती. पण तरीही माझे कामाच्या ठिकाणचे काही सहकारी, तसंच मी ज्यांच्या मुलाखती घेतल्या किंवा ज्यांच्याशी सहज गप्पा मारल्या त्यापैकी अनेकांनी त्यांना गेल्या काही महिन्यांत कोव्हिडमुळं जास्त त्रास झाल्याचं सांगितलं.
 
या सर्वांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला, तो काहीसा ओळखीचा आहे - आठवडाभराचा खोकला, डोकेदुखी किंवा तापानंतर प्रचंड थकवा...
 
इथे हे लक्षात घ्यायला हवं की कोव्हिडमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आढळून येतात.
 
काही नशीबवान लोक फारसे आजारी पडले नाहीत किंवा त्यांच्यात काहीच लक्षणं दिसून आली नाहीत. काहींसाठी कोव्हिड म्हणजे केवळ लहानसा खोकला झाल्यासारखं आहे. इतका सामान्य की त्यावर कोव्हिडची टेस्ट करण्याची गरजही वाटत नाही.
 
पण कोव्हिडमुळं अजूनही धोकादायक असा संसर्ग होत आहे, तो आधीपेक्षा गंभीर असू शकतो आणि त्यामुळं अनेक आठवडे त्रास होऊ शकतो, असं प्रतिकारशक्तीचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचं मत आहे.
 
म्हणजे नेमकं काय सुरू आहे?
कोव्हिडच्या संपर्कात आल्यावर आपल्याला नेमकं काय होतं, हे हा विषाणू आणि आपल्या शरिरातील प्रतिकारक्षमता यांच्यातल्या लढ्यावर अवलंबून असतं.
 
संसर्गानंतर सुरुवातीचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण विषाणू आपल्या शरिरात कुठवर हल्ला करणार आणि किती गंभीर परिणाम करण्याची त्याची क्षमता असेल हे याच दिवसांत ठरतं.
 
पण, कमी होणारी प्रतिकाक्षमता आणि विषाणूमध्ये होणारे बदल यामुळं गोष्टी आता पुन्हा बदलत आहेत.
 
एडिंबरा विद्यापीठातल्या रोग प्रतिकारशक्ती विषयाच्या अभ्यासक एलिनॉर रायली यांना स्वतःला कोव्हिडचा अत्यंत भयावह असा अनुभव आला होता. त्यांच्या कल्पनेपेक्षाही तो वाईट होता.
 
त्यांनी मला सांगितलं की, "लोकांनी कोव्हिडची लस घेतली, त्या काळाच्या तुलनेत आता त्यांच्या शरीरात कोव्हिड विरोधातील अँटिबॉडीची पातळी अत्यंत कमी असेल."
 
अँटीबॉडीज कमी झाल्याचा परिणाम
अँटिबॉडीज या मायक्रोस्कॉपिक मिसाइलसारख्या असतात. त्या विषाणूच्या पृष्ठभागावर चिटकतात आणि त्या विषाणूला शरिरांच्या पेशींचं नुकसान करण्यापासून रोखतात.
 
त्यामुळं तुमच्या शरिरात भरपूर अँटिबॉडीज असतील तर त्या विषाणूचा लवकर खातमा करतील. त्यामुळं संसर्ग हा कदाचित कमी गंभीर आणि कमी कालावधीचा असेल.
 
"पण आता अँटिबॉडीची संख्या कमी झाली असल्यानं मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे आणि त्यामुळं आजार अधिक गंभीर होतो आहे," असंही प्राध्यापक रायली सांगतात.
 
अँटिबॉडीचे प्रमाण कमी असण्याचं कारण म्हणजे एक तर आपण लस घेतली, त्याला बराच काळ लोटला आहे. (तरुण आणि निरोगी असाल तर तुम्ही कदाचित फक्त दोन डोस आणि एकच बूस्टर घेतला असेल. )
 
दुसरं म्हणजे कोव्हिडची लागण झाल्यानंही अँटिबॉडी तयार होतात, पण अनेकांना कोव्हिड होऊन गेला त्यालाही आता बरेच दिवस लोटले आहेत त्यामुळे त्यांच्या शरीरात अँटिंबॉडींचं प्रमाण कमी झालं आहे.
 
लंडनच्या इम्पेरियल कॉलेजचे प्राध्यापक पीटर ओपनशॉ म्हणाले की, "सुरुवातीला वेगानं आणि सातत्यानं लशींचं वितरण केलं गेलं, ज्यामुळे खूप मोठा फरक पडला. अगदी लहान मुलांचंही लसीकरण करण्यात यश आलं. त्यामुळंही मोठा फरक पडला."
 
यंदा कमी जणांनी लशी घेतल्या आहेत, ही चिंतेची बाब असल्याचं प्राध्यापक ओपनशॉ यांना वाटतं.
 
ते सांगतात की, मी काही वाईट गोष्टीच होतील असं भाकित करणारा व्यक्ती नाही. पण खूप लोकांना या विषाणूमुळे आता पुन्हा भयानक आजार होईल आणि अनेक दिवस किंवा अनेक आठवडे त्रास होईल.
 
"मी तरुण किंवा अगदी निरोगी असलेल्या लोकांनाही कोव्हिडचा खूप त्रास झाल्याचं ऐकलं आहे. हा अगदी आश्चर्यकारक आणि धूर्त असा विषाणू आहे. कारण तो काही लोकांना अगदी किरकोळ आजारी करतो, तर काहींना दीर्घकाळ त्याचा फटका बसतो," असं ते म्हणाले.
 
तुम्हाला गेल्या वर्षभरात कोव्हिडची लागण झालेली नसेल, तर तुम्ही आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे, असं मतही त्यांनी मांडलं.
 
कोव्हिडमुळं रुग्णालयात दाखल होण्याची किंवा मृत्यूची शक्यता असलेल्यांना लसीकरण करण्याचा युके सरकारने निर्णय घेतला आहे. कारण त्यामुळं आरोग्य सेवांवरचा ताण कमी होतो.
 
पण म्हणजे 65 पेक्षा कमी वय असलेल्यांना कोव्हिड होणार नाही, किंवा त्यांना जास्त त्रास होणार नाही, असा त्याचा अर्थ नसल्याचंही प्राध्यापक रायली सांगतात.
 
"मला वाटतं की, बूस्टर डोस न देण्याचा परिणाम म्हणजे अधिकाधिक लोक आजारपणामुळे हिवाळ्यात एक, दोन किंवा तीन आठवडे कामापासून दूर राहतील."
 
पण फक्त लसीकरणाविषयीचे निर्णयच नाही, तर प्रत्यक्ष विषाणूही बदलतो आहे.
 
घटती प्रतिकारशक्ती
अँटिबॉडीज अत्यंत काटेकोरपणे काम करू शकतात, कारण त्या विषाणूला ज्या भागावर आणि ज्या प्रकारे चिकटणार आहेत, त्यावर अवलंबून असतात. थोडक्यात एखादा विषाणू रुप बदलण्यासाठी जेवढा अधिक विकसित होतो, तेवढ्या अँटिबॉडीजचा परिणाम कमी होत जातो.
 
प्राध्यापक ओपनशॉ यांच्या मते, "सध्या जे विषाणू पसरत आहेत ते रोगप्रतिकारशास्त्राच्या दृष्टीनं मूळ विषाणूपेक्षा खूप वेगळे आहे. पण सुरुवातीच्या लसी या आधी आलेल्या मूळ विषाणूवरून तयार करण्यात आल्या होत्या.
 
"खूप लोकांमध्ये कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन व्हेरियंट किंवा त्याच्या प्रकारांविरोधात अत्यंत कमी रोगप्रतिकारक शक्ती असल्याचं दिसतं. "
 
म्हणजे आज तुम्हाला कोव्हिडमुळं त्रास होत असेल किंवा मागच्या वेळेपेक्षा अधिक त्रास होत असेल, तर कदाचित कमी होणाऱ्या अँटिबॉडी आणि विषाणूचे बदलणारे रूप या दोन्हीचं मिश्रण हे त्यामागचं कारण असू शकतं.
 
पण याचा अर्थ तुम्ही खूप जास्त आजारी पडण्याची किंवा रुग्णालयात दाखल व्हावं लागण्याची शक्यता वाढतेच असं मात्र नाही.
 
आपल्या रोगप्रतिकार यंत्रणेचा एक वेगळा भाग आहे, त्याला T-cell म्हणजे टी-पेशी म्हटलं जातं. संसर्ग झाल्यानंतर त्या सक्रिय होतात. त्यांना आधीच्या संसर्ग किंवा लसीकरणातून प्रशिक्षण मिळालेलं असतं.
 
विषाणूनं रूप बदललं, म्हणजे त्याचं उत्परिवर्तन झालं, तरी या टी-पेशी गोंधळून जात नाहीत कारण त्या कोव्हिडचा संसर्ग झालेल्या पेशींना शोधून त्यांना संपवत असतात.
 
"त्या गंभीर आजारापासून तुमचं संरक्षण करतात, पण विषाणूला संपवण्याच्या प्रक्रियेत जी शारिरीक हानी होते, त्यामुळं थोड्या जास्त प्रमाणात तुम्हाला त्रास जाणवू शकतो," असं प्राध्यापक रिले म्हणाल्या.
 
पण कोव्हिडचा सामना करण्यासाठी टी-पेशींवर अवलंबून राहिल्यामुळं स्नायूंच्या वेदना, ताप आणि थंडी अशी लक्षणं वाढीस लागतात. .
 
मग कोव्हिड हा सौम्य निरुपद्रवी विषाणू ठरण्याच्या मार्गावर आहे, या सिद्धांताचं काय?
 
कोव्हिडशी संबंधित आणखी चार कोरोना विषाणू आहेत, ज्यामुळं माणसांना संसर्ग होऊन सामान्य सर्दीसारखी लक्षणं दिसून येतात. पण हे विषाणू सौम्य असण्याचं एक कारण म्हणजे, आपल्याला बाल्यावस्थेत असताना आणि नंतरही आयुष्यभर सहजपणे त्यांचा संसर्ग होत असतो आणि आपण त्यावर मात करत असतो.
 
कोव्हिडच्या बाबतीत आपण त्या पातळीवर अजून पोहोचलो आहोत, असं म्हणता येणार नाही असं प्राध्यापक ओपनशॉ सांगतात, पण ते स्पष्ट करतात की वारंवार संसर्ग झाल्यानं आपल्यामध्ये नैसर्गिक प्रतिकारक्षमता मात्र वाढीस लागेल.
 
म्हणजे ती पातळी गाठेपर्यंत हिवाळ्यात आपल्यातल्या काही जणांना असाच त्रास होत राहील का.
 
“मला तीच भीती वाटते,” प्राध्यापक रायली सांगतात.