क्रिकेटपटू स्मृती मंधाना होमक्वारंटाइनमध्ये
भारतीय महिला क्रिकेट संघात सलामीला फलंदाजीसाठी येणारी स्मृती मंधानाला तिच्या सांगलीतील घरात क्वारंटाइन करण्यात आले आहे. 23 मार्चला स्मृती मुंबईवरुन सांगलीला परतली होती. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तिला होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला देणत आला आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि डॉक्टर तिच्या तब्बेतीकडे लक्ष ठेवून आहेत. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतापर्यंत सांगली जिल्ह्यात 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत परदेशातून आलेल्या सुमारे 200 लोकांना क्वारंटाइन करण्यात आलेले आहे. फेब्रुवारी महिन्यात स्मृती ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकात सहभागी झाली होती. ही स्पर्धा संपल्यानंतर ती मुंबईत आली. जगभरासह भारतात कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाल्यानंतरही स्मृती मुंबईतल्या घरी होती. यानंतर 23 मार्चला ती सांगलीतल्या आपल्या घरी आली.
महापालिकेच्या अधिकार्यांना 25 मार्चला ही माहिती समजताच त्यांनी तिला क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिल्याचे सांगली महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी सांगितलं.
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलसह सर्व महत्त्वाच्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. जपाननेही यंदाच्या वर्षी होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन एक वर्षासाठी पुढे ढकलले आहे. अनेक महत्वाच्या देशात अद्यापही कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही स्पर्धा खेळवणे योग्य नसल्याचे मत अनेक क्रीडापटूंनी व्यक्त केले होते.