गुरूवार, 8 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified सोमवार, 27 एप्रिल 2020 (09:20 IST)

राज्यात ६५ लाख ९५ हजार ४८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 26 एप्रिल 2020 या सव्वीस दिवसात राज्यातील 1 कोटी 53 लाख 64 हजार 769 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 65 लाख 55 हजार 480 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
 
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.
 
राज्यात या योजनेमधून सुमारे 20 लाख 28 हजार 616 क्विंटल गहू, 15 लाख 67 हजार 121 क्विंटल तांदूळ, तर 19 हजार 305 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 8 लाख 32 हजार 739 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
 
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दिनांक 3 एप्रिलपासून एकूण 1 कोटी 29 लाख 11 हजार 696 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 5 कोटी 86 लाख 33 हजार 060 लोकसंख्येला 29 लाख 31 हजार 650 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे. या योजनेसाठी 35 लाख 820  क्विंटल तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
 
राज्य शासनाने कोविड-19 च्या संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 08 लाख 44 हजार 076 APL केशरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.24 एप्रिल 2020 पासून सुरू होऊन 28 हजार 090 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.