1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जुलै 2020 (13:58 IST)

आता करोना चाचणीसाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन बंधनकारक नाही

मुंबईत करोना चाचणींसंबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आता येथे खासगी प्रयोगशाळांमध्ये करोना चाचणीसाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आवश्यक नसल्याचे मुंबई पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लक्षणे आढळल्यास व्यक्तीला आता थेट चाचण्या करणे शक्य होणार आहे. 
 
आतार्यत खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन अनिवार्य होतं पण आता नव्या नियमानुसार करोनाची लक्षणे असलेल्या कोणत्याही व्यक्तीला खासगी प्रयोगशाळेत विनाचिठ्ठी चाचण्या करता येतील. तसेच लॅबपर्यंत येण्यात अक्षम व्यक्तींच्या चाचण्या घरी जाऊन करण्याची मुभाही पालिकेने दिली आहे.
 
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशाप्रमाणे खासगी प्रयोगशाळांवरील नियमही शिथिल करत चाचण्या खुल्या कराव्यात ज्याने अधिक चाचण्या होऊ शकतील अशात चाचण्या करण्याबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. 
 
मोफत चाचण्या करण्यासाठी मात्र रुग्णांना पालिकेच्या बाह्यरुग्ण विभागात तपासणी करावी लागेल. त्यानंतरच चाचण्या केल्या जातील, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.