मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 1 जुलै 2020 (08:59 IST)

१ जुलैपासून ३५० लोकल फेऱ्या, ‘या’ कर्मचाऱ्यांना प्रवासाची मंजुरी

मुंबई उपनगरीय लोकल रेल्वेतून केंद्रीय, राज्य सरकारचे कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँका, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यायालयीन कर्मचारी, राज भवन कर्मचारी यांचाही यामध्ये समावेश आहे. 
 
अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनीही लोकलने प्रवास करता येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ही मुभा १ जुलै म्हणजेच बुधवारपासून देण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच संरक्षण विभाग, आयकर विभाग, जीएसटी, कस्टम, पोस्ट खात्यातील कर्मचारीही लोकलमधून प्रवास करु शकतील.
 
तसेच १ जुलैपासून मध्य रेल्वेवर ३५० लोकल फेऱ्या होतील. मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर एकूण २०० लोकल फेऱ्या होतात. त्यात आणखी १५० फेऱ्यांची भर पडली आहे. 
 
पश्चिम रेल्वेवरही २०२ लोकल फेऱ्या होत असून यामध्ये बुधवारपासून १४८ फेऱ्या वाढवण्यात आल्याअसून आता पश्चिम रेल्वेवरही ३५० फेऱ्या होणार आहेत. सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.