मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जुलै 2020 (17:24 IST)

७ महानगरपालिकांना पुन्हा लॉकडाऊन लागू

मिशन बिगीन अगेनच्या पहिल्या महिन्याभरातच मुंबई महानगर क्षेत्रातल्या ९ पैकी ७ महानगरपालिकांना पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, मीरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर आणि उरण या भागांपैकी फक्त मुंबई आणि वसई विरार वगळता इतर सर्व ठिकाणी १० दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
 
पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आलेल्या भागात संपूर्ण ठाणे जिल्हा, ज्यात ६ महानगर पालिकांचा समावेश आहे, आणि पनवेल महानगर पालिकेने १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात नवी मुंबईमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू केला आहे, तर पनवेल महानगर पालिका आणि जवळच्या उरण तालुक्यात देखील शुक्रवारपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. उल्हासनगरने देखील गुरुवारपासून लॉकडाऊन लागू केला आहे. कल्याण डोंबिवली आणि खुद्द ठाणे महानगर पालिकेने देखील गुरुवारपासूनच लॉकडाऊन जाहीर केला आहे. मीरा भाईंदर महानगर पालिकेने तर बुधवारपासूनच लॉकडाऊन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर या सर्वच भागामध्ये कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
वसई-विरार महानगर पालिकेच्या १८ भागांमध्ये लॉकडाऊन लागू केला आहे. तर वाशी एपीएमसी मार्केट आणि ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल एरिया लॉकडाऊनच्या निर्बंधांमधून वगळण्यात आले आहे. ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच असून एकट्या ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत बुधवारी दिवसभरात १५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ३२२ इतका झाला आहे.