बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 11 मे 2020 (15:22 IST)

कोरोनाबाबत आरोग्य मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर

कोरोनाची अगदीच कमी लक्षणं असणाऱ्या आणि पूर्वलक्षणं असलेल्या रुग्णांसाठी आता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कोरोनाची फारच कमी लक्षणं असलेल्या किंवा कोरोनाआधीची लक्षणं असलेल्या रुग्णांना घरीच अलगीकरण करता येणार आहे. घरीच अलगीकरण केलेला रुग्ण सुरुवातीची लक्षणं दिसू लागली त्यापासून १७ दिवसांनी अलगीकरण संपवू शकेल. पूर्वलक्षणं असलेल्या रुग्णांसाठी सँपलिंग केल्याच्या दिवसापासून १७ दिवस मोजले जातील. दोन्ही प्रकारच्या रुग्णांना अलगीकरण संपवण्याआधी १० दिवसांत ताप आला नसेल तरच अलगीकरण संपवलं जाईल, अशी अट घालण्यात आली आहे.
 
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना
 
१.होम आयसोलेशनच्या काळात ट्रिपल लेयर मेडिकल मास्क वापरणं बंधनकारक असेल. दर ८ तासांनी हा मास्क बदलावा लागेल किंवा मास्क ओला झाला किंवा खराब झाला तर ताबडतोब बदलावा लागेल.
 
२.मास्क वापरल्यानंतर तो नष्ट करण्याआधी त्याचे १ टक्का सोडियम हायपोक्लोराईटने निर्जंतुकीकरण करावे.
 
३.रुग्णाला त्याच्या खोलीतच राहावे लागेल. घरातील अन्य सदस्य विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा उच्च रक्तदाब, ह्रदयरोगग्रस्त असतील त्यांच्याशी रुग्णाचा संपर्क होता कामा नये.
 
४.रुग्णाने पुरेसा आराम करायला हवा आणि जास्तीत जास्त पाणी किंवा द्रवपदार्थ प्यायला हवेत.
 
५.श्वाच्छोश्वासाच्या स्थितीबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन करायला हवे.
 
६.पाणी आणि साबण किंवा अल्कोहोलसहित सॅनिटायझरने कमीत कमी ४० सेकंदांपर्यंत हात स्वच्छ धुवायला हवेत.
 
७.रुग्णाच्या व्यक्तिगत वस्तू इतरांनी घेऊ नयेत.
 
८.खोलीतील ज्या वस्तुंना वारंवार हात लावावा लागतो, उदा. टेबलटॉप, दरवाजाची कडी, हँडल, अशा वस्तुंना हायपोक्लोराईट सोल्यूशनने स्वच्छ करायला हवे.
 
९. रुग्णाला डॉक्टरचा तब्बेतीबाबत आणि औषधांबाबत डॉक्टरांचा सल्ला मानावा लागेल.
 
१०. रुग्ण त्याच्या तब्बेतीवर स्वतःच लक्ष ठेवेल. रोज शरीराचं तापमान मोजेल आणि तब्बेत बिघडली अशी लक्षणं दिसताच तातडीने यंत्रणेला, डॉक्टरांना कळवावे लागेल.
 
याशिवाय रुग्णाची काळजी घेणाऱ्यांसाठीही नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
 
रुग्णाच्या खोलीत जाताना ट्रिपल लेयर मेडिकल मास्क घालूनच जावे लागेल. मास्क वापरताना त्याच्या समोरच्या भागाला स्पर्श करू नये. मास्क ओला किंवा खराब झाला तर त्वरीत बदलावा.
रुग्णाची देखभाल करणाऱ्याने स्वतःच्या चेहऱ्याला किंवा नाकातोंडाला स्पर्श करू नये.
रुग्ण किंवा त्याच्या खोलीत संपर्क झाल्यानंतर त्याने स्वतःचे हात स्वच्छ धुवायला हवेत.
जेवण बनवण्याच्या आधी आणि नंतर, जेवण झाल्यानंतर, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर आणि जेव्हाही हात खराब होतील तेव्हा ते स्वच्छ धुवायला हवेत. हात साबण आणि पाण्याने ४० सेंकद स्वच्छ धुवावे आणि जर हातांना धूळ लागली नसेल तर अल्कोहोलसहित सॅनेटायजर वापरून हात स्वच्छ करावेत.
साबण आणि पाण्याने हात धुतल्यानंतर नष्ट करता येणाऱ्या नॅपकीन पेपरने हात पुसावेत. पेपर नॅपकीन नसेल तर स्वच्छ टॉवेलने हात पुसावेत. टॉवेल ओला झाला तर बदलावा.
रुग्णाच्या शरीरातून येणाऱ्या द्रवाच्या थेट संपर्कात येऊ नये. रुग्णाला सांभाळताना हातमौजे घालावेत. हातमौजे घालण्याआधी आणि घातल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.
रुग्णांबरोबर सिगारेट पिऊ नये. तसेच त्याची भांडी, पाणी, टॉवेल किंवा चादरला स्पर्श करणं टाळावं.
रुग्णाला जेवण त्याच्या खोलीतच द्यावं.
रुग्णाची भांडी हँण्डग्लोव्हज घालूनच साफ करावीत. ग्लोव्हज काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.
रुग्णाच्या खोलीची सफाई करताना, त्याचे कपडे, चादर धुताना ट्रिपल लेयर मेडिकल मास्क आणि नष्ट करता येणारे ग्लोव्हज वापरावेत, ग्लोव्हज घालण्याआधी आणि नंतर हात स्वच्छ धुवावेत.
रुग्ण वेळच्यावेळी औषधं घेत आहे की नाही याकडे लक्ष द्यावे.
रुग्णाची देखभाल करणारी व्यक्ती किंवा त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी स्वतःच्या तब्बेतीवरही लक्ष ठेवावे. रोज शरीराचं तापमान मोजावं. कोरोनाची लक्षणं दिसली तर तातडीने मेडिकल ऑफिसरला संपर्क करावा.