सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (23:21 IST)

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत महत्त्वाची माहिती

सीरम इन्स्टिट्यूटची कोवोवॅक्स लस लहान मुलांकरता पुढच्या वर्षी पहिल्या तिमाहीपर्यंत येईल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट कंपनीचे प्रमुख अदर पूनावाला यांनी दिली आहे. तसेच मोठ्यांसाठी ही लस यावर्षी ऑक्टोबरपर्यंत भारतात लाँच होणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांना अदर पूनावाला भेटले. त्यावेळेस ते म्हणाले की, ‘पैशांची कोणतीही कमी नाही आहे. आम्हाला मिळत असलेल्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप आभारी आहोत.’
 
अदर पूनावाला यांनी मंत्री मंडावियांसोबत भेट झाल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळेस पूनावाला म्हणाले की, ‘सरकार आमची मदत करत आहे. कोणतेही आर्थिक संकट नाही आहे. आमची कोवोवॅक्स लस यावर्षी ऑक्टोबरपर्यंत मोठ्यांसाठी उपलब्ध होईल, अशी आशा आहे. या लसीची किंमत लाँचिंग दरम्यान कळेल. तसेच लहान मुलांसाठी ही लस २०२२च्या पहिल्या तिमाहीत येईल.’
 
अदर पूनावाला यांनी मांडविया यांच्यासोबतच्या बैठकीत कोविशील्डच्या पुरवठ्याबाबत चर्चा केली. त्यांनी सांगितले की, ‘आम्ही लसीचे उत्पादन वाढवण्यावर चर्चा केली आहे. युरोपमधील १७ देशांनी कोविशील्डला मान्यता दिली आहे आणि अनेक मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत आहेत.’
 
माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूट देशभरातील १० ठिकाणी ९२० मुलांवर कोवोवॅक्स लसीची चाचणी करणार आहे. यामध्ये २ ते १७ वयोगटातील मुलांचा समावेश असेल, ज्यांना वेगवेगळ्या गटात विभागले जाईल. पहिला गट २ ते ११ वयोगटातील मुलांचा असेल तर दुसऱ्या गटात १२ ते १७ वयोगटातील मुलं असतील. प्रत्येक गटात ४६०-४६० मुलं असणार आहे.