गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (22:53 IST)

नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हॅरिएंटचे ३० रुग्ण आढळले

30 patients of Delta variant were found in Nashik district
नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हॅरिएंटचे ३० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये चिंता वाढली आहे. यातील १ रुग्ण नाशिक शहरातील तर २९ रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतांनाच आता डेल्टाचे रुग्ण आढळून आल्यामुळे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. परिणामी आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने निर्बंध शिथील केल्यानंतर आता हे रुग्ण नाशिक शहरासह जिल्ह्यात आढळले आहे.

त्यामुळे आता पुन्हा निर्बंध कडक होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. डेल्टा व्हेरिएंट हा अत्यंत संसर्गजनक आहे. या व्हेरिएंटमुळे झपाट्याने रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे तेव्हाच आपण या नव्या आव्हानावर मात करु शकतो, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत १५५ नमुने नाशिकमधून पाठवण्यात आले होते. त्यात ३० नमुन्यांमध्ये डेल्टा व्हॅरिएंट आढळून आला आहे.