बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (08:34 IST)

राज्यात आणखी ६ रुग्ण ओमिक्रॉन बाधित आढळले, एकूण ५४ ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ६ रुग्ण ओमिक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर १ रुग्ण पुणे जिल्ह्यातील आणि १ रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ५४ ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
 
राज्यातील काही जिल्ह्यात ओमिक्रॉनचे रूग्ण दिवसागणिक वाढत आहेत. मुंबईत २२, पिंपरी-चिंचवड ११, पुणे ग्रामीण ७, पुणे मनपा ३, सातारा३, कल्याण-डोंबिवली २, उस्मानाबाद २, बुलढाणा१ , नागपूर१, लातूर१, आणि वसई-विरार १ असे एकूण ५४ रूग्ण आढळून आले आहेत. यातील २ रुग्ण कर्नाटक तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, केरळ, जळगाव आणि औरंगाबाद येथील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. यापैकी २८ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
 
मुंबईतील चारही रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रुग्ण मुंबईतील आहे. तर २ रुग्ण कर्नाटक राज्यातील तर १ रुग्ण औरंगाबाद येथील रहिवासी आहे. यामध्ये २ जणांनी टांझानियाचा तर २ जणांनी इंग्लंडचा प्रवास केलेला आहे. हे चारही जण पूर्ण लसीकरण झालेले आणि लक्षणविरहित आहेत. सर्वजण सध्या मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात विलगीकरणात आहेत. हे रुग्ण २१ ते ५७ वर्षे या वयोगटातील असून यात २ स्त्रिया तर २ पुरुष आहेत.
 
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कातील एका ५ वर्षीय मुलामध्ये ओमिक्रॉन विषाणूचे निदान झाले आहे. या रुग्णास कोणतीही लक्षणे नाहीत. पिंपरी – चिंचवड मनपा क्षेत्रातील मध्यपूर्वेत प्रवास करुन आलेल्या ४६ वर्षीय पुरुषांमध्ये ओमिक्रॉन विषाणू आढळला आहे. या रुग्णाची लक्षणे सौम्य असून तो सध्या एका खाजगी रुग्णालयात भरती आहे. त्याचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.