भारत मदत करणार, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवणार
‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी न उठवल्यास प्रत्युत्तर देण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर भारताने नरमाईची भूमिका घेतली आहे. ‘कोरोना’बाधित अमेरिकेसह शेजारी देशांना माणुसकीच्या नात्याने पॅरासिटामॉल आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवणार असल्याचं भारताने सांगितलं.
‘कोरोना’ साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या क्षमतांवर अवलंबून असणार्या सर्व शेजारी देशांना योग्य प्रमाणात पॅरासिटामॉल आणि हायड्रोक्सीक्लोरोक्विनचा परवाना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. विशेषत: ‘कोरोना’चा मोठ्या प्रमाणात फटका बसलेल्या काही राष्ट्रांना आम्ही ही आवश्यक औषधे पुरवत आहोत. या संदर्भात कोणत्याही शंका-कुशंका उपस्थित करुन राजकीय रंग देणाऱ्या चर्चांना आम्ही प्रोत्साहन देत नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं.
‘कोरोना व्हायरस’च्या रुग्णांवरील उपचारांमध्ये वापरले जाणारे मलेरियावरील औषध ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवर भारतात बंदी आहे. अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाला मान्यता दिली नसली, तरी त्याचे सकारात्मक परिणाम पाहता अमेरिकेने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’च्या निर्यातीवरील बंदी उठवण्याची मागणी ट्रम्प यांनी भारताकडे केली होती. मोदींशी रविवारी त्यांचा फोनवरुन संवाद झाला होता.