शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (15:07 IST)

जनधन खात्यातील रक्कम परत जाणार नाही : सोनवणे

पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी न करण्याचे आवाहन केंद्र सरकारने अनुदानरूपी जनधन खात्यात जमा केलेले 500 रुपये कोणत्याही परिस्थितीमध्ये परत जाणार नाही याची महिला ग्राहकांनी नोंद घ्यावी  आणि रक्कम काढण्यासाठी विनाकारण बँकेत गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी केले आहे.

ग्राहकांनी अतिमहत्वाच्या कामासाठी पैशांची निकड असेल तरच शाखेमध्ये येण्याची तसदी घ्यावी. ज्या ग्राहकांकडे एटीएम कार्ड उपलब्ध आहे, अशा ग्राहकांनी एटीएम केंद्रावरून पैसे काढावेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार इतर बँकांच्या एटीएम केंद्रावरून पैसे काढण्याची मर्यादा ही सदर संचारबंदीच्या काळासाठी शिथिल करण्यात   आली आहे, म्हणून ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

केंद्र सरकारने नुकतेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामध्ये समाजातील गरीब जनतेला आर्थिक मदत म्हणून जनधन योजनेत खाते असणार्‍या  महिलांच्या खात्यांमध्ये 500 रुपये प्रतिमहिना अनुदानरूपी जमा करण्याचे जाहीर केले आहे. सदर जमा झालेली रक्कम काढण्यासाठी महिला ग्राहकांची झुंबड सर्व बँकांच्या शाखांसमोर दिसून येत आहे.

बँकांसमोर ग्राहकांना अनुदान देण्यासोबतच, शासकीय, निशासकीय, खासगी कर्मचार्‍यांचे पगार, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्ती वेतन देण्याचे सुध्दा आव्हान आहे.