थेट कारवाई, सायन रुग्णालयाच्या इंगळे यांची उचलबांगडी
मुंबईतील सायन रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता पालिकेकडून सायन रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. रमेश भारमल यांची सायन हॉस्पिटलच्या अधिष्ठातापदी नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे सध्या सायनमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. रमेश भारमल हे आता २४ तास रुग्णालयातच राहणार असल्याचे समजते.
तसेच रमेश भारमल यांच्यावर कुपर हॉस्पिटल आणि एच.बी.टी मेडिकल कॉलेज यांच्यावर देखरेख ठेवण्याचीही जबाबदारी असेल. याशिवाय, सरकराने सायन आणि कुपर रुग्णालयाच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी आयएएस प्राजक्ता लवंगारे यांच्याकडे विशेष जबाबदारी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारीच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला होता. यानंतर लगेचच प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.