माहिती लपवल्याप्रकरणी १५० जणांवर गुन्हे दाखल  
					
										
                                       
                  
                  				  दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्यांकडून राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाची बाधा पोहोचली आहे. असे असताना त्यांनी पुढे येऊन माहिती देण्याची गरज होती. मात्र, दिल्लीत गेलेल्यांनी आपली माहिती लपवली. त्यामुळे माहिती लपवल्याप्रकरणी १५० जणांवर मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
				  													
						
																							
									  
	 
	दिल्लीतील तबलिगच्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनी माहिती न लपविता समोर येऊन महानगरपालिकेला हेल्पलाईन आधारे कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते. अन्यथा वेगवेगळ्या कलमांतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला होता. तरीही अनेकांनी आपली माहिती लपवल्याचे पुढे आले आहे.
				  				  
	 
	दिल्लीतील या कार्यक्रमाला राज्यातले १४०० लोक गेले होते. त्यापैकी ५० जणांनी मोबाइल बंद ठेवला असल्याने त्यांच्याशी अजूनही संपर्क झाला नसल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या लोकांनी स्वतःहून प्रशासनाशी संपर्क साधावा अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.