शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (23:46 IST)

ओमिक्रॉन कोरोना बूस्टर डोस: लशीचा डोस कसा कधी, कसा आणि कुठे मिळेल?

भारतात आता आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना लशीचा तिसरा डोस - 'Precaution Dose' दिला जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 25 डिसेंबर 2021 रोजी केली होती. ज्या लशीचे आधी दोन डोस घेतलेले आहेत तिचाच तिसरा बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे.
 
युनायटेड किंग्डमच्या एनएचएस या हेल्थ सर्विसने दिलेल्या माहितीनुसार बूस्टर डोसमुळे कोरोनाविरोधात अधिक संरक्षण मिळतं असं समोर आलंय.
ज्या लोकांनी आधी कोव्हिशील्ड लस घेतलेली आहे त्यांना कोव्हिशील्डचा बूस्टर डोस देण्यात येईल तर ज्यांनी कोव्हॅक्सिन घेतलेलं आहे त्यांना कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.
 
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कस आणि 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं हा डोस घेता येणार आहे.
पण बूस्टर डोस म्हणजे काय, तो ओमिक्रॉनविरोधात कसा आणि किती प्रभावी ठरतो? आणि आत्ताच देण्याचा निर्णय भारतानं का घेतला? आणि तुम्हाला जर तो घ्यायचा असेल तर काय करावं लागेल?
एखादा आजार किंवा विषाणू संसर्गासाठी कसं लढायचं हे लस तुमच्या शरीराला शिकवते.
 
बूस्टर डोस म्हणजे काय?
आपण एखाद्या रोगावरची लस घेतो, तेव्हा आपण आपल्या शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीला त्या रोगाशी कसं लढायचं याचं शिक्षण देतो. पण काही वेळा लशीचे एकापेक्षा जास्त डोस घ्यावे लागतात.
लशीचा प्राथमिक डोस घेतल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रत्येक डोसला 'बूस्टर डोस' असं म्हटलं जातं. लशीचा प्राथमिक डोस घेतल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रत्येक डोसला 'बूस्टर डोस' असं म्हटलं जातं.
 
लशीचे प्राथमिक डोस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेली रोग प्रतिकारक शक्ती काही काळाने हळुहळू कमी व्हायला लागते. ही रोग प्रतिकारक्षमता पुन्हा वाढवण्यासाठी लशीचा बूस्टर डोस दिला जातो. यामुळे रोग प्रतिकारक्षमा दीर्घकाळ टिकायला मदत होते असं संशोधनातून समोर आलंय.
 
हे काहीसं आपल्या शाळेसारखंच आहे, असं बीबीसीचे आरोग्य आणि विज्ञान विषयाचे पत्रकार जेम्स गॅलॅगर सांगतात.
 
जेम्स सांगतात, "पहिला डोस म्हणजे आपली प्राथमिक शाळा, ज्यात आपल्याला अक्षरओळख होते, अनेक विषयांचं प्राथमिक ज्ञान मिळतं. पण ते पुरेसं नसतं. म्हणून आपण माध्यमिक शाळेत आणि कॉलेज किंवा विद्यापीठात जातो. लशीचा दुसरा आणि तिसरा म्हणजे बूस्टर डोस त्या कॉलेज आणि विद्यापीठासारखाच आहे."
लस किंवा बूस्टर डोस विषाणूला थांबवू शकतीलच असं नाही, पण त्या विषाणूशी कसं लढायचं यासाठी ते आपल्या शरीराला तयार करतात.
 
बूस्टर डोस कोणाला मिळणार?
अनेक देशांमध्ये सगळ्या नागरिकांना बूस्टर डोस द्यायला सुरुवात झालेली आहे. भारतामध्ये डॉक्टर्स, आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60च्या वर वय असणाऱ्या, सहव्याधी असणाऱ्या लोकांना बूस्टर डोस घेता येईल.
 
60 पेक्षा जास्त वय आणि सहव्याधी असलेल्या लोकांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्लानंतर बूस्टर डोस दिला जाईल.
 
10 जानेवारीपासून बूस्टर डोस द्यायला सुरुवात होणार आहे.
बूस्टर डोस कसा मिळेल?
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि साठ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना तिसरा डोस दिला जाणार आहे.
 
● तुम्ही बूस्टर डोससाठी पात्र असाल, तर तुमच्या कोविन अकाऊंटमार्फतच तुम्हाला हा 'प्रिकॉशन डोस' दिला जाईल. त्यासाठी नव्याने कोविन नोंदणी करण्याची गरज नाही.
 
● दुसरा डोस कधी मिळाला आहे, त्याआधारे तुम्हाला तिसरा डोस कधी मिळेल हे ठरवलं जाईल. दुसरा डोस घेतल्याच्या 9 महिन्यांनंतर तुम्ही बूस्टर डोससाठी पात्र ठराल.
 
● कोविन सिस्टिमद्वारा अशा व्यक्तींना एसएमएस पाठवून कळवलं जाईल.
 
● तुम्हाला असा एसएमएस आल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या डोससाठी नाव नोंदवावं लागेल.
 
● ही नोंदणी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑनसाईट म्हणजे प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन करू शकाल.
 
● तिसऱ्या डोसविषयीची माहिती तुमच्या नव्या लसीकरण प्रमाणपत्रात दिली जाईल.
 
कुठल्या लशीचा बूस्टर डोस घ्यायचा?
बूस्टर डोस देताना लशीचं 'मिक्स अँड मॅच' म्हणजे सरमिसळ करण्यात येणार नसल्याचं केंद्राने स्पष्ट केलंय. लोकांनी ज्या लशीचे प्राथमिक डोस घेतले असतील त्यांना त्याच लशीचा बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केलंय.
म्हणजेच ज्यांनी यापूर्वी कोव्हिशील्डचे दोन डोस घेतले असतील त्यांना कोव्हिशील्डचाच तिसरा - बूस्टर डोस मिळेल. तर कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना त्याच लशीचा बूस्टर डोस देण्यात येईल.
 
कोव्हिड 19 होऊन गेलेल्यांनीही बूस्टर डोस घ्यावा का?
एखाद्या व्हायरसचा संसर्ग होऊ गेल्यावर शरीराला त्या व्हायरसशी कसं लढायचं हे माहित झालेलं असतं. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन गेला असेल तर अशा लोकांच्या शरीरात या व्हायरसविरोधी अँटीबॉडीज - प्रतिपिंड तयार होतात. बूस्टर डोस घेतल्याने शरीरातली रोग प्रतिकारशक्ती दीर्घकाळ सक्षम राहते. त्यामुळे कोव्हिड होऊन गेल्यानंतर काही दिवसांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार बूस्टर डोस घ्यावा.