मुंबईत २० हजारपेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण राज्यात ४१ हजार ४३४ कोरोनाबाधितांची नोंद
मुंबईत सलग तीन दिवस कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांवर स्थिरावला आहे. गेल्या २४ तासात मुंबईत २० हजार ३१८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक वेगाना कोरोनाचा संसर्ग मुंबईत पसरतो आहे. यामुळेच मुंबईत सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा कोरोनाबाधितांची नोंद २० हजारहून अधिक झाली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची नोंद अधिक होत असली तरी जास्तीत जास्त बाधितांमध्ये लक्षणे आढळले नाहीत अशी माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.
बांद्रा येथील सीबीआयच्या इमारतीमध्ये ६८हून जास्त अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सीबीआय कार्यालयातील २३५ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती यामध्ये ६८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ६ हजार ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनावर मात केलेल्या एकूण रुग्णांची संख्या ७ लाख ७० हजार ५६ आहे. अशा प्रकारे बरे होणाऱ्या रुग्णांचा मुंबईतील दर ८६ टक्के आहे. मुंबईत सध्या एकूण १ लाख ६ हजार ३७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्ण दुप्पटीचा दर ४७ दिवसांवर आला आहे. १ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीतील कोरोना वाढीचा दर १.४७ टक्के झाला आहे.
राज्यात ४१ हजार ४३४ कोरोनाबाधितांची नोंद
राज्यात गेल्या २४ तासात ४१ हजार ४३४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आज ९,६७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ५७ हजार ०८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३७ टक्के झाले आहे. गेल्या २४ तासात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ८,४५,०८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.