आयसीआयसीआय व्हेंच्युअरचे कर्मचारी आणि कंपनीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपये
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दानशूर व्यक्ती व् संस्था, संघटनाकडून निधी देण्याच ओघ सुरु आहे. यात आज आयसीआयसीआय व्हेंच्युअरने एक कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योगदानाबद्दल आयसीआयसीआय व्हेंच्युअर कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या सहृद्यतेचे स्वागत करतानाच त्यांचे आभार मानले आहेत.
आयसीआयसीआय व्हेंच्युअरच्या कर्मचाऱ्यांचे आणि कंपनीचे योगदान असे एकत्रित सुमारे एक कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड१९ या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
आयसीआयसीआय बँक संचलित आयसीआयसीआय व्हेंच्युअर फंडस मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडची १९८८ मध्ये स्थापना झाली आहे. ही कंपनी गुंतवणूक क्षेत्रातील अग्रगण्य मानली जाते.
कंपनीतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसापासून ते काहींनी एक महिन्याचे वेतन या निधीसाठी दिले आहे. या रकमेत कंपनीनेही भर घालून एक कोटी रुपयांचा एकत्रित निधी सुपूर्द केला आहे. यातून राज्यातील आणि मुंबईतील जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात सहभागी होता येत असल्याची भावना आयसीआयसीआयचे व्हेंच्युअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक प्रशांत पूरकर यांनी व्यक्त केली आहे.