1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मे 2020 (16:20 IST)

रत्नागिरी जिल्ह्यात घरपोच मद्यविक्रीला परवानगी

online order
महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात घरपोच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हे आदेश देणारं परिपत्रक बुधवारी काढलं आहे. या आदेशांनुसार रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेत येणाऱ्या एफएल २, सीएलएफएलटिओडी ३ आणि एफएलबीआर २ या किरकोळ दारूविक्री परवानाप्राप्त दुकानदारांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सीलबंद मद्याची विक्री ग्राहकाला घरपोच करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच, मद्याची ऑर्डर देण्यासाठी दुकानदारांनी गुगल फॉर्म, दूरध्वनी, मोबाईल, व्हॉट्सअॅप किंवा वैयक्तिक मेसेजच्या माध्यमातून ऑर्डर देण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, असं देखील सांगण्यात आलं आहे. या आदेशांचं पालन करूनच दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे
 
घरपोच मद्यविक्रीचे नियम आणि अटी…
१) दुकानाच्या दर्शनी भागात मोबाईल क्रमांक, गुगल फॉर्मची लिंक, व्हॉट्सअॅप क्रमांक इत्यादी माहिती मोठ्या अक्षरात लिहिलेला फलक लावावा
 
२) ग्राहकांना मद्यविक्रीची सेवा घरपोच देण्यात येणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रसिद्ध करावी
 
३) अधिकृत किंवा जबाबदार व्यक्तीची माहिती देऊन घरपोच मद्य पुरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकांकडून पास घ्यावा
 
४) मद्यविक्रीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खात्री करावी
 
५) मद्याच्या किंमतीमध्ये एमआरपीवर वाढ होणार नाही याची काळजी घ्यावी
 
६) महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९च्या तरतुदी भंग होणार नाही, याची दक्षता सर्व विक्रेत्यांनी घ्यावी.