गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मे 2020 (06:58 IST)

करोना संसर्गाने पुण्यातील कॉन्स्टेबलचा मृत्यू

मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनानं बळी घेतला असतानाच, काल पुणे पोलीस दलाला मोठा धक्का बसला. पुणे पोलीस दलातील वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या ४३ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा आज करोनानं मृत्यू झाला. पुणे पोलीस दलातील हा दुसरा बळी ठरला आहे.

पुण्यात काल ४३ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा करोनाच्या संसर्गानं मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पुणे पोलीस दलातील वाहतूक विभागात ते कार्यरत होते. १० मे पासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

करोनाबाधित असलेले पोलीस कॉन्स्टेबल हे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांचा मृत्यू झाला. पुणे पोलीस दलातील किमान २६ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यातील १४ पोलीस बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. पुणे पोलीस दलातील हा दुसरा बळी आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ५७ वर्षीय पोलीस अधिकाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला होता.