रविवार, 15 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (15:28 IST)

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी दोन लाख ॲन्टिजेन किट खरेदी

कोरोना तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिकच्या वैद्यकीय विभागाने सादर केलेल्या दोन लाख रॅपिड ॲन्टिजेन किट खरेदीला स्थायी समितीने शुक्रवारी (ता.१) मान्यता दिली.
 
मागील वर्षी ५०४ रुपये दराने खरेदी केलेल्या वादग्रस्त विषयावर मात्र चर्चा झाली नाही.मागील वर्षाच्या मार्च महिन्यात देशात कोरोनाची लाट सुरू झाल्यानंतर तातडीची बाब म्हणून रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किट खरेदी करण्यात आली.पहिल्या व दुसऱ्या लाटेत पाच लाख २, ७५० रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किट खरेदी करण्यात आल्या. नव्या किट खरेदीसाठी काढण्यात आलेल्या निविदेत दरामध्ये जवळपास दहापट तफावत आढळली.
 
मागील वर्षी ५०४ रुपये किमतीला प्रत्येकी एक रॅपिड ॲन्टिजेन किट खरेदी करण्यात आले. महापालिकेने तिसऱ्या लाटेसाठी पुन्हा एकदा ॲन्टिजेन टेस्ट खरेदी करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर ४५ रुपये किमतीला एक किट उपलब्ध झाल्याने किटच्या किमतीमधील तफावतीवरून संशय निर्माण झाला आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जुन्या वादग्रस्त खरेदीवर चर्चा होणे अपेक्षित असताना त्यावर सदस्यांनी मौन बाळगले. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नव्याने दोन लाख किट खरेदीला मात्र मान्यता देण्यात आली.