रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जून 2021 (16:12 IST)

राहुल गांधी: 'कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावे'

काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी भारत सरकारने सज्ज व्हावे असं मत राहुल गांधी यांनी मांडलं.
 
काँग्रेसने कोरोनासंदर्भात श्वेतपत्रिका तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. या श्वेतपत्रिकाचा उद्देश कुणाला नावं ठेवणं नाही तर कोरोना आटोक्यात आणणं हे आहे असं राहुल गांधी म्हणाले
श्वेतपत्रिकेत सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी
 
1. पायाभूत सुविधा तयार करणे आणि ऑक्सिजन तसेच औषधी पुरवणे
 
2. लसीकरण करणे
 
3. गरीब लोकांना आर्थिक मदत करणे.
 
4. कोव्हिडमुळे प्राण गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करणे.
 
अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली.
 
आपले मुद्दे उलगडून सांगताना राहुल गांधी म्हणाले, "दोन-तीन गोष्टी आहेत. संपूर्ण देश जाणतो की, दुसऱ्या लाटेच्या आधी आपल्या शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी दुसऱ्या लाटेबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी जी पावलं सरकारनं उचलायला हवी होती, जे वर्तन सरकारचं असायला हवं होतं, ते दिसलं नाही."
 
"संपूर्ण देशाला दुसऱ्या लाटेचा परिणाम भोगावा लागला. आज आपण पुन्हा तिथेच उभे आहोत. तिसरी लाट येणार असल्याचं संपूर्ण देश जाणतो. विषाणू बदलतोय. तिसरी लाट येईल. त्यामुळे आम्ही पुन्हा सांगतोय की, सरकारनं तिसऱ्या लाटेसाठी पूर्ण तयारी केली पाहिजे. हॉस्पिटल बेड, औषधं, ऑक्सिजन इत्यादी गोष्टींची तयारी केली पाहिजे. दुसऱ्या लाटेत यातलं काहीही केलं नाही, आता तिसऱ्या लाटेसाठी तरी करायला हवी," असं राहुल गांधी म्हणाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहा:कार उडवला होता. त्यावेळी राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. "ऑक्सिजनची प्रचंड कमतरता देशभरात जाणवत आहे. एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प सुरूच आहे," असं ते म्हणाले होते.
 
या प्रकल्पाला स्थगिती देऊन, त्याच पैशानं कोरोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय सुविधांची निर्मिती करण्यासाठी प्राधान्य द्यावं. "कोरोना आता शहरांमध्येच नव्हे, तर ग्रामीण भागातही वेगानं पसरतोय. शहरांनंतर आता गावंही परमेश्वरावरच अवलंबून आहेत," असं राहुल म्हणाले.
 
'आधी खिल्ली उडवली मग आम्ही सांगितलं तेच केलं'
राहुल गांधी यांनी सांगितलं की "काँग्रेसने नेहमी सर्वांच्या भल्याचा विचार करून सूचना दिल्या. डॉ. मनमोहन सिंग यांनी लसीकरणाबद्दल सांगितलं होतं. पण तुम्ही मंत्र्यांकडून त्यांची खिल्ली उडवली. पण नंतर केंद्राने तेच केलं. लसीकरणाचे सार्वत्रिकरण करावे हाच सल्ला आम्ही दिला होता. तो तुम्ही आधी धुडकावून लावला नंतर मात्र तेच केलं."
 
सरकारने भाजपची राज्यं आणि बिगर भाजप राज्य असा भेदभाव न करता सर्वांना समान पद्धतीने मदत पुरवावी असं राहुल गांधी म्हणाले. त्याच बरोबर तज्ज्ञांचा सल्ला वेळोवेळी घेत राहावा असं देखील ते म्हणाले.
 
याआधी राहुल गांधी काय म्हणाले होते?
देशातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडत असल्याने भारताने परदेशातून मदत मागवली होती. ती मदत कुठे गेली, असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला होता.
 
आत्तापर्यंत भारताला कोणकोणत्या गोष्टींचा पुरवठा झाला? त्या गोष्टी कुठे आहेत? त्याचा फायदा कुणाला होत आहे? त्यांचं राज्यांना कशा पद्धतीने वाटप झालं? या सगळ्यात पारदर्शकता का नाही? असे प्रश्न राहुल यांनी सरकारला केले होते.
 
देशातल्या कोव्हिड -19च्या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत असल्याची टीकाही राहुल यांनी केली होती.
त्यावेळी राहुल म्हणाले होते, "कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी झाली तेव्हा सरकारने स्वतःचा विजय जाहीर केला आणि पंतप्रधानांनी नेहमीप्रमाणेच त्याचं श्रेय घेतलं. पण आता ते राज्यांना दोष देत असून कोव्हिडची परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर सरकारने लोकांना आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी राज्यांवर ढकलली आहे आणि सध्याच्या कोव्हिड-19च्या परिस्थितीसाठी पंतप्रधान पूर्णपणे कारणीभूत आहेत."
 
पंतप्रधानांनी स्वतःची प्रतिमा आणि ब्रँड उभारण्याकडे लक्ष दिलं आणि ठोस काही निर्माण करण्याऐवजी आभास निर्माण करण्यावर भर दिला. मोदी सरकार उद्धट असून प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा प्रतिमा निर्माण करण्यावर त्यांचा भर असल्याची टीका राहुल गांधींनी यावेळी केली होती.
 
लशींच्या किंमती आधी जास्त जाहीर करणं आणि नंतर त्या कमी करणं हे 'डिस्काऊंट सेल' सारखं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
 
"सुपरस्प्रेडर ठरू शकणाऱ्या कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी प्रोत्साहन दिलं, त्याविषयी बढायाही मारल्या. कोरोना हा संकटाचा एक भाग आहे, भारतातल्या यंत्रणेकडे लक्ष देण्यात न आल्याने भारताला मोठं संकट हाताळणं कठीण जात आहे.
 
"माध्यमं, न्यायसंस्था, निवडणूक आयोग, अधिकारी यंत्रणा यापैकी कोणीही लक्ष ठेवायचं काम केलं नसून भारताची स्थिती वादळात पुरेशा माहिती अभावी भरकटणाऱ्या जहाजासारखी झाली आहे," या भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या होत्या.