मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 14 एप्रिल 2020 (15:44 IST)

राज ठाकरे यांनी लक्षात आणून दिली 'ही' महत्वाची गोष्टी

लॉकडाउनमुळे गरजूंना मदत करण्यासाठी सरकारबरोबर राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, पक्षांचे कार्यकर्ते समोर येत आहेत. वेगवेगळ्या स्वरूपात मदत करत असून, याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका निवेदन प्रसिद्ध करत कौतुक केलं आहे. त्याचबरोबर ही मदत करत असताना कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या प्रसिद्धीच्या प्रयत्नांवर बोट ठेवलं आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ?
सस्नेह जय महाराष्ट्र,
कोरोनाच्या ह्या महासंकटाच्या परिस्थितीशी संपूर्ण महाराष्ट्र एकत्रितपणे झुंजत आहे आणि त्यात महाराष्ट्र सैनिक देखील जमेल त्या पद्धतीने कार्यरत आहेत. लोकांच्या मदतीला धावून जात आहेत. त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करत आहेत. अर्थात राज्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटात महाराष्ट्र सैनिक धावून जातोच आणि तो आत्ताही जात आहे ह्याचा मला अभिमान आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन.

या मदतकार्याची छायाचित्रं [email protected] वर येत आहेत. जे मी व्यक्तिशः पाहत आहे आणि त्यातील जास्तीत जास्त कामांना एमएनएस अधिकृतवर प्रसारित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्याचा उद्देश इतकाच की त्या त्या भागातील लोकांना काही गरज असल्यास कोणाशी संपर्क साधावा हे कळावं.

पण या सगळ्यात एक बाब जाणवली ती म्हणजे त्यातले काही मोजके जण कॅमेऱ्याकडे बघून मदतकार्याची छायाचित्रं काढणे, ज्याला मदत दिली जात आहे त्याला कॅमेऱ्यात बघण्यास सांगणे किंवा गॉगल लावून मदतकार्य करतानाची छायाचित्रं काढणे या चुकीच्या गोष्टी करत आहेत.

आपण ज्याला मदत करतो आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला अधिक लाजवत नाही आहोत का? मुळात प्रत्येक माणूस स्वाभिमानी असतो आणि शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं पण आज प्रसंग बाका आहे. त्यामुळे तो नाईलाजाने मदत स्वीकारत आहे. अशा वेळेस त्याची छायाचित्रं काढून त्याची मान शरमेने खाली घालणं कितपत योग्य आहे? तसंच मदतकर्त्याने देखील कॅमेऱ्यात बघत फोटो काढणं हे देखील सुद्धा योग्य आहे का?

या कठीण प्रसंगात फक्त महाराष्ट्र सैनिकच नाहीत, तर सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते देखील मनापासून मेहनत घेत आहेत. मदतीला धावून जात आहेत. त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. माझं त्यांना पण आवाहन आहे की, तुम्ही देखील ह्याचा विचार करावा. महाराष्ट्राची निरपेक्ष सेवेची परंपरा मोठी आहे, त्या परंपरेचं पुन्हा एकदा दर्शन आपण सगळ्यांनी जगाला दाखवूया.