शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मे 2020 (08:31 IST)

वाचा, पुण्यात काय परीस्थिती आहे ?

कोरोना बाधित रुग्ण किती आहेत? किती जणांना मिळाला डिस्चार्ज
पुण्यात सलग पाचव्या दिवशी अर्थात सोमवारी कोरोनाचे आणखी 50 रुग्ण बरे झाले आहे. या पाच दिवसांत जवळपास अडीचशे तर आतापर्यंत 483 रुग्ण ठणठणीत झाले आहे. तर नव्या रुग्णांची संख्या कमी होऊन सोमवारी ती 61 पर्यंत आली आहे. विविध रुग्णालयांत सध्या 1 हजार 288 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनाने 107 जणांचा जीव घेतला आहे. 
 
विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या 76 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. पद्मावतीतील 63 वर्षांच्या पुरुषाला कोरोना झाल्याने त्यांना रविवारी (ता.3) रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. या व्यक्तीला न्युमोनिया आणि अन्य आजार होते. येरवड्यातील 61 वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला असून, त्यांना कोरोना झाल्याचे रविवारी निष्पन्न झाले होते. त्यानंतर सोमवारी मृत्यू झाला. त्यांना न्युमोनिया, उच्चरक्तदाब हदयरोगाचा त्रास होता.
 
येरवडा परिसरातील 50 वर्षाच्या महिलेला कोरोना झाल्याने त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, हदयाचा आणि उच्चरक्तदाबाचा आजार होता. लोहियानगरमधील 65 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात आतापर्यंत 10 हजार 859 नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 9 हजार 9 हजार 116 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, आतापर्यंत 1 हजार 878 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 483 बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 107 जणांचा जीव गेला आहे. 
 
पुणे शहर पोलिस दलातील एका सहायक पोलिस उपनिरीक्षकावर कोरोनाचे उपचार सुरु असताना त्यांना वीरमरण आले आहे. सोमवारी  दुपारी दोन वाजता भारती विद्यापीठ रुग्णालयात पोलिसाचा मृत्यू झाला. शहराच्या मध्यवर्ती भागातील एका पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले दिलीप पोपट लोंढे (वय ५८) यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर आठ दिवसांपासून भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी दुपारी दोन वाजता त्यांना वीरमरण प्राप्त झाले. 
 
लोंढे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा मदतनिधी दिला जाणार आहे, असेही वेंकटेशम यांनी सांगितले. दरम्यान, लोंढे यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार असल्याचे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. पुणे पोलिस दलामध्ये कोरोनामुळे मृत्यु होण्याची ही पहिलीच घटना आहे. 
 
ससून रुग्णालयात नर्स आणि वरिष्ठ डॉक्टर यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आता ससूनच्या कोविड इमारतीच्या येथील एका सुरक्षा जवानाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला येथील पॉझिटिव्ह वॉर्ड मध्ये दाखल केले असून त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 
 
ससूनमध्ये महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएसएफ) सुमारे 50 ते 60 सुरक्षा जवान रुग्णालयात ठिकठिकाणी तैनात आहे. ससूनची नवीन 11 मजली इमारत कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी देण्यात आली असून तिला 'कोविड हॉस्पिटल' असेही म्हटले जाते. या इमारतीमध्ये 100 पेक्षा अधिक रुग्ण दाखल असून त्यावर उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्ह आलेला जवान या इमारतीच्या ग्राउंड फ्लोरला असलेल्या ओपीडीमध्ये आणखी एका जवानासोबत तैनात होता. 
 
या जवानाने येथे काही दिवस ड्युटी केल्यावर त्याला दुसऱ्या ठिकाणी ड्युटी देण्यात येणार होती. त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती पण बाधित रुग्णाच्या इमारतीमध्ये कार्यरत असल्याने त्याच्या स्वॅबची तपासणी केली असता त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यासोबत आणखी दोघांची चाचणी केली आसून त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. 
 
कोरोनामुक्तीसाठी प्रशासन काय करत आहे ?
पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यक बेड्स आणि वैद्यकीय सुविधा निर्माण कराव्यात. तसेच, नागरिकांना एक खिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
 
पुणे विभागातील पुणे शहरासोबतच सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी प्रशासनाच्यावतीने सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत ससून रुग्णालयात सोमवारी आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता मुरलीधर तांबे, निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ.सुभाष साळुंके आदी या वेळी उपस्थित होते.
 
आरोग्य मंत्री टोपे म्हणाले...
 
- सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता
- एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व सेवा एकाच ठिकाणी द्यावात
- कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत
- आरोग्य विभागातील रिक्त पदाची भरती तातडीने करावी
- कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक सर्व सुविधा द्याव्यात
- डॉक्टर, नर्सेस आणि वार्डमधील सफाई कामगारांना आवश्यक सोयीसुविधा द्यावात
- विलगीकरण कक्षातील नागरिकांना जेवण, पिण्याच्या पाण्याची सोय करावी
- स्वच्छतागृह आणि परिसरातील साफसफाईकडे विशेष लक्ष द्यावे
- कोरोना संशयित रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये 
 
पुणेकरांना कुठल्या सवलती मिळाल्या आहेत? 
- पुण्यात तिसरा लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्राचा भाग कमी करण्यात आला असून ज्या भागात आता करोना पॉझिटिव्ह रुग्ण जवळपास नाहीत, अशा भागांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये चार महत्वाच्या सवलती देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. 
 
आयुक्त गायकवाड म्हणाले, लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरु होत असताना आपण एक संतुलित गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, शहरातील ८४ चौकिमी प्रतिबंधित क्षेत्र कमी करुन ते आता १० चौकिमीपर्यंत कमी केलं आहे. याचा फायदा प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरच्या भागाला होईल. ज्या भागामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत, अशा भागामध्ये चार महत्वाच्या सवलती पहिल्या टप्प्यामध्ये देण्यात आल्या आहेत. यामध्ये 
 
१) वैयक्तिक स्वरुपाची वाहनं लोक वापरु शकतील. फोर व्हिलरमध्ये चालकासह मागे दोन व्यक्ती बसू शकतील. वैयक्तिक दुचाकीसाठी एकाच माणसाला परवानगी देण्यात आली आहे.
२) ई-कॉमर्सला सवलत देण्यात आली आहे.
३) कन्स्ट्रक्शनला सवलत देण्यात आली आहे.
४) रहिवासी क्षेत्रातील वैयक्तिक स्वरुपाची सर्व दुकानं उघडी राहतील, यामध्ये अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेली दुकानं असा फरक होणार नाही.
मात्र, लक्ष्मी रोडसारख्या संपूर्ण शॉपिंग एरियामध्ये सर्व अत्यावश्यक नसलेली दुकानं चालू राहतील. तसेच एका रस्त्यावर पाच अत्यावश्यक वस्तूंची दुकानं चालू राहतील. याचं नियोजन स्थानिक पोलीस करणार असून त्यांना महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर मदत करणार आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुक, कॅब, ऑटो रिक्षा आणि बसेसला अद्याप परवानगी दिलेली नाही. पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना तात्काळ सुरु करता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
 
- पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील उद्योग सुरू करण्यासाठी कोणत्याही औपचारिक परवानगीची, पासेसची गरज नाही. प्रतिबंधित क्षेत्रातील कोणत्याही कामगार किंवा कर्मचाऱ्याला कामावर जाण्याची किंवा प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.  उर्वरित क्षेत्रातील कामगारांनी सोबत आपले ओळखपत्र बाळगावे. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कामगार किंवा कर्मचारी यांची वाहतूक करण्यासाठी औद्योगिक आस्थापना, उद्योग कारखान्यांनी खास वाहतूक व्यवस्था (डेडीकेटेड ट्रान्सपोर्ट ॲरेंजमेंट) करायला हवी, असे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.