मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (16:14 IST)

Omicron Varient रोखण्यासाठी कोरोना लशीचा तिसरा डोस हवा- शास्त्रज्ञ

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन रोखण्यासाठी कोरोना लशीचे दोन डोस पुरेसे ठरणार नाहीत असं ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंट रोखण्यात कोरोना लस किती परिणामकारक ठरते यासंदर्भात ब्रिटनमध्ये विश्लेषण सुरू आहे. या अभ्यासाच्या सुरुवातीच्या निष्कर्षातून हे स्पष्ट झालं आहे.
कोरोना लशीच्या दोन डोसनंतर देण्यात आलेला बुस्टर डोस कोरोनाच्या व्हेरियंटला रोखण्यात कार्यक्षम ठरत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
ब्रिटनच्या आरोग्यविषयक यंत्रणेनं 581 ओमिक्रॉन व्हेरियंट तसंच हजारो डेल्टा केसेसचा अभ्यास केला. या व्हेरियंटवर कोरोना लस किती प्रभावी ठरतेय यासंदर्भात पाहणी करण्यात आली.
ओमिक्रॉन व्हेरियंट वेगाने म्यूटेट होत आहे. त्यामुळे लशीचा परिणाम होतो आहे का याचा अभ्यास करणं आवश्यक झालं आहे.
विकसित देशांच्या मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत ब्रिटनचे सचिव मायकेल गोव्ह यांनी ब्रिटन कठीण परिस्थितीला तोंड देत असल्याचं सांगितलं.
आपात्कालीन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ओमिक्रॉन व्हेरियंट आढळल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्यात आली मात्र ओमिक्रॉनला रोखण्यासाठी आणखी काय करता येईल यासंदर्भात काम सुरू आहे.
डेटाच्या माध्यमातून जी नवी माहिती समोर येते आहे त्यानुसार कार्यवाही करू असं सरकारने म्हटलं आहे.
ब्रिटनमध्ये शुक्रवारी ओमिक्रॉन व्हेरियंट आढळलेले नवे 448 रुग्ण आढळले. ओमिक्रॉन व्हेरियंट आढळलेल्या रुग्णांची एकूण संख्या 1265 एवढी झाली आहे.
शुक्रवारी ब्रिटनमध्ये कोरोनाचे एकूण 58,194 रुग्ण आढळले. 9 जानेवारीनंतर आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत.
 
ओमिक्रॉन सगळ्यात आधी कुठे आढळला?
B.1.1.529 अर्थात ओमिक्रॉन हा कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबरला शोधण्यात आला होता. म्हणजे खरंतर आठवडाभरापूर्वीच या कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकाराविषयी जगाला माहिती मिळाली आहे.
लगेचच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. या विषाणूवर सध्याच्या लशींचा किती प्रभाव पडतो आहे? भारतातलं लसीकरण या विषाणूला परतवून लावू शकतं का? याच प्रश्नांची उकल करण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्यांना होणारा आजार किती गंभीर स्वरूपाचा आहे? याविषयीचं चित्र अजून स्पष्ट व्हायचं आहे. पण पहिल्यांदा या विषाणूविषयी जगाला इशारा देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डॉ. अँजेलिक कोट्झे यांनी नोंदवलेलं एक प्राथमिक निरीक्षण दिलासा देणारं आहे.
 
डॉ. कोट्झे यांच्या सुरुवातीच्या निरीक्षणानुसार, लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांपेक्षा लस न घेतलेल्यांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण जास्त आहे.
अर्थात आत्ताच कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही, कारण हे प्रमाण नेमकं काय आहे याची पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

जागतिक आरोग्य संघटना काय सांगते?
जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयसिस यांनीही खबरदारीची भूमिका घेतली आहे.
घेब्रेयसिस म्हणतात की, "ओमिक्रॉनविषयी अभ्यास सुरू असून येत्या काही दिवसांत आणि आठवड्यांत हे चित्र आणखी स्पष्ट होईल."
तर WHO नं आपल्या वेबसाईटवरील निवेदनात स्पष्ट केलं आहे की, "लशीसह सध्याच्या प्रतिबंधात्मक उपायांवर या नव्या व्हेरियंटचा काय परिणाम होतो आहे, याचा तपास सुरू आहे."
"सध्या उपलब्ध असलेल्या लशी कोव्हिडमुळे गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका कमी करण्यात प्रभावी ठरत आहेत. सध्या सर्वाधिक प्रचलित असलेल्या डेल्टा व्हेरियंटविरोधात लशींची भूमिका महत्त्वाची आहे."
 
लसीकरणाचा ओमिक्रॉनवर किती परिणाम होतो?
डेल्टाच नाही, तर अल्फा, बीटा आणि गॅमा या कोरोनाविषाणूच्या अन्य चिंताजनक प्रकारांवरही लस प्रभावी ठरते आहे.
लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही कोरोना विषाणूची लागण होऊ शकते, हे आतापर्यंत स्पष्ट झालं आहे. पण लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये गंभीर आजार आणि मृत्यूचं प्रमाणही कमी असल्याचं वेगवेगळ्या तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.
ओमिक्रॉनवर सध्याच्या लशी कितपत प्रभावी ठरतील, हे अजून स्पष्ट नसलं, तरी लशीमुळे गंभीर आजाराचा धोका किमान काही प्रमाणात कमी होऊ शकतो, याविषयी जगभरातल्या तज्ज्ञांचं एकमत असल्याचं दिसतं.
महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनीही बीबीसीशी बोलताना हा मुद्दा मांडला आहे.
 
"लशीमुळे शरीरात असलेल्या टी सेल्स, ज्याला मेमरी टी-सेल्स म्हणतात. या पेशींच्या स्मरणशक्तीत व्हायरसचे गुणधर्म रहातात. त्यामुळे त्या त्यांचा प्रतिकार करण्यास सक्षम होतात. लस घेतल्यामुळे कोरोना होत नाही असं नाही. पण, संसर्ग झालाच तर तो अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. लस किती प्रभावी आहे यात आपण जायला नको. प्रत्येकाने लस घेतली पाहिजे," असंही डॉ. ओक नमूद करतात.
 
ओमिक्रॉनवर नवी लस तयार करावी लागेल का?
ओमिक्रॉनमध्ये अनेक नवी म्युटेशन्स आहेत आणि त्यामुळेच कदाचित आपल्याला लशीतही बदल करावे लागू शकतात, असं काही तज्ज्ञांना वाटतं.
 
नव्या व्हेरियंट्सचा धोका पाहता, संशोधक आधीपासूनच त्यावरच्या लशींवर कामही करत आहेत. कोरोनाविषाणूच्या अशा वेगवेगळ्या प्रकारांवर प्रभावी ठरणारी मल्टीव्हेलंट व्हॅक्सिन तयार करण्याविषयी संशोधनही सुरू आहे.
अशा अपडेटेड व्हॅक्सिनची म्हणजे नव्या लशीची गरज असेल तर ती काही आठवड्यांत चाचणीसाठी तयार होऊ शकते आणि तुलनेनं लवकर लोकांसाठी उपलब्धही होऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.
 
नव्या व्हेरियंटवर नवी लस तयार करण्याविषयी डॉ. ओक सांगतात की, "व्हायरस आणि लस यांचं द्वंद्व वैद्यकीय क्षेत्रात कायम सुरू असतं. लशीनुसार व्हायरस आपलं स्वरूप बदलतो. त्यामुळे लशीला कमी प्रमाणात दाद द्यायला लागतो. व्हायरससोबत संशोधनातून लसनिर्मितीही बदलते."
 
ओमिक्रॉनचा धोका परतवायला भारत सज्ज आहे का?
सध्या बहुतांश देशांत आणि भारतही बहुतांश ठिकाणी प्रवेशासाठी लशीचे दोन्ही डोस होणं आवश्यक आहे. तर काही ठिकाणी निगेटिव्ह आरटीपीसीआर सर्टिफिकेटही बंधनकारक आहे.
पण तरीही अनेकांनी अजून लस घेतलेली नाही. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ऑक्सफर्ड मार्टिन स्कूलनं जमा केलेली माहिती सांगते, की जगभरात जवळपास 55 टक्के लोकांना लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. पण जगभरातील देशांमध्ये लसीकरणाचं प्रमाण वेगवेगळं आहे.
भारतातही 30 नोव्हेंबरपर्यंत लशीचे एक अब्ज 23 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. पण त्यात लशीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या जवळपास 44.8 कोटींच्या पुढे आहे. म्हणजे देशात सुमारे 36.2 टक्के लोकांचंच लसीकरण पूर्ण झालं आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य विभाग आणि कोविन वेबसाईटवरून घेतली आहे.
सिंगापूर, स्पेन, जपान, इटली, जर्मनी, युके, यूएसए, अशा देशांच्या तुलनेत हे प्रमाण बरंच कमी आहे. (ऑक्सफर्ड मार्टिन स्कूल, ऑक्सफर्ड विद्यापीठाची आकडेवारी)
महाराष्ट्राचा विचार केला, तर राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 80 टक्के लोकांनी कोरोनाविरोधी लशीचा पहिला डोस घेतलाय. तर, लशीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र, फक्त 40 टक्क्यांच्या आसपास आहे.
भारतात लसीकरणाचं प्रमाण कमी का आहे, यामागे अनेक कारणं आहेत, ज्याविषयी इथं वाचू शकता.
पण थोडक्यात सांगायचं, तर भारतात पुरेसं लसीकरण अजून झालेलं नाही, त्यामुळे नव्या व्हेरिटयंटमुळे पुन्हा साथ पसरण्याची भीती अजूनही कायम आहे. त्यामुळेच लसीकरणाचा वेग वाढवायला हवा असं तज्ज्ञांना वाटतं.
डॉ. संजय ओक यांनी तर बूस्टर डोसचीही मागणी केली आहे. ते म्हणतात,
"टास्कफोर्सने सातत्याने बूस्टर डोस आणि तिसऱ्या डोसची मागणी केलीये. राज्यानेही केंद्राकडे ही मागणी लावून धरलीये. दोन डोस घेतल्यानंतरही लोकांना कोरोना झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आरोग्यक्षेत्रात काम करणारे आणि सहव्याधी असलेल्यांना तिसरा डोस द्यावा असा आमचा आग्रह आहे."
दरम्यान कोविन अॅपमध्ये रजिस्टर न करता हा डोस कोणीही घेऊ नये, असा इशाराही डॉ. ओक देतात.