1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (16:33 IST)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची मुलांना अधिक धोक्याची भीती अनाठायी - प्रदीप आवटे

The third wave of corona is more dangerous for children - Pradip Awate maharashtra news coronavirus news in webdunia marathi
कोव्हिडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती समाजामध्ये पसरलेले दिसते. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना अधिक बाधा होईल या भाकिताला कोणताही ठोस शास्त्रीय आधार आहे,असं म्हणता येणार नाही, असं आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी म्हटलं आहे.
 
डॉ. प्रदीप आवटे यांनी त्यांचा मुद्दा मांडताना केलेलं विश्लेषण खालील प्रमाणे, 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण होत आहे, त्यामुळे विषाणू स्वतःमध्ये बदल करून लहान मुलांमध्ये शिरकाव करेल, असा एक तर्क आहे. या तर्काला कोणताही आधार नाही.
बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेने देखील हे स्पष्ट केलं आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्सने याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे. त्यात ते म्हणतात - • तिसऱ्या लाटेची शक्यता आहे पण ती कधी येईल आणि किती तीव्र असेल या बाबत अनुमान करणं कठीण आहे.• मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनाही कोव्हिड होण्याची भीती असते पण तिसऱ्या लाटेमध्ये मुलं सर्वाधिक बाधित होण्याची शक्यता अगदीच कमी आहे. • 90 टक्के मुलांमधील कोव्हिडसौम्य स्वरूपाचा असतो. गंभीर कोरोनाचे प्रमाण मुलांमध्ये अत्यल्प आहे.• काही मुलांना आयसीयूची गरज लागू शकते, पण त्यांचं प्रमाण फार मोठं नाही आणि ती तयारी आपण करत आहोत.
लहान मुलांमध्ये या विषाणूच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे विशिष्ट रिसेप्टर विकसित झालेले नसतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फार गंभीर आजार उद्भवताना दिसत नाहीत. सध्या माध्यमं राज्यातील किंवा एखाद्या जिल्ह्यातील बाधित मुलांची संख्या सांगून बातम्यांची हेडलाईन्स बनवताना दिसत आहेत. मुळामध्ये मागील सहा महिन्यांमध्ये पाच वर्षांखालील मुलांचे कोव्हिडमुळे बाधित होण्याचं प्रमाण प्रत्येक महिन्यामध्ये साधारणपणे एकूण रुग्णांच्या एक ते दीड टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहिलं आहे.
हे आजही बदलताना दिसत नाही तथापि जेव्हा एकूण रुग्ण संख्या दोन लाखांवरून दहा लाखांवर जाते तेव्हा स्वाभाविकच दोन लाखापेक्षा दहा लाखातील दीड टक्का हे निव्वळ संख्येमध्ये अधिक असतात, हे आपण लक्षात घेत नाही. मागील सहा महिन्यात एकूण कोव्हिड रूग्ण संख्येच्या तुलनेत वेगवेगळ्या वयोगटातील मुलांच्या प्रमाणात फारसा बदल झालेला दिसत नाही. म्हणजेच मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाण स्थिर आहे. त्यात कोणतीही वाढ झालेली नाही.सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं जरी कोव्हिडबाधित झाली तरी त्यांच्यामध्ये प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत गुंतागुंतीचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे.
 
आपण अगदी मे महिन्याचं उदाहरण घेतले तरी अठरा वर्षाखालील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण 0.07 एवढं आहे.
धारणपणे दहा हजार मुलांना हा आजार झाला तर त्यातील एकाचा मृत्यू होतो,असं हे सर्वसाधारण प्रमाण आहे. ज्या मुलांना इतर अतिजोखमीचे आजार आहेत त्यांच्यामध्ये अशी गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते.
लहान मुलांमध्ये कोव्हिडचं प्रमाण वाढू शकतं हे भाकित मनावर घेऊन आपण त्या अनुषंगाने तयारी करतो आहोत ही चांगली गोष्ट आहे.
कोणतीही तयारी वाया जात नाही. परंतु त्यामुळे लहान मुलं असणाऱ्या पालकांमध्ये आणि एकूणच समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणं फारसं हितावह नाही.
आपण काळजी घ्यावयाची आहेच. आपल्या मुलांचं नियमित लसीकरण पूर्ण झालं आहे ना, याची खात्री करून घ्या. राहिलेल्या लसी नक्की आणि वेळेत पूर्ण करा.
तिसऱ्या लाटेच्या भीतीने उगीच मुलावर नको ती बंधने घालू नका आणि स्वतः ही घाबरून जाऊ नका.