'ते' ५ कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले
कोकणातील चिपळूण येथे व रायगडमधील महाड येथे काही दिवसांपूर्वीच पूरस्थिती निर्माण होऊन दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने मुंबई महापालिकेने ४०० कर्मचारी व अधिकारी यांचे पथक,साधन,सामुग्रीसह पाठवले होते. त्यापैकी १४५ कर्मचारी मुंबईत परतले असून त्यांच्यापैकी ५ कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यांच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यासंदर्भातील माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेने आपत्कालीन पथक, कामगार,डॉक्टर,नर्स,वार्डबॉय,पाणीपुरवठा,मलनि:सारण विभागाचे कर्मचारी आदीं ४०० जणांची छोटी,मोठी पथके आवश्यक मदत सामग्रीसह पूरग्रस्त,दुर्घटनास्थळी रवाना केली होती. त्यापैकी १४५ कर्मचारी मुंबईत परतले. त्यांची सेव्हन हिल रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता त्यांपैकी ५ कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने त्यांवर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.