ठाण्यात डेल्टा व्हेरियन्टचा शिरकाव, ४ रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क
कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचे नवे संकट राज्यासमोर उभे ठाकले आहे.नाशिक,मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही डेल्टा संसर्गाचा शिरकाव झाल आहे.ठाण्यात आज डेल्टा संसर्गाची बाधा झालेले चार रुग्ण आढळले आहेत.संबंधित सर्व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण आढळल्यानंतर ठाणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.आज ठाणे परिसरात आढळलेल्या एकूण चार डेल्टा व्हेरिअंट बाधित रुग्णांमध्ये २५ वर्षांखालील ३ रुग्ण आहेत,तर एक रुग्ण ५३ वर्षांचा आहे.नाशिक आणि मुंबई पाठोपाठ ठाण्यात डेल्टा व्हेरिअंटने धडक मारल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण तयार झाले आहे.पण नागरिकांनी काळजी करण्याचं काहीही कारण नाही, कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेशी आणि डेल्टा व डेल्टा प्लस व्हेरिअंटशी लढण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिअंट हा कोरोना विषाणूचाच प्रकार असला तरी, हा व्हेरिअंट अन्य व्हेरिअंटच्या तुलनेत जास्त संसर्गजन्य आहे. तसेच या व्हेरिअंटची बाधा झाल्यास रुग्णाला तातडीनं लक्षणं दिसायला सुरू होतात. त्यामुळे आपल्यासोबत आपल्या कुटुंबीयांचे देखील आरोग्य धोक्यात येते.प्रशासनाने कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सर्व तयारी केली असली तरी, आपल्या प्रियजनांना डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग होऊ नये त्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. पवारांनी सांगितले आहे. नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे. संबंधित चार रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आणि मित्र परिवार यांच्याशी संपर्क साधून त्यांची चाचणी केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.