बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑगस्ट 2021 (16:41 IST)

कोरोना लस: कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचा संमिश्र डोस परिणामकारक - ICMR

आयसीएमआरनुसार, कोव्हिडवरील दोन लशी- कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांना एकत्र केलेल्या मिश्रणाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत .
 
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, एका अभ्यासात अॅडनोव्हायरस व्हेक्टर प्लॅटफॉर्मआधारित लशी आणि निष्प्रभ झालेल्या व्हायरसापासून बनवण्यात आलेल्या लशी या केवळ सुरक्षितच नव्हे अँटीबॉडी शरीरात तयार होण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत.
 
देशात आतापर्यंत 50 कोटींहून अधिक नागरिकांना लशीचे डोस देण्यात आले आहेत.
 
जर लशीचा पहिला डोस कोव्हिशिल्डचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिन लशीचा दिला तर? हे फायद्याचं ठरू शकतं की घातक? हे प्रश्नं आता सामान्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांना पडले होते.
 
कारण काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात एका गावातील 20 लोकांना पहिला डोस कोव्हिशिल्ड लशीचा देण्यात आला होता आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा.
 
औदाही कालान गावातले हे सगळे लशीचे लाभार्थी 45 वर्षांवरील वयोगटातले होते. 1 एप्रिलला पहिला डोस घेतल्यानंतर जेव्हा ते 14 मे रोजी दुसरा डोस घ्यायला गेले होते, तेव्हा इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे रेकॉर्ड न पाहता त्यांना कोव्हॅक्सिन दिली.
 
त्यावरून अनेकांनी चिंता व्यक्त केली होती आणि काही काळ मोठा गदारोळही झाला. मात्र, सुदैवाने या गावकऱ्यांमध्ये काही मोठे दुष्परिणाम पाहायला मिळाले नाहीत.
 
दोन वेगवेगळ्या लशींचे डोस दिल्याने फायदा होतो की नुकसान?
अमेरिका, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स आणि इतर काही युरोपीयन देशांनी सध्या ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या लशीच्या डोसनंतर फायझर किंवा मॉडर्ना देण्यास सुरुवात केली आहे, तर स्पेन आणि युकेमध्ये याबाबत अजूनही संशोधन सुरू आहे.
 
ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या लशीच्या डोसनंतर फायझरची लस दिल्यानंतर प्रौढांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचे साइड इफेक्टस आढळून आल्याचं एका अभ्यासातून आढळून आलं आहे.थंडी वाजणं, डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना होणं अशाप्रकारची लक्षणं दोन वेगवेगळ्या लशींचे डोस दिल्यानंतर दिसून आली. याव्यतिरिक्त धोकादायक ठरतील अशा प्रकारची कोणतीही तीव्र लक्षणं दिसून आली नाहीयेत.
 
"या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष हे कुतूहल वाढवणारे असून अशा परिणामांची आम्हाला निश्चितच अपेक्षा नव्हती," असं ऑक्सफर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे प्रोफेसर मॅथ्यू स्नेप यांनी म्हटलं.
 
फेब्रुवारी महिन्यात कॉम-कॉव्ह संशोधनाला सुरूवात करण्यात आली होती. यामध्ये वेगळ्या लशीचा दुसरा डोस दिला तर जास्त काळ टिकणारी प्रतिकारक्षमता निर्माण होते का,दोन वेगवेगळ्या डोसमुळे नवीन व्हेरिएंट्सविरूद्ध संरक्षण मिळतं का किंवा एखाद्या लशीचा पुरवठा अपुरा असेल तर रुग्णालयांमध्ये दुसरी लस वापरण्याची परवानगी देता येईल का अशा वेगवेगळ्या बाबींवर अभ्यास करण्यात आला.
 
कॅनडामधील ओन्टारियो आणि क्युबेक या दोन्ही प्रांतांनी येत्या काळात दोन वेगवेगळ्या लशींचे डोस देण्याची योजना असल्याचं स्पष्ट केलं होतं. ऑक्सफर्ड-अस्ट्राझेन्का लशींच्या पुरवठ्यामधील अनिश्चितता आणि रक्तामध्ये गाठी होण्याची शक्यता या दोन गोष्टींमुळे हा निर्णय घेतला गेला आहे.
 
ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून केल्या जाणाऱ्या या अभ्यासात 50 हून अधिक वय असलेले 830 स्वयंसेवक सहभागी झाले होते. या संशोधनाचा पहिला संपूर्ण अहवाल हा जून महिन्यात प्रसिद्ध होईल. लॅन्सेट या मेडिकल जर्नलमध्ये या संशोधनाची प्राथमिक आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दहा स्वयंसेवकांपैकी एकाला अस्ट्राझेन्का लशीचे दोन डोस चार आठवड्यांच्या अंतरानं दिले गेले. त्यांना ताप आला. पण अस्ट्राझेन्काचा एक आणि फायझरचा एक डोस दिल्यानंतर ताप येण्याचं प्रमाण 34 टक्क्यांनी वाढलं.
 
"हेच प्रमाण थंडी वाजून येणं, थकवा, डोकेदुखी, स्नायूदुखी अशा इतर लक्षणांबद्दलही दिसून आलं," असं या चाचणीचे प्रमुख निरीक्षक प्रोफेसर स्नेप यांनी म्हटलं.
 
एप्रिल महिन्यात या चाचणीमधील स्वयंसेवकांचं प्रमाण वाढवण्यात आलं. अजून 1050 स्वयंसेवक चाचणीत सहभागी झाले. या चाचणीत अस्ट्राझेन्का-फायझरसोबत मॉडर्ना आणि नोव्हाव्हॅक्स या लशींचे डोसही वापरले गेले.
 
भारतात मात्र यावर अजूनही पुरेसं संशोधन सुरू असून, सध्यातरी दोन्ही डोस एकाच लशीचे असतील, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
 
काही दिवसांपूर्वी जेव्हा व्ही के पॉल यांना उत्तर प्रदेशातील घटनेबाबत विचारलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते की कुणालाही दोन वेगवेगळ्या लशींचे डोस चुकून देण्यात आले असतील, तर त्यांना कुठलाही धोका नाही.
 
भारतात सध्या लशींच्या उपलब्धतेचा विषय अवघड होऊन बसला आहे. अशात जर लशींचं असं कॉकटेल देण्यास सुरुवात झाली, दोन वेगवेगळ्या लशींचे डोस दिले गेले, तर त्यामुळे दोन गोष्टी होतील - जसं काही परदेशातील संशोधनातून समोर आलंय, की लोकांना दोन्ही लशींच्या आपापल्या संरक्षक गुणांचा फायदा मिळेल आणि दुसरं म्हणजे नियोजित वेळेवर लसीकरण केंद्रावर जाऊन जी लस उपलब्ध आहे, ती लस घेतली तर लस वेळेत मिळेल आणि या लवचिकतेमुळे एका लशीचा तुटवडा असा निर्माण होणार नाही.