शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2019 (14:46 IST)

भारताला मोठा झटका, शिखर धवन 3 आठवड्यांसाठी विश्वचषकातून बाहेर

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आठवड्यांसाठी बाहेर पडला असल्याने विश्वचषकात भारतीय संघाला झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खणखणीत शतक झळकावणाऱ्या धवनच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे धवन तीन आठवड्यांसाठी संघाबाहेर पडला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्याच सामन्यात धवनच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. या सामन्यात धवनने ठोकलेल्या 117 धावांमुळे भारताला ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी विजय मिळवता आला होता.
 
विश्वचषकात भारताचा तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध 13 जून रोजी होणार आहे. या सामन्यात शिखर धवन खेळू शकणार नाहीच. पण त्यापुढचा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यालाही शिखर धवन मुकणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी मँचेस्टर इथं हा सामना होणार आहे.
 
सध्या शिखर धवन ऐन फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने 127 धावांची सलामी दिली होती. शिखर धवनने संयमी शतक झळकावल्याने भारताला ऑस्ट्रेलियासमोर 352 धावांचा डोंगर उभा करता आला होता. रोहित-शिखरची जोडी फॉर्मात असल्यामुळे भारताची फलंदाजीची बाजू मजबूत झाली होती. मात्र आता रोहितच्या साथीला धवन नसल्यामुळे भारताला मोठा झटका मानला जात आहे.
 
शिखर धवनच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार याची आता चाचपणी सुरु आहे. भारताकडे सलामीसाठी अनेक पर्याय आहेत. त्यापैकी पहिला पर्याय म्हणजे के एल राहुल. के एल राहुलने अनेक सामन्यात सलामीला फलंदाजी केली आहे. राहुलशिवाय विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये सलामीला येऊन मोठ्या खेळी केल्या आहेत.
 
दरम्यान, शिखर धवनच्या अनुपस्थितीत रिकाम्या झालेल्या जागी रवींद्र जाडेजा किंवा विजय शंकर या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. याशिवाय जर फलंदाज म्हणून निवड करायची असेल तर दिनेश कार्तिकचाही पर्याय टीम मॅनेजमेंटसमोर आहे.