गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 (09:27 IST)

IND vs PAK : पाकिस्तानला हरवण्यासाठी टीम इंडियाला 'या' 5 पाकिस्तानी खेळाडूंना रोखावं लागेल

कोणत्याही आयसीसी स्पर्धेतील सर्वाधिक उत्सुकता असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर (शनिवार) अहमदाबादमध्ये होणार आहे.
 
गेल्या काही महिन्यांपासून या सामन्यासाठी मैदानाच्या बाहेर जोरदार तयारी सुरू आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठ्या मैदानात विश्वचषकातील ही सर्वात महत्त्वाची लढत खेळण्यासाठी दोन्ही टीम सज्ज आहेत.
 
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी विश्वचषकाची सुरुवात जोरदार केलीय. पाकिस्ताननं नेदरलँड्स आणि श्रीलंकेचा पराभव केलाय. तर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव करत अहमदाबादमध्ये दाखल झालीय.
 
अहमदाबादमध्ये उतरण्यापूर्वी दोन्ही टीम या स्पर्धेत अपराजित आहेत. टीम इंडियाकडं विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जातंय.
 
बाबर आझमच्या पाकिस्तानी संघाला हलकं लेखण्याची चूक कुणीही करणार नाही. एकदिवसीय विश्वचषकातील शंभर टक्के विजयाचा विक्रम कायम राखण्यासाठी टीम इंडियाला पाच पाकिस्तानी खेळाडूंचा अडथळा पार करावा लागणार आहे.
 
बाबर आझम
विश्वचषक स्पर्धेत बाबर आझमची सुरूवात निराशाजनक झालीय. त्यानं पहिल्या दोन सामन्यात मिळून फक्त 5 धावा केल्या आहेत.
 
विश्वचषकापूर्वी झालेल्या आशिया कप स्पर्धेतही नेपाळविरुद्धची शतकी खेळी वगळता बाबरची कामगिरी साधारण होती.
 
या साधारण कामगिरीनंतरही बाबरला कमी लेखण्याची चूक टीम इंडिया करणार नाही. पाकिस्तानच्या कॅप्टनकडं एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच त्यानं आयसीसी क्रमवारीत पहिला क्रमांक बराच काळ राखलाय.
 
फलंदाजीला मदत करणाऱ्या अहमदाबादच्या पिचचा बाबरला फॉर्मात येण्यासाठी उपयोग होऊ शकतो. टीम इंडियाविरुद्धचा आजवरचा साधारण रेकॉर्ड सुधारण्यासाठी विश्वचषकातील सामना ही सुवर्णसंधी असल्याची जाणीव पाकिस्तानच्या कॅप्टनला नक्की असेल.
 
पाकिस्ताच्या डावाचा भक्कम पाया रचणाऱ्या बाबरला लवकर बाद करणे हे भारतीय गोलंदाजांसमोरचं पहिलं मोठं आव्हान आहे.
 
मोहम्मद रिझवान
बाबर आझमप्रमाणेच पाकिस्तानच्या फलंदाजीची धूरा रिझवाननं भक्कमपणे सांभाळली आहे. या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यापासून रिझवानला सूर गवसलाय.
 
नेदरलँड्स विरुद्घ अर्धशतक आणि श्रीलंकेविरुद्ध मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना रिझवाननं नाबाद शतक झळकावलंय.
 
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येण्यासाठी रिझवानमध्ये पाकिस्तानच्या इनिंगला आकार देण्याची जबाबदारी असते. त्यानं ही जबाबदारी नेहमीच चोख सांभाळलीय.
 
सौद शकील
विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची अवस्था 3 बाद 38 अशी नाजूक झाली होती. अनुभवी टॉप थ्री लवकर बाद झाल्यानंतर नवोदीत सौद शकीलनं मोहम्मद रिझवानच्या मदतीनं पाकिस्तानला सावरलं.
 
सौदनं नेदरलँड्स विरुद्ध 68 धावा करत सामनावीराचा पुरस्कार मिळवला.
 
श्रीलंकेच्या विरुद्धही 31 धावांची महत्त्वाची खेळी केली. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी फक्त 6 सामन्यांचा अनुभव असलेल्या सौद शकीलची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी 50 पेक्षा जास्त आहे.
 
पाकिस्ताननं अनुभवी खेळाडूंना बाजूला सारत शकीलला विश्वचषकासाठी निवडलं. पहिल्या सामन्यापासून अंतिम 11 मध्ये संधी दिली. त्यानं या संधीचा दोन्ही सामन्यात पूर्ण वापर केलाय.
 
पाचव्या क्रमांकावर खेळणारा हा डावखुरा फलंदाज भारताविरुद्ध पहिल्यांदाच खेळणार आहे. त्यामुळे तो भारतीय गोलंदाजासाठी नवा पेपर आहे. फटकेबाजी करत वेगानं धावा जमवण्याची त्याची क्षमता पाहता या नव्या पेपरचा बुमरा आणि कंपनीला नीट अभ्यास करावा लागेल.
 
अब्दुल्ला शफीक
इंग्लंडमध्ये 2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात फखर झमाननं भारताविरुद्ध शतक झळकावलं होतं. फखरच्या त्या शतकाच्या जोरावर पाकिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं.
 
पाकिस्तानचा हा मॅचविनर फलंदाज या वर्षात फारसा फॉर्मात नाही. विश्वचषकातील पहिल्या सामन्यातही तो अपयशी ठरला होता.
 
अनुभवी फखरच्या जागी पाकिस्ताननं श्रीलंकेविरुद्ध अब्दुल्ला शफीकला उतरवलं. शफीकनं दमदार शतक झळकावत संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी कमी केलीय. तर, भारतीय संघाला धोक्याचा इशारा दिलाय.
 
सौद शकील प्रमाणेच अब्दुल्ला शफीक देखील नवोदित आहे. अंतिम 11 मध्ये स्थान मिळणं किती अवघड आहे, हे त्याला पक्कं माहितीय. त्यामुळे पहिली संधी मिळताच त्यानं शतक झळकावत त्यानं स्वत:ला सिद्ध केलंय.
 
भारताविरुद्ध पहिल्यांदाच सामना खेळणाऱ्या शकीलवर भूतकाळाचं कोणतंही दडपण नाही. त्याचा हैदराबादमधील फॉर्म अहमदाबादमध्येही कायम राहिला तर टीम इंडियाच्या अडचणी वाढू शकतात.
 
शाहीन आफ्रिदी
पाकिस्ताननं 2021 साली झालेल्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा पराभव केला होता. टी20 विश्वचषकातील हा पहिलाच विजय होता. त्या सामन्यात पाकिस्तानच्या विजयाचा पाया शाहीन आफ्रिदीनं रचला होता.
 
आफ्रिदीनं पहिल्या दोन ओव्हर्समध्येच रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना बाद केलं. त्यानंतर अर्धशतक झळकावून मोठी धावसंख्या रचण्याच्या तयारीत असलेल्या विराट कोहलीचा अडथळा निर्णयाक क्षणी दूर केला होता.
 
यावर्षी झालेल्या आशिया कप स्पर्धेतील सामन्यातही आफ्रिदीनं रोहित आणि विराटला झटपट बाद करत चार विकेट्स घेतल्या होत्या.
 
या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजीचं नेतृत्त्व आफ्रिदी करतोय. डावखुऱ्या वेगवान गोलंदांविरुद्ध खेळताना भारतीय टॉप ऑर्डरच्या मर्यादा यापूर्वीही उघड झाल्या आहेत.
 
सुरुवातीच्या स्पेलमध्ये मॅचची दिशा ठरवण्याची क्षमता आफ्रदीच्या बॉलिंगमध्ये आहे. भारताविरुद्ध त्यानं ही क्षमता यापूर्वी सिद्धही केलीय.
 
अहमदाबादमध्येही भारतीय टीम किती धावा करणार हे आफ्रिदीच्या पहिल्या स्पेलमध्ये स्पष्ट होऊ शकतं.
 
विश्वचषक स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असेल बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सौद शकील, अब्दुल्ला शफीक आणि शाहीन आफ्रिदी या पाच पेपरचा टीम इंडियाला व्यवस्थित अभ्यास करुन मैदानात उतरावं लागेल.