वानखेडे हे फक्त एक स्टेडियम नाही, तर मुंबई क्रिकेटचं धडधडतं हृदय आहे.भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईचं स्थान मक्का किंवा पंढरीसारखं असेल, तर तिथला सर्वात पवित्र गाभारा वानखेडेवर आहे.एका बाजूला धडधडत जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन्स, चर्चगेट-मरीन लाईन्स स्टेशनची गर्दी आणि दुसऱ्या बाजूला मरीन ड्राईव्ह आणि रस्त्यापलीकडे अथांग पसरलेला समुद्र. तिथून वाहणारी वाऱ्याची मंद झुळूक आणि दमट हवा.
मुंबईला मुंबई बनवणाऱ्या या सगळ्या गोष्टी वानखेडेवर एकत्र येतात. भारतीय क्रिकेटसाठी तर हे मैदान अगदी खास आहे.
रोहित शर्माही आयसीसीसीच्या मुलाखतीत हेच म्हणाला होता, “वानखेडे माझ्यासाठी खास आहे. मी एक क्रिकेटर म्हणून आज जे काही आहे आणि मला जे काही शिकायला मिळालं आहे ते सगळं वानखेडेवरच घडलं आहे.”
मुंबई क्रिकेटची शान
इतिहासात डोकावून पाहिलं, तर वानखेडे स्टेडियम म्हणजे मुंबईतला तिसरा टेस्ट व्हेन्यू आहे.
भारतीय क्रिकेटमधला पहिला कसोटी सामना बाँबे जिमखान्यावर झाला होता आणि त्यानंतर मुंबईतले सामने क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (CCI) ऐतिहासिक ब्रेबॉर्न स्टेडियमवर भरवले जायचे.
पण सत्तरच्या दशकात CCI सोबत वाद झाल्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशननं स्वतःचं नवं स्टेडियम उभारलं. त्याला MCAचे माजी अध्यक्ष शेषराव वानखेडेंचं नाव देण्यात आलं.
1975 साली इथे भारत आणि वेस्ट इंडीजच्या संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतरच्या पाच दशकांत हे मैदान भारतीय क्रिकेटच्या काही यादगार क्षणांचं आणि खेळातल्या बदलांचं साक्षीदार ठरलं.
इथल्या कानाकोपऱ्यात इतिहास आणि आठवणी, थांबून राहिल्या आहेत. पटत नसेल, तर फक्त स्टँड्सवरच नजर टाकून पाहावं एकदा.
विजय मर्चंट, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि सचिन तेंडुलकर अशा मुंबईच्या मुशीत घडलेल्या दिग्गजांची नावं मिरवणारे स्टँड्स कुणाही मुंबईकर क्रिकेटप्रेमींची मान अभिमानानं उंचावतात.
2011 साली याच मैदानावर झालेल्या फायनलमध्ये श्रीलंकेला हरवून भारतानं विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा धोनीचा षटकार आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर तरळत असेल.
त्या षटकाराच्या आठवणी स्टेडियममध्ये जतन करून ठेवल्या आहेत. धोनीच्या त्या विजयी शॉटनंतर चेंडू प्रेक्षकांत जिथे जाऊन पडला, तिथे दोन खास खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत.
ही जागा दिवेचा पॅव्हेलियन आणि एमसीए पॅव्हेलियनच्या मध्ये आहे आणि या जागेच्या खास तिकिटांची विक्री करून मुंबईच्या युवा खेळाडूंसाठी निधी जमा केला जातो आहे.
पण वानखेडेवरचं ते केवळ एकच प्रतीक नाही. दिवेचा पॅव्हेलियनच्या विरुद्ध बाजूला, सचिन तेंडुलकर स्टँडच्या शेजारी आता मास्टर ब्लास्टरचा पुतळा उभारण्यात आला आहे.
याच मैदानात सचिन त्याचा दोनशेवा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला होता आणि त्या सामन्यातूनच त्यानं निवृत्ती घेतली होती.
चाहत्यांचं लाडकं स्टेडियम
कधी वानखेडे स्टेडियमवरून वादही झाले आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध म्हणून इथली खेळपट्टी उखडली गेली होती. शाहरूख खानच्या ग्राऊंड्समेनसोबतच्या वादामुळेही हे स्टेडियम चर्चेत आलं.
पण चाहत्यांसाठी मात्र वानखेडे कायम वादांच्या पलीकडे आहे आणि इथे येणारे चाहतेही कट्टर क्रिकेटप्रेमी म्हणून ओळखले जातात. ते आपल्या टीमच्या पाठीशी उभे राहतात पण प्रतिस्पर्ध्यांच्या उत्तम खेळालाही दाद देतात.
विशेषत: नॉर्थ स्टँड म्हणजे आताच्या दिलीप वेंगसरकर स्टँडमध्ये येणारे सामान्य चाहते. मॅचच्या दिवशी इथला माहौल शब्दांत मांडता येणार नाही, तो इथेच अनुभवावा लागतो.
वानखेडेची आसनक्षमता तशी 32-33 हजारांचीच आहे. त्याशिवाय कॉर्पोरेट बॉक्स वगैरे मिळून इथे साधारण 40 हजारांपर्यंत प्रेक्षक जमू शकतात, असं मैदानाचे क्युरेटर सांगतात.
पण सव्वा कोटी लोकसंख्येच्या शहरात एवढ्या सीट्सही साहजिकच कमी पडतात. त्यामुळे मोठ्या सामन्याच्या वेळेस स्टेडियमबाहेरही क्रिकेटचा सोहळा सुरू होतो.
प्रत्यक्ष स्टेडियममध्येही काळानुसार बदल होत गेले आहेत. 2011 च्या विश्वचषकासाठी या स्टेडियमचं पूर्ण नूतनीकरण झालं आणि 2023 च्या विश्वचषकासाठी इथलं आऊटफील्ड, मैदानातलं गवत नव्यानं तयार करण्यात आलं.
कसोटी सामना असो, वन डे किंवा ट्वेन्टी20 मॅच असो किंवा आयपीएल. वानखेडे स्टेडियममध्ये सामना पाहणंच नाही, तर खेळणं देखील एक खास अनुभव असतो.
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी म्हणून ओळखली जाते. पण समुद्राजवळ असल्यानं इथे स्विंग बोलर्सना मदत होते, विशेषतः दिवसाच्या सुरुवातीला. कसोटी सामना जसा पुढे सरकतो तसं शेवटी स्पिनर्सही वर्चस्व गाजवताना दिसले आहेत.
वानखेडे स्टेडियम उभारल्यानंतरर मुंबईत ब्रेबॉर्नवर अधूनमधून सामने खेळवले गेले आणि शेजारी नवी मुंबईत उभारलेल्या डीवाय पाटील स्टेडियममध्येही आयपीएलचे सामने भरवले गेले आहेत. तरीही मुंबई क्रिकेटमध्ये वानखेडेचं अढळ स्थान कायम आहे.
Published By- Priya Dixit