सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (23:15 IST)

वर्ल्ड कप SA vs NZ : न्यूझीलंडच्या मोठ्या पराभवाचा पाकिस्तानला का फायदा होणार?

दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडचा 190 धावांनी मोठा पराभव करत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्कं केलंय. दुसरीकडं, न्यूझीलंडचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव आहे. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग अधिक खडतर झालाय.
 
आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेत बुधवारी (1 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना झाला. या सामन्यांत दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं 358 धावांचं आव्हान न्यूझीलंडला पेलवलं नाही. त्यांचा संपूर्ण संघ 167 धावांवर बाद झाला.
 
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच विकेट्स घेत न्यूझीलंडला कोणतीही संधी दिली नाही. ग्लेन फिलिप्स यानं सर्वाधिक 60 धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर खेळायला आलेला फिलिप्स सर्वात शेवटी बाद झाला.
 
दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 4 विकेट्स घेतल्या. मार्को जॅन्सननं 3, जेराल्ड कोट्सझीनं 2 तर कागिसो रबाडानं 1 विकेट घेतली.
 
पाकिस्तानला फायदा
न्यूझीलंडच्या मोठ्या पराभवाचा फायदा बाबर आझमच्या पाकिस्तानला होणार आहे. न्यूझीलंडनं आफ्रिकेला पराभूत केलं असतं तर या मॅचनंतर त्यांचे 10 पॉईंट्स झाले असते.
 
पाकिस्तानचे आणखी दोन सामने बाकी आहेत. बाबर आझमच्या टीमचे सध्या 6 पॉईंट्स आहेत. त्यांनी उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी ते 10 पॉईंट्स मिळवू शकतात.
 
न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे पॉईंट्स समान झाले तर सरस रनरेटच्या आधारावर न्यूझीलंड पाकिस्तानला स्पर्धेच्या बाहेर करू शकतं.
 
हा संभाव्य धोका टाळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा न्यूझीलंडचा पराभव पाकिस्तानसाठी आवश्यक होता. पुण्यातील सामन्यात मनासारखा निकाल लागल्यानं पाकिस्तानच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
 
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान ही लढत शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ही लढत दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
 
डी कॉकचा विक्रम
क्विंटन डी कॉक आणि रॅसी वेन देर ड्यूसेन यांची शतकं ही दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. डी कॉकनं या विश्वचषक स्पर्धेतील चौथं शतक झळकावलं.
 
त्यानं यापूर्वी या विश्वचषकात श्रीलंका (100), ऑस्ट्रेलिया (109), बांगलादेश (174) अशी तीन शतकं झळकावली होती. त्यापाठोपाठ न्यूझीलंड विरुद्धही शतक झळकावलंय.
 
एकाच विश्वचषक स्पर्धेत चार शतक झळकवण्याचा कुमार संगकाराच्या विक्रमाची त्यानं बरोबरी केलीय. संगकारानं 2015 साली हा विक्रम केला होता. एका विश्वचषकात सर्वाधिक 5 शतकं झळकावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे.
 
डी कॉकनं या सामन्यात 500 धावांचा टप्पाही पूर्ण केला. या विश्वचषक स्पर्धेत हा टप्पा पूर्ण करणारा डी कॉक हा पहिला फलंदाज आहे.
 
डी कॉकनं 116 बॉलमध्ये 114 धावा केल्या. या खेळीत त्यानं 14 फोर आणि 3 सिक्स लगावले. त्यानं बाद होण्यापूर्वी ड्यूसेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागिदारी केली.
 
ड्यूसेनचं शतक
दक्षिण आफ्रिकेकडून रॅसी वेन देर ड्यूसेननं सर्वाधिक 133 धावा केल्या. ड्यूसेनचं या स्पर्धेतील हे दुसरं शतक आहे. त्यानं यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध 108 धावा केल्या.
 
101 बॉलमध्ये शतक झळकावणाऱ्या ड्यूसेननं या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकार लगावले.
 
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बढती मिळालेल्या डेव्हिड मिलरनं 30 बॉलमध्ये 53 धावा केल्या. या सर्वांच्या प्रयत्नामुळे दक्षिण आफ्रिकेनं 4 बाद 357 धावांचा टप्पा गाठला.
 
दक्षिण आफ्रिकेनं शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात 119 धावा केल्या.
 
न्यूझीलंडकडून टीम साऊदीनं 2 तर ट्रेंट बोल्ट आणि जिमी नीशाम यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली
 
न्यूझीलंडला आणखी एक धक्का
न्यूझीलंडची या स्पर्धेतील डोकेदुखी कमी होत नाहीय. या संघाला सुरुवातीपासून दुखापतींनी घेरलंयय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज मॅट हेन्री जखमी झाला.
 
आफ्रिकेच्या इनिंगमधील 27 वी ओव्हर टाकत असताना हेन्रीचा उजवा पाय दुखावला. त्यामुळे त्यानं मैदान सोडलं. जिमी नीशामनं त्याची उर्वरित ओव्हर पूर्ण केली.
 
न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे या स्पर्धेत फक्त एक सामना खेळू शकलाय. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन देखील दुखापतीमुळे आफ्रिकेविरुद्धचा सामना खेळू शकला नाही. त्यापाठोपाठ हेन्री देखील जखमी झाल्यानं न्यूझीलंडची काळजी वाढलीय.
 




Published By- Priya DIxit