शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 (23:31 IST)

भारत-पाकिस्तान सामना : कुणी अहमदाबादच्या हॉस्पिटलमध्ये राहतंय तर कुणी बार्शीहून पोटाची खळगी भरण्यासाठी आलंय...

india pakistan cricket
India-Pakistan : भारतातले सगळे रस्ते सध्या अहमदाबादकडेच जातायत जणू. ही अतिशयोक्ती वाटेल पण खरंच क्रिकेट फॅन्सच्या नजरा इथे होणाऱ्या भारत पाकिस्तान मॅचकडे लागल्या आहेत.
 
सध्या भारतात चाहत्यांमध्ये ‘कुणी तिकिट देतंय का?‘ हीच चर्चा रंगलेली दिसते आहे.
 
जे अहमदाबादमध्ये आहेत त्यांना भारत पाकिस्तान मॅचचं तिकिट हवंय आणि जे गुजरातबाहेर आहेत त्यांना अहमदाबादचंही तिकिट हवंय. जे अहमदाबादला पोहोचले आहेत त्यांना परतीचं तिकिट हवंय.
 
ट्रान्सपोर्ट सर्व्हिस वाल्यांच्या गाड्या, टॅक्सींना मागणी वाढली आहे. हॉटेल रूम्सचे रेटही गगनाला भिडले आहेत.
 
ज्या रूमसाठी 3000 ते 4000 रुपये दर होता, त्यासाठी आता अगदी 17, 000 ते 18,000 रुपये मोजावे लागतायत. एवढं करूनही बुकिंग मिळालं तर तुम्ही लकी ठराल.
 
कारण शहरातली बहुतांश हॅाटेल्स कधीच पॅक झाली आहेत, आणि कुणी तर म्हणे हॅास्पिटल बेड बुक केलेयत- मॅचच्या निमित्ताने अहमदाबादमध्ये यायचं आणि मेडिकल चेकअप करून घ्यायचं.
 
तिकिटांच्या काळ्या बाजाराचं प्रकरणही होऊन गेलं. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अनेक ठिकाणी बरेचसे पोलिस आणि सुरक्षारक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत.
 
एकूण काय तर एका हाय प्रोफाईल क्रिकेट मॅचआधी एखाद्या शहरात जे वातावरण असेल ते सगळं अहमदाबादमध्ये घडतंय.
 
त्यात एकीकडे नवरात्रीच्या उत्सवाचीही तयारी सुरू आहे. गुजरातमधला हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा सण.
 
या दिवसांत अहमदाबादच्या लॅा गार्डन परिसरात असलेल्या ‘गरबा मार्केट’मध्ये पारंपरिक पोषाख आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी झुंबड उडते.
 
त्या गर्दीतही आम्हाला काही चाहते भेटले. मुंबईहून खरेदीसाठी आलेली अक्षता मेहता सांगते की ती विराटचा चाहती आहे आणि नवरात्रीचा डान्स आणि क्रिकेट मॅच दोन्हीसाठी उत्सुक आहे.
 
गौतम या बाजारात लटकन विकतो आणि एरवी ढोलही वाजवतो. मॅचचा पास मिळेल अशी आशा त्याला वाटतेय. “तिकिट मिळालं नाही पण पास मिळणार आहेत आम्हाला. आम्ही स्टेडिमयमध्ये जाणार, वरती बसून मॅच पाहणार आणि ढोलही वाजवणार.“
 
इथले दुकानदारही बाजार सुरू असताना एकीकडे फोनवर मॅच पाहणार असल्याचं सांगतात.
 
आम्ही लोकांशी बोलत असतानाच कुणी आमच्याशी मराठीतून क्रिकेटवर संवाद साधू लागतात.
 
स्टेडियम बाहेरही एक दिवस आधीच क्रिकेट जर्सी आणि कॅप्स विकणाऱ्या फेरीवाल्यांनी स्टॅाल्स लावायला सुरुवात केली होती.
 
यातले काहीजण टीम इंडिया जिथे जिथे खेळते तिथे तिथे जाऊन आणि किंवा आयपीएलच्या मॅचेससच्या वेळेस क्रिकेट जर्सी वगैरे विकतात आणि त्यावरच पोट भरतात.
 
मॅच नसली की इतर काही गोष्टी विकून गुजराण करतात. रेश्मा आणि रवी पवार त्यापैकीच आहेत.
 
रेश्मा मूळची पंढरपूरची तर रवी सोलापूरच्या बार्शीचा आहे. त्या दोघांना भेटल्यावर या देशात क्रिकेट खेळापेक्षा किती मोठं आहे आणि ते किती खोलवर रुजलं आहे, याची कल्पना येते.
 
“गावाकडे आम्हाला असं गवंडी काम करावं लागतं. इथे आम्हाला देशभर फिरायलाबी मिळतंय, धंदाबी होतोय.”
रेश्मा सांगते, “मी विराटला मानते. कवा असा मूड आला की असा खेळतो. नाही तर एकदम शांत गडी... आम्ही चेन्नई, बँगलोर, कलकत्ता दिल्ली, विशाखापट्टनम, लखनऊ सगळीकडे गेलोयत. ”
 
“आम्ही सगळी आयपीएलसाठी फिरलो आहोत. टेस्ट पण केली आणि आता वन डे पण करतोय. आम्हाला क्रिकेट आवडतं,” रवी उत्साहात बोलू लागतो. तो रोहित शर्माचा चाहता आहे.
 
“आम्ही स्टेडियमच्या आतमध्ये पण जाऊन आलोयत. कधी कधी आम्हा लोकांना असं कोण कोण तिकिट बी देऊन जातं, की बघून या तुम्ही,” रेश्मा सांगते
 
आम्ही सगळीकडे जातो आणि ट्रेननं तिकिट काढून जातो, असं ती आवर्जून सांगते. अहमदाबादमध्ये आपल्याला आपल्या राज्यातलं कुणीतरी भेटलं याचा आनंदही व्यक्त करते.
 
खरंतर महाराष्ट्रात गुजराती आणि गुजरातमध्ये मराठी माणसं भेटणे तसं नवी गोष्ट नाही, पण तरीही गंमत वाटतेच.रेश्मा सांगते, “मी विराटला मानते. कवा असा मूड आला की असा खेळतो. नाही तर एकदम शांत गडी... आम्ही चेन्नई, बँगलोर, कलकत्ता दिल्ली, विशाखापट्टनम, लखनऊ सगळीकडे गेलोयत. ”
 
“आम्ही सगळी आयपीएलसाठी फिरलो आहोत. टेस्ट पण केली आणि आता वन डे पण करतोय. आम्हाला क्रिकेट आवडतं,” रवी उत्साहात बोलू लागतो. तो रोहित शर्माचा चाहता आहे.
 
“आम्ही स्टेडियमच्या आतमध्ये पण जाऊन आलोयत. कधी कधी आम्हा लोकांना असं कोण कोण तिकिट बी देऊन जातं, की बघून या तुम्ही,” रेश्मा सांगते
 
आम्ही सगळीकडे जातो आणि ट्रेननं तिकिट काढून जातो, असं ती आवर्जून सांगते. अहमदाबादमध्ये आपल्याला आपल्या राज्यातलं कुणीतरी भेटलं याचा आनंदही व्यक्त करते.
 
खरंतर महाराष्ट्रात गुजराती आणि गुजरातमध्ये मराठी माणसं भेटणे तसं नवी गोष्ट नाही, पण तरीही गंमत वाटतेच.
 
नकाशावरच्या सीमारेषांना अर्थ नसतो असं का म्हणतात तेही जाणवतं आणि सगळेच भेद संपलेले नाहीत हेही लक्षात येतं.
 
आमचा ड्रायव्हर आम्हाला शहर दाखवताना एक वाक्य बोलून गेला, “या शहरात सगळे आपापल्या समाजासोबतच राहतात. सिंधी एका वस्तीत, मरावाडी एका वस्तीत असे.”
 
त्याच्या बोलण्यात या गोष्टीचा थोडासा अभिमान जाणवला. अहमदाबादमधल्या या segregation ची चर्चा अनेकदा होत असते. याआधी या शहराला भेट दिली होती तेव्हाही ते जाणवलं होतं.
 
अहमदाबादचा धार्मिक आणि राजकीय इतिहास पाहता, या शहरात भारत आणि पाकिस्तानमधला सामना होणं याला एक वेगळं महत्त्व आहे.
 
राजकारणात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आणि अमित शाह गृहमंत्रिपदी आल्यापासून अहमदाबादचं स्थान खास बनलं आहे, तसंच जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी आल्यापासून अहमदाबाद भारतीय क्रिकेटमधलं एक वेगळं सत्ताकेंद्र बनलं आहे.
 
इथल्या नव्या नरेंद्र मोदी स्टेडियमला या इतक्या महत्त्वाच्या सामन्याचं आयोजन करण्याची संधी मिळाली, याचं म्हणूनच कुणाला आश्चर्य वाटलं नसावं.
 
तसं भारत पाकिस्तान सामन्याची हाईप नेहमीच मोठी असते. पण हा सामना ही दोन्ही देशांतल्या चाहत्यांसाठीही एकमेकांना भेटण्याची, एकमेकांत मिसळण्याची संधी असते.
 
पण सामन्यासाठी व्हिसा न मिळाल्यामुळे इथे पाकिस्तानी चाहते तसे मोजकेच असतील असं दिसतंय.
 
1,32,000 आसनक्षमतेचं हे स्टेडियम जितकं मोठं आहे, तितकंच इथल्या क्रिकेट चाहत्यांचं मनही मोठं असेल अशी आशा करूयात.
 







Published By- Priya Dixit