गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : सोमवार, 6 डिसेंबर 2021 (16:19 IST)

गुरूचरित्र – अध्याय बाविसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥
 
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा ।
कर जोडोनिया जाणा । विनवीतसे परियेसा ॥१॥
 
जय जयाजी योगीश्वरा । शिष्यजनमनोहरा ।
तूचि तारक भवसागरा । अज्ञानतिमिराज्योती तू ॥२॥
 
तुझा चरणसंपर्क होता । झाले ज्ञान मज आता ।
परमार्थवासना तत्त्वतां । झाली तुझे प्रसादे ॥३॥
 
दाखविली गुरूची सोय । तेणे सकळ ज्ञान होय ।
तूचि तारक योगिराय । परमपुरुषा सिद्धमुनी ॥४॥
 
गुरुचरित्रकामधेनु । सांगितले मज विस्तारोनि ।
अद्यापि न धाय माझे मनु । आणिक आवडी होतसे ॥५॥
 
मागे तुम्ही निरोपिले । श्रीगुरु गाणगापुरी आले ।
पुढे कैसे वर्तले । विस्तारावे दातारा ॥६॥
 
ऐकोनि शिष्याचे वचन । सांगे सिद्ध संतोषोन ।
म्हणे शिष्या तू सगुण । गुरुकृपेच बाळक ॥७॥
 
धन्य धन्य तुझे जीवन । धन्य धन्य तुझे मन ।
होसी तूचि पूज्यमान । या समस्त लोकांत ॥८॥
 
तुवा प्रश्न केलासी । संतोष माझ्या मानसी ।
उल्हास होतो सांगावयासी । गुरुचरित्रकामधेनु ॥९॥
 
पुढे वाढला अनंत महिमा । सांगतां असे अनुपमा ।
श्रीगुरु आले गाणगाभुवनी । राहिले संगमी गुप्तरूपे ॥१०॥
 
भीमा उत्तरवाहिनीसी । अमरजासंगमविशेषी ।
अश्वत्थ नारायण परियेसी । महावरद स्थान असे ॥११॥
 
अमरजा नदी थोर । संगम झाला भीमातीर ।
प्रयागासमान असे क्षेत्र । अष्टतीर्थे असती तेतेह ॥१२॥
 
तया तीर्थांचे महिमान । अपार असे आख्यान ।
पुढे तुज विस्तारोन । सांगेन ऐक शिष्योत्तमा ॥१३॥
 
तया स्थानी श्रीगुरुमूर्ति । होती गौप्य अतिप्रीती ।
तीर्थमहिमा करणे ख्याति । भक्तजनतारणार्थ ॥१४॥
 
समस्त तीर्थे श्रीगुरुचरणी । ऐसे बोलती वेदपुराणी ।
त्यासी कायसे तीर्थ गहनी । प्रकाश करी क्षेत्रांसी ॥१५॥
 
भक्तजनतारणार्थ । तीर्थे हिंडे श्रीगुरुनाथ ।
गौप्य होती कलियुगात । प्रकट केली गुरुनाथे ॥१६॥
 
तेथील महिमा अनुक्रमेसी । सांगो पुढे विस्तारेसी ।
प्रकट झाले श्रीगुरू कैसी । सांगेन ऐका एकचित्ते ॥१७॥
 
ऐसा संगम मनोहर । तेथे वसती श्रीगुरुवर ।
त्रिमूर्तींचा अवतार । गौप्य होय कवणेपरी ॥१८॥
 
सहस्त्र किरणे सूर्यासी । केवी राहवेल गौप्येसी ।
आपोआप प्रकाशी । होय सहज गुण तयाचे ॥१९॥
 
वसती रानी संगमासी । जाती नित्य भिक्षेसी ।
तया गाणगापुरासी । माध्याह्नकाळी परियेसा ॥२०॥
 
तया ग्रामी द्विजवर । असती एकशत घर ।
होते पूर्वी अग्रहार । वेदपाठक ब्राह्मण असती ॥२१॥
 
तया स्थानी विप्र एक । राहत असे सुक्षीण देख ।
भार्या त्याची पतिसेवक । पतिव्रताशिरोमणी ॥२२॥
 
वर्तत असता दरिद्रदोषी । असे एक वांझ महिषी ।
वेसण घातली तियेसी । दंतहीन अतिवृद्ध ॥२३॥
 
नदीतीरी मळियासी । क्षारमृत्तिका वहावयासी ।
नित्य द्रव्य देती त्यासी । मृत्तिका क्षार वहावया ॥२४॥
 
तेणे द्रव्ये वरो घेती । येणे रीती काळ क्रमिती ।
श्रीगुरुनाथ अतिप्रीती । येती भिक्षेसी त्याचे घरा ॥२५॥
 
विप्र लोक निंदा करिती । कैचा आला यति म्हणती ।
आम्ही ब्राह्मण असो श्रोती । न ये भिक्षा आमुचे घरी ॥२६॥
 
नित्य आमुचे घरी देखा । विशेष अन्न अनेक शाका ।
असे त्यजुनी यति ऐका । जातो दरिद्रियाचे घरी ॥२७॥
 
ऐसे बोलती विप्र समस्त । भक्तवत्सल श्रीगुरुनाथ ।
प्रपंचरहित परमार्थ । करणे असे आपुल्या मनी ॥२८॥
 
पाहे पा विदुराच्या घरा । प्रीती कैसी शार्ङगधरा ।
दुर्योधनराजद्वारा । कधी न वचे परियेसा ॥२९॥
 
सात्त्विकबुद्धी जे वर्तती । श्रीगुरूची त्यांसी अतिप्रीति ।
इह सौख्य अपरा गति । देतो आपल्या भक्तांसी ॥३०॥
 
ऐसा कृपाळू परम पुरुष । भक्तावरी प्रेम हर्ष ।
त्यासी दुर्बळ काय दोष । रंका राज्य देउ शके ॥३१॥
 
जरी कोपे एखाद्यासी । भस्म करील परियेसी ।
वर देता दरिद्रियासी । राज्य होय क्षितीचे ॥३२॥
 
ब्रह्मदेवे आपुल्या करे । लिहिली असती दुष्ट अक्षरे ।
श्रीगुरुचरणसंपर्के । दुष्टाक्षरे ती शुभ होती ॥३३॥
 
ऐसे ब्रीद श्रीगुरुचे । वर्णू न शके माझे वाचे ।
थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे । श्रीगुरु जाती तया घरा ॥३४॥
 
वर्तत असता एके दिवसी । न मिळे वरू त्या ब्राह्मणासी ।
घरी असे वांझ महिषी । नेली नाही मृत्तिकेसी ॥३५॥
 
तया विप्रमंदिरासी । श्रीगुरु आले भिक्षेसी ।
महा उष्ण वैशाखमासी । माध्याह्नकाळी परियेसा ॥३६॥
 
ऐसे श्रीगुरुकृपामूर्ति । गेले द्विजगृहाप्रती ।
विप्र गेला याचकवृत्ती । वनिता त्याची घरी असे ॥३७॥
 
भिक्षा म्हणता श्रीगुरुनाथ । पतिव्रता आली धावत ।
साष्टांगी दंडवत । करिती झाली तये वेळी ॥३८॥
 
नमन करूनि श्रीगुरूसी । विनवीतसे भक्तीसी ।
आपला पती याचकवृत्तीसी । गेला असे अवधारा ॥३९॥
 
उत्कृष्ट धान्य घरी बहुत । घेवोनि येतिल पती त्वरित ।
तववरी स्वामी बैसा म्हणत । पिढे घातले बैसावया ॥४०॥
 
श्रीगुरुमूर्ति हास्यवदन । बैसते झाले शुभासन ।
तिये विप्रस्त्रियेसी वचन । बोलती क्षीर का वो न घालिसी ॥४१॥
 
तुझे द्वारी असता महिषी । क्षीर काहो न घालिसी भिक्षेसी ।
आम्हाते तू का चाळविसी । नाही वरू म्हणोनिया ॥४२॥
 
श्रीगुरुवचन ऐकोन । विप्रवनिता करी नमन ।
वांझ महिषी दंतहीन । वृद्धत्व झाले तियेसी ॥४३॥
 
उपजतांची आमुचे घरी । वांझ झाली दगडापरी ।
गाभा न वाचे कवणेपरी । रेडा म्हणोनि पोशितो ॥४४॥
 
याचि कारणे तियेसी । वेसण घातली परियेसी ।
वाहताती मृत्तिकेसी । तेणे आमुचा योगक्षेम ॥४५॥
 
श्रीगुरु म्हणती तियेसी । मिथ्या बोलसी आम्हांसी ।
त्वरित जावोनिया महिषीसी । दुहूनि आणी क्षीर आम्हा ॥४६॥
 
ऐसे वचन ऐकोनि । विश्वास झाला तिचे मनी ।
काष्ठपात्र घेवोनि । गेली ऐका दोहावया ॥४७॥
 
श्रीगुरुवचन ऐकोन । विप्रवनिता जाता क्षण ।
दुभली क्षीर संतोषोन । भरणे दोन तये वेळी ॥४८॥
 
विस्मय करी विप्रवनिता । म्हणे ईश्वर हा तत्त्वता ।
याचे वाक्य परिसता । काय नवल म्हणतसे ॥४९॥
 
क्षीर घेवोनि घरात । आली पतिव्रता त्वरित ।
तापविती झाली अग्नीत । सवेचि विनवी परियेसा ॥५०॥
 
श्रीगुरु म्हणती तियेसी । घाली हो क्षीर भिक्षेसी ।
जाणे आम्हा स्वस्थानासी । म्हणोनि निरोपिती तये वेळी ॥५१॥
 
परिसोनि स्वामीचे वचन । घेवोनि आली क्षीरभरण ।
केले गुरुनाथे प्राशन । अतिसंतोषे करूनिया ॥५२॥
 
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । वर देती अतिप्रीती ।
तुझे घरी अखंडिती । लक्ष्मी राहे निरंतर ॥५३॥
 
पुत्रपौत्री श्रियायुक्त । तुम्ही नांदाल निश्चित ।
म्हणोनि निघाले त्वरित । संगमस्थानासी आपुल्या ॥५४॥
 
श्रीगुरु गेले संगमासी । आला विप्र घरासी ।
ऐकता झाला विस्तारेसी । महिमा श्रीगुरुमूर्तीचा ॥५५॥
 
म्हणे अभिनव झाले थोर । होईल ईश्वरी अवतार ।
आमुच्या दृष्टी दिसे नर । परमपुरुष तोचि सत्य ॥५६॥
 
विप्र म्हणे स्त्रियेस । आमुचे गेले दरिद्रदोष ।
भेट जाहली श्रीगुरुविशेष । सकळाभीष्टे साधली ॥५७॥
 
म्हणोनि मनी निर्धार करिती । भेटी जाऊ कैचा यति ।
हाती घेवोनि आरती । गेले दंपती संगमासी ॥५८॥
 
भक्तिपूर्वक श्रीगुरूसी । गंधाक्षताधूपदीपेसी ।
नैवेद्यतांबूलप्रदक्षिणेसी । पूजा करिती सद्भावे ॥५९॥
 
येणेपरी द्विजवर । लाधता जाहला जैसा वर ।
कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर । पूर्ण आयुष्य झाले जाण ॥६०॥
 
सिद्ध म्हणे शिष्यासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी ।
दैन्य कैसे त्या नरासी । अष्टैश्वर्यै भोगीतसे ॥६१॥
 
म्हणे सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकता होय मनोहर । दैन्यावेगळा होय त्वरित ॥६२॥
 
इतिश्रीगुरुचरित्रामृत । वंध्या महिषी दुग्ध देत ।
निश्चयाचे बळे सत्य । भाग्य आले विप्रासी ॥६३॥
 
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे वंध्यामहिषीदोहनं नाम द्वाविंशोऽध्यायः ॥२२॥
 
॥ ओवीसंख्या ॥६३॥
 
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

गुरूचरित्रअध्यायबातेविसावा