बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : सोमवार, 18 डिसेंबर 2023 (18:04 IST)

श्रीगुरुचरित्र पारायण पद्धती

guru charitra parayan paddhat
श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.
 
ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले अहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. 
 
श्री गुरुचरित्र सात दिवसांत वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या ५३ अध्याय पोथीतील क्रम असा आहे. 
सप्ताह पद्धती
 
१ ला दिवस :- १ ते ९ अध्याय 
२ रा दिवस :- १० ते २१ अध्याय 
३ रा दिवस :- २२ ते २९ अध्याय 
४ था दिवस :- ३० ते ३५ अध्याय 
५ वा दिवस :- ३६ ते ३८ अध्याय 
६ वा दिवस :- ३९ ते ४३ अध्याय 
७ वा दिवस :- ४४ ते ५३ अध्याय
श्री गुरुचरित्र वाचनासाठी उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे. वाचन सुरु असताना अखंड दीप असावा. सप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा.
 
श्री गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी 24 पूर्ण, दुसर्‍या दिवशी 37 पूर्ण व तिसर्‍या दिवशी 53 पूर्ण असा क्रम ठेवावा. एका दिवसात समग्र श्री गुरु चरित्र वाचणारे ही साधक आहेत. पोथी वाचताना गुरुवारी मृतसंजीवनीचे अध्याय वाचू नये.
 
सर्वसाधरणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करुन शुक्रवारी समाप्ती करावी. कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंदगमनाचा दिवस असतो. अन्यथा भक्तीभावाने केव्हाही वाचाले तरी हरकत नसते. मुहूर्त, वार बघण्याची गरज नसते. मात्र पोथी वाचताना सोवळे जरुर पाळावेत.
 
सप्ताहाच्या ७ दिवसाचा व्रतस्थपणा पदरात पडण्यासाठी समाराधना आठवे दिवशी करणे योग्य.
 
"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"
 
अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढीलप्रमाणे आहेत.
 
सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे.
वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.
वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे.
दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे.
सोबत आपल्या उजव्या बाजुला एक रिक्त आसनही आंथरुन ठेवावे.
सप्ताह वाचनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा.
सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. 
वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. 
वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणार्‍या अर्थाकडे असावे.
वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसर्‍याशी बोलू नये.
सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)
सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रात:काळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोषारती व रात्री शेजारती करावी.
दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी.
रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढर्‍या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणार्‍यांचा अनुभव आहे.
सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रेयांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरत्या करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.
 
विशिष्ट संकल्पांच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते.