गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (15:41 IST)

श्रीदत्तलीलामृताब्धिसार - षष्‍ठलहरी

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ॥
उपदेश गुरु देव । भजतां ये यावज्जीव । ज्ञान कृतघ्नताभाव । पूर्वापार ॥१॥
नृसिंहाचा पूर्ण भक्‍त । प्रर्‍हाद न होता मुक्‍त । सह्याद्रीं ये तो हिंडत । दत्ता पाहे ॥२॥
भोग नसोनी जो पुष्‍ट । पुसे त्याला कसा लट्ट । दिससी तूं ही मीं गोष्‍ट । ऐकूं इच्छीं ॥३॥
ऐसें प्रर्‍हादाचें वाक्य । ऐकोनीही करी हाँस्य । दत्त वदे रे रहस्य । हें तूं ऐक ॥४॥
नानायोनीं कर्मयोगें । फिरतां हे हाता लागे । नरतनू ही ज्यायोगें । जें घे तें दे ॥५॥
सुखासाठीं तळमळ । करितां ये पळापळ । तरीं सुखा जोड मेळ । न ये दुःख ॥६॥
सुखरुपीं मायेआड । त्याची अर्थीं धरीं चाड । जळा शवूळाचे आड । सोडी जेंवी ॥७॥
मृगजळीं तें न मिळे । तैसें अर्थीं सुख कळे । मग सोडूनी दे बळें । विषयाला ॥८॥
जना प्राणधन भयें । रात्रीं सुखें निद्रा नये । त्यांची वांच्छा सोडितां ये । सुखें झोंप ॥९॥
मोठया कष्‍टें मधु पाळी । तीच्या प्राणावरी पाळी । आली मला गुरु झाली । तीच माशी ॥१०॥
दैवें मिळे त्याचा तोष । घ्यावा ठावा न हो रोष । आर गुरु हा विशेष । बोध देयी ॥११॥
या दोहोंच्या अनुग्रहें । ऐसा झालों मी हा पाहें । विधिनिषेधा न वाहें । स्वेच्छाचारी ॥१२॥
विकल्पा तूं मनीं जाळीं । मायेमध्यें मना पोळीं । त्या मायेची करीं होळी । स्वात्मरुपीं ॥१३॥
ऐसें होतां ये विराम । स्वयें होसी आत्माराम । कृतकृत्य पूर्णकाम । भ्रम न हो ॥१४॥
ऐसें दत्तें निरोपिले । तें त्याच्या चित्तीं भरले । अलर्काही हें लाधलें । ज्ञान ऐका ॥१५॥
गालवर्षी करी याग । दैत्य त्याला दे उद्वेग । कधींही न घडे सांग । याग त्याचा ॥१६॥
देवां प्रार्थी दीन मुनी । अग्रीं अश्व ये त्या क्षणीं । स्वर्गाहुनी व्योमवाणी । बोले तया ॥१७॥
दे हा अश्व नेवोनी दे । ऋतध्वजा सर्व वदे । अश्‍व घेवोनीं भूप दे । आश्‍वासन ॥१९॥
भूप मुनीसह आला । मुनी आरंभी यज्ञाला । तेव्हां पातालकेतूला । धूम दिसे ॥२०॥
तो सूकररुपें आला । ऋततध्वजें ओळखिला । त्यावरी शर मारिला । मेला न तो ॥२१॥
पाताळीं तो घुसे मागे । अश्‍वारुढ राजा लागे । विवरीं तो गेला वेगें । देखे घर ॥२२॥
सखीसह स्त्रीला पाहे । तीही पडे राजमोहें । आश्‍वासूनी नृप बाहे । कोण तूं गे ॥२३॥
सखी बोले वीरमान्या । विश्‍वावसूची हे कन्या । दैत्यें आणीली हें धन्या । तुम्हां भेटे ॥२४॥
दैत्य भोगूं इच्छीं ईतें । उद्यां योजीलें लग्नातें । कामधेनू बोले ईतें । जीव देतां ॥२५॥
उद्यां वेधी दैत्या वीर । त्याशीं करीं स्वयंवर । आज तसें जालें धीर । धरतां हें ॥२६॥
कुंडला मी सखी मज । कोण तुम्ही सांगा आज । तो बोले मी ऋदध्वज । सोमवंश्य ॥२७॥
मला इच्छी जरी नारी । असाक्षीक मी न वरीं । सखी बोले विधी करीं । यथायोग्य ॥२८॥
ध्यानें गुरुतें ती आणीं । विधीनें धरवी पाणी । सखी गुरु त्यां पुसोनी । जाते झाले ॥२९॥
मदालसा जीचें नाम । तिला घे तो नृपोत्तम । अश्‍वारुढ होता भीम । दैत्य आला ॥३०॥
एका बाणें मारी त्याला । येवोनी तें गालवाला । सांगे मुनी हृष्‍ट झाला । म्हणे जा तूं ॥३१॥
राव भार्येसह पित्या । भेटोनी तो सांगें कृत्या । कुवलयाश्‍व नाम त्या । देयी तात ॥३२॥
मारिला जो दैत्य त्याचा । बंधू वनीं मुनी साचा । होवोनी तो भूपतीचा । मार्ग लक्षी ॥३३॥
अश्‍वारुढ येके दिनी । राजा एकला ये वनीं । तो त्या आश्रमा येवोनी । मुनी पाहे ॥३४॥
मुनी बोले ऐकें आज्ञा । संपवी ह्या माझ्या यज्ञा । कंठी देतां मला प्राज्ञा । सर्व साधे ॥३५॥
भूप हर्षे कंठी देयी । म्हणे भूपा राहें जायीं । वरुणाची भेटी घेयीं । येयीं शीघ्र ॥३६॥
राजा तेथेंचि राहिला । कपटी तो पुरा आला । सांगे तो मदालसेला । मेला राजा ॥३७॥
दैत्यें द्वेषानें मारिला । मरतां ही कंठी मला । दिल्ही ही घे जातों तुला । कळवूनी ॥३८॥
येवोनी तो भूपा बोले । माझें कार्य सांग झालें । आतां निजपुरा चाले । स्वेच्छेनें तूं ॥३९॥
राजा नगरा चालिला । पुरीं आकांत वर्तला । ऋतध्वज वनीं मेला । म्हणोनीयां ॥४०॥
मदालसा धड फोडी । उंचस्वरें हंबरडी । म्हणे कंठीसह उडी । खायींत घे ॥४१॥
पतिसवें रामराज्य । पुत्राचें तें धर्मराज्य । अन्यासवें यमराज्य । प्राज्यकष्‍टें ॥४२॥
नको नको रांडपण । पदोपदीं जें दे शीण । विरह दुःख दारुण । कोण भोगी ॥४३॥
ऐसा निर्धार करुनी । चित्तिं पति आठवुनी । अग्निप्रवेश करुनी । दग्ध झाली ॥४४॥
ऐसें पाहोनी सासरा । म्हणे सोडूं या संसारा । सून लेंक मेले खरा । दुर्भाग्य मी ॥४५॥
मीही पापी त्याच पंथा । घरीं वांचावें कां वृथा । ऐसें बोलोनी तो माथा । फोडीतसे ॥४६॥
तंव आला ऋतध्वज । म्हणे ताता पाहे मज । राव देखोनी आत्मज । भ्रांत झाला ॥४७॥
म्हणे मरोनी हा आला । किंवा देवें पाठविला । सर्व कळवितां त्याला । झाला खिन्न ॥४८॥
पुत्र म्हणे दैत्यें मला । ठकविलें पूर्वीं मला । न कळलें आतां झाला । अनर्थ हा ॥४९॥
मेली गंधर्वाची कन्या । पतिव्रता लोकमान्या । धन्या ती वांचूनी अन्या । न भोगीन ॥५०॥
ऐसा निश्‍चय करुनी । सर्व भोगांतें सोडूनी । न राहे तो नृप जनीं । वनीं क्रीडे ॥५१॥
अश्‍वतरनागपुत्र । विप्रवेषें आलें तत्र । त्यांचा होवोनी तो मित्र । नित्य खेळे ॥५२॥
भूपदुःखातें जाणुनी । घरीं येती खिन्नपणीं । पिता पुसे कां वाळुनी । गेलें मुख ॥५३॥
नागा सांगती ते पुत्र । आमुचा हो दुःखी मित्र । मदालसा तत्कलत्र । तें जळालें ॥५४॥
झालों मित्रदुःखें ग्रस्त । पिता म्हणे न व्हा त्रस्त । त्या दुःखाचें करुं अस्त । शिववरें ॥५५॥
मग नाग येते वेळीं । निराहार हिमाचळीं । भावें चिंती हृत्कमळीं । सरस्वती ॥५६॥
वंदूं सरस्वती मती । मन आठ स्थानें हातीं । धरोनी ह्या नाना युक्‍ती । करवीसी ॥५७॥
जळ समुद्रीं सोडिती । सूर्या दीप ओवाळिती । त्या न्यायें ही तव स्तुती । आम्ही करुं ॥५८॥
व्हावे माते त्वां प्रसन्न । सांग राग रंग गान । करवीं जेणें प्रसन्न । होय शंभू ॥५९॥
प्रगटुनी बोले वाणी । गाववीन गोड गाणीं । तेणें शिव शिरीं पाणी । देयील जा ॥६०॥
ऐसें बोलोनि हो गुप्‍त । अश्‍वतर शिवा गात । सांग राग मूर्तिमंत । प्रगटवी ॥६१॥
स्मरहरा श्रीशंकरा । दरहरा भक्‍तोद्धारा । धरधरा गौरीवरा । हरा पावें ॥६२॥
ऐसें गातां शंभू भुले । येवोनी त्या प्रेमें बोले । या गाण्यानें मला धालें । वर घे रे ॥६३॥
नाग बोले मदालसा । मेली स्मृती देह तसा । घेवोनी हो कन्या असा । मागें वर ॥६४॥
शिव म्हणे तीची चाड । धरीं श्राद्धीं मध्यपिंड । पत्‍नीला दे तुझे कोड । पूर्ण होयी ॥६५॥
बुद्धी रुपा त्या आकारा । धरोनी ये तुझ्या घरा । देवोनी तो ऐशा वरा । गुप्‍त झाला ॥६६॥
नाग घरी तैसें करी । तेव्हां श्‍वासाबरोबरी । प्रगटली क्षणांतरीं । वाढली ती ॥६७
पूर्वस्मृतीनें हो खिन्न । नाग करी समाधान । म्हणे पुत्रांनों जावून । आणा मित्रा ॥६८॥
पुत्र विप्रवेषें गेलें । भूपा पाताळी आणिलें । तेव्हां त्याला ते कळले । मित्र नाग ॥६९॥
नृपा वदे अश्‍वतर । तुझ्या भेटीनें नृवरा । धन्य झालों मागें वरा । जो अभीष्‍ट ॥७०॥
राजा लाजेनें न बोले । नागसुतें जाणविलें । पत्‍नीवांचून न भलें अन्य मानीं ॥७१॥
नाग वदे जी जळाली । तुला तीची इच्छा झाली । तरी मायेची बाहुली । दावीं पाहें ॥७२॥
मदालसा दावी त्याला । भूप मूर्च्छित पडला । पुनः उठोनी धांवला । तीला धरुं ॥७३॥
नाग म्हणे दूरी पाहे । माय शिवतां न राहे । भूप घडबडा मोहें । लोळे तेव्हां ॥७४॥
नाग सर्व सांगे त्याला । यथाविधी दे कन्येला । परस्परां हर्ष झाला । तो न माये ॥७५॥
राजा म्हणे धन्य मित्र । माझें पूर्ववत्कलत्र । देवविलें हा हो मंत्र । कोणी नेणे ॥७६॥
मदालसा जैसी तैसी । ब्रह्मनिष्‍ठा विशेषीं । तीला घेवोनी राष्‍ट्रासी । ये तो भूप ॥७७॥
मग सर्वां हर्ष झाला । तातें राज्य दिल्हें त्याला । स्वयें वनीं तो चालिला । झाला मुक्‍त ॥७८॥
ऋतध्वज राज्य करी । त्याला मदालसा नारी । दे संभोग स्वयें जरी । ब्रह्मनिष्‍ठा ॥७९॥
दैवें तिला पुत्र झाला । उपजतां सांगे त्याला । कां रडसी तूं कोणाला । आतां व्यर्थ ॥८०॥
जातां मार्गी भूल घेशी । म्हणोनी ह्या चौर्‍याऐशीं । योनीं कष्‍टें धुंडलासी । निजकर्में ॥८१॥
कुठें तुझीं रांडापोरें । कोठें धन घरें गुरें । मिळविले चोर सारे । लुटारु रे ॥८२॥
करितासी देवध्यान । तप्‍तलोह स्त्र्यालिंगन । न होतें रे पोरा मन । सांवरी हें ॥८३॥
वैराग्यानें खातां भीक । तोंडीं येता न नरक । रुपा न भूलता आंक । न फूटते ॥८४॥
नानायोगी त्वां धुंडतां । तेथें मार्गं न ये हातां । मार्गावरी तूरे आतां । पातलासी ॥८५॥
नको रडूं उगी राहे । बुडशील मिथ्या मोहें । तुझा मार्ग तूंची पाहें । विचारानें ॥८६॥
जन्ममरणा रडसी । तरी त्याच्या संबंधासी । कदापी तूं न शीवसी । निर्विकारा ॥८७॥
जो मातेच्या विटळांत । भेटतां रे रेत रक्‍त । विष्‍ठा मूत्रीं झाला मूर्त । तो तूं कैसा ॥८८॥
हाडामासाच्या देहासी । मूर्खपणें भूललासी । त्याच्या योगें संबंधासी । घेसी व्यर्थ ॥८९॥
कोण माता कोण पिता । कोण तुझी कांता सुता । अविचारें ही ममता । कां धरिसी ॥९०॥
हाडामासावर कात । विष्‍ठा मूत्र ज्याचे आंत । त्याला मी मी ऐसी भ्रांत । येवूं न दे ॥९१॥
जडप्राण रजोगुणी । कर्मेंद्रियां कवळूनी । खातो पीतो रे त्याहुनीं । तूं वेगळा ॥९२॥
ज्ञानेंद्रियाचे मेळणीं । मन पळे क्षणोक्षणीं । त्याचा साक्षी तूं त्याहुनी । निश्‍चळ रे ॥९३॥
ज्ञानेंद्रियां आंत धरी । मी कर्ता हा गर्व करी । निजे उठे तीरे दूरी । बुद्धी तुला ॥९४॥
प्रिय मोद प्रमोदानें । जो भासे त्या आनंदानें । न घे भोक्‍तृत्वाला ध्यानें । पाहें स्वात्मा ॥९५॥
ऐसें जरीं हें करिसी । तरीं बारे न फससी । नाहीं तरी पुनः घेसी । ऐसी फेरी ॥९६॥
तीनी देहांचा मी साक्षी । तीनी अवस्था नीरीक्षीं । निरंतर ऐसा लक्षी । व्यापकत्‍वें ॥९७॥
ऐसा रोज वारंवार । माता करी बोध फार । द्वैतवार्ता करी दूर । कळवळें ॥९८॥
जैसा जैसा वाढे सुत । तैसा बोध ये ठसत । नाम ठेविलें विक्रांत । प्रेमें भूपें ॥९९॥
तेव्हां हंसे मदालसा । पुत्रा झाला बोध खासा । लोकां दिसे जैसा पिसा । अंतर्निष्‍ठ ॥१००॥
इति श्रीदत्तलीलामृताब्धिसारे मदालसोत्कर्षाख्या षष्‍ठलहरी समाप्‍ता ॥ओव्या॥६००॥