गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (15:21 IST)

श्रीदत्तलीलामृताब्धिसार - द्वितीयलहरी

श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ॥
असा राजा राज्य करी । त्या ये वैराग्यलहरी । राज्य टांकी दूरी धरीं । ज्ञानाब्धीतें ॥१॥
ज्ञानाब्धी श्रीदत्तात्रेय । राजा येतां मोनी होय । उभा राजा चिंती पाय । अपायघ्न ॥२॥
ऐसे किती दिन गेले । दत्तें ध्यान न सोडीलें । भूपें स्तवा आरंभिलें । भ्यालें मन ॥३॥
येती देवर्षी प्रभातीं । नित्य वंदूनि ते जाती । शांततपा कुंडी हातीं । धरी राहे ॥४॥
एके दिनीं उठे दत्त । कुंडी घेयी शौचा जात । यथाविधी होतां पूत । शिष्य आला ॥५॥
त्याणें सामग्री दीधली । दत्तें नित्य क्रिया केली । धारणा ही आरंभिंली । पैली जैसी ॥६॥
शिष्य म्हणे राजा येथ । प्रायोपवेशनें त्रस्त । देतों अणी इच्छी वित्त । दत्त म्हणे ॥७॥
राजा वदे पुरे आतां । परीक्षा हे गुरुनाथा । ज्ञानांविना नसे आस्था । आतां मला ॥८॥
मृत्यु माझा आज्ञाधार । देव माझे अनुचर । रिद्धिसिद्धीचें मी घर । हें त्वां केलें ॥९॥
राज्यलक्ष्मी पुत्र नारी । आप्‍त होती अंती दूरी । नको वार्ता यांची हरी । तारी शिष्या ॥१०॥
शास्त्रें झाला मला भ्रम । प्रत्येकाचें भिन्न वर्म । दत्त बोले एक धर्म । सर्वशास्त्रीं ॥११॥
क्षुद्र शास्त्रें पढवितां । इंद्रें गुरुला पुसतां । तो त्या सांगे सात गाथा । ह्या त्या ऐक ॥१२॥
एक शिल्पी शास्त्राधारें । बांधी देवालयें घरें । दान धर्म तेथें बरें । नित्य होती ॥१३॥
आधिव्यापी कोणा नोहे । ऐसें त्याचें कौशल्य हें । रुचे सर्वां धन लाहे । वाहे धर्मी ॥१४॥
मरोनी घे स्वर्गसुख । पुढें राजा तो धार्मिक । पुनः झाला विप्र चोख । ब्रह्मनिष्ठ ॥१५॥
एक विप्र स्मारशास्त्री । जगीं धुंडे शास्त्रोक्‍त स्त्री । एका राये कांता पुत्री । त्या दाविली ॥१६॥
आली तेव्हां त्याला मूर्च्छा । कन्या करी त्याची इच्छा । राजा तैसी त्यांची वांच्छा । पूर्ण करी ॥१७॥
राज्यार्धेशी कन्या देयी । खुशी झाला तो जांवयी । स्माररंगें रंगी घेयी । तीशीं भोग ॥१८॥
नरादिब्रह्मांतानंद । रती ते घे प्राज्ञ मंद । ते नेणें तो अंतीं खेद । घे न शांती ॥१९॥
कलई संयोगें ह्याला । मोही मोहीं म्हणे ज्याला । ये अन्योन्या मोह आला । याला तैसा ॥२०॥
अंतरतां होती कष्टी । परस्परां एक दृष्‍टी । होती आनंदाच्या गोष्‍टी । पोटीं प्रेम ॥२१॥
ऐशा आनंदें तो मेला । सस्त्रीक गंधर्व झाला । तेणें शंभू तोषविला । ख्याला गातां ॥२२॥
शिवें ब्रह्मलोका नेला । तेथें घे क्रममुक्‍तीला । तेव्हां दोष या शास्त्राला । आला कैसा ॥२३॥
वेदशर्मा गोदावासी । शांत दांत सुत त्यासी । होता सात भूतें त्यासी । ग्रासियेला ॥२४॥
पडे रडे उडे हंसे । खायी गाई न्हायी असे । सात भाव करीतसे । पिसेपणें ॥२५॥
नाना उपाय योजिलें । भूत एकही न गेलें । एके दिनी भिक्षू आले । दुर्गंधांगी ॥२६॥
विप्र भिक्षा देतां छवी । त्याची देखे जेवीं रवी । पळे भिक्षू विप्र जवी । धावे पाठीं ॥२७॥
मार गाळी सोसी जेव्हां । दत्त दावी रुप तेव्हां । विप्र वदे पुत्राला व्हा । प्राणदाते ॥२८॥
दत्त सात मंत्र सांगे । रोज एक एक सांगे । त्याच्या कानीं ह्यानीं वेगें । भूतें जाती ॥२९॥
ऐसे सांगोनी हो गुप्‍त । विप्रें तैसें केलें व्यक्‍त । रोज रोज एक तप्‍त । भूत गेलें ॥३०॥
एका एका योगें जसे । मनोमल जाती तसे । जो जो जाई त्याची नसे । ती ती चेष्‍टा ॥३१॥
फट्‌कारानें उच्चाटितां । राक्षस ही हो धांवता । भूताद्याची कैंची वार्ता । उच्चाटनें ॥३२॥
पुत्र झाला पूर्ववत । अभ्यासें हो जीवन्मुक्‍त । मंत्रशास्त्रें साधनांत । हीत हें हो ॥३३॥
मातापुरीं विष्णुदत्त । करी कर्म मीमांसोक्‍त । त्याचे अंगणीं अश्‍वत्थ । गुप्‍त असे ॥३४॥
ब्रह्मराक्षस त्या वृक्षीं । विप्रदत्त बळी भक्षी । न देती जे त्यां तो शिक्षी । रक्षी विप्रा ॥३५॥
शुद्धान्ने ये त्या शांतता । वर दे तो विष्णुदत्ता । भार्यामतें मागे दत्ता । दावीं ऐसें ॥३६॥
बोले राक्षस हें जरी । मला साक्षात् नोहे तरीं । दूरी दावीं स्वार्थ करी । फेरी वारी ॥३७॥
एके दिनीं विप्रा भूत । दावी मद्यापणीं दत्त । विप्र पाहे म्हणे मत्त । दत्त न हा ॥३८॥
गुप्‍त झाला तो तात्काळ । विप्र ताडी स्वकपाळ । भूत बोले दोन वेळ । दावीं पुनः ॥३९॥
भूत बोले एके दिनीं । आहे दत्त तो स्मशानी । विप्र गेला तेथें हाणी । त्यातें दत्त ॥४०॥
मागें होतां दत्त गुप्‍त । झाला विप्रा वदे भूत । पुनः दावीं हो तूं सक्‍त । पदीं धैर्यें ॥४१॥
पुनः दावी एके दिनीं । कुत्र्यां काकां दे छेदूनी । खरमांस त्या जावूनी । दत्ता पाहें ॥४२॥
पुसे काय कार्य तरी । सांगे श्राद्धी क्षण करीं । तरोनी तूं मला तारीं । वारी भवा ॥४३॥
पत्‍नी बोले व्हा सादर । विप्र म्हणे सोडीं दर । जांता दत्तपदीं फार । मार दे त्या ॥४४॥
वदे दत्त सोडीं पाद । तो बोले पुरवीं छंद । क्शण घेयी दर्शश्राद्धा । सिद्ध करीं ॥४५॥
दत्त म्हणे नष्‍ट भ्रष्‍ट । मी अस्पृष्‍ट तूं रे शिष्‍ट । विप्र म्हणे ब्रह्मनिष्‍ठ । वरिष्‍ठ तूं ॥४६॥
दत्त रुप दावी होती । श्‍वान काक श्रुतिस्मृती । वदे विप्र माझी मुक्‍ती । होती झाली ॥४७॥
दत्त बोले मी यें विप्र । पंक्‍तियोग्य सांगें क्षिप्र । तेव्हां ये तो हर्षे विप्र । सांगे भुता ॥४८॥
भूत बोले सूर्याग्नीतें । योजीं तोही घरीं स्त्रीतें । सर्व सांगे ती पाकातें । शीघ्र करी ॥४९॥
अन्नपूर्णा ज्याच्यापाशीं । तो श्रीदत्त ये त्यापाशीं । सरसान्नाची हो राशी । दासी सिद्धीं ॥५०॥
येवोनी श्रीदत्त बोले । विप्र अद्यापी न आले । पत्‍नी आसन दे बोले । बैसा येती ॥५१॥
ये ती बाहेर प्रार्थुंनी । बा हे सूर्या तो घेवुनी । विप्ररुपा त्या आसनी । बैसवी ती ॥५२॥
दत्त वदे देवस्थानीं । कोण विप्र तें ऐकुनी । प्रार्थी अग्नीतें येवूनी । तोही बैसे ॥५३॥
मग सांग श्राद्ध केलें । सर्व देव तृप्‍त झाले । पितरही मोक्षा गेले । बोले विप्र ॥५४॥
ब्रह्मराक्षसोपदेशें । झालें दर्शन हें असें । दत्ता ध्यान मनीं ठसे । ऐसें करी ॥५५॥
दत्त वदे मी त्वच्चिता । न सोडीं दे मदुच्छिष्‍टा । भूता तो तूं स्त्रीही आतां । मुक्‍तता घ्या ॥५६॥
दत्त विद्या सूर्य यान । अग्नी सिद्धी दे ते तीन । गुप्‍त झाले धरी ध्यान । ब्राह्मण तो ॥५७॥
उच्छिष्‍टें हो भूत मुक्‍त । विप्र झाला प्रेष्‍ठ भक्‍त । आचरितां मीमांसोक्‍त । मुक्‍त हो कीं ॥५८॥
गोदातीरीं हरिशर्मा । विशीं भोगी पूर्वकर्मा । देवद्रोहें सहगुल्या । जल्मा आला ॥५९॥
त्यांत क्षय द्वादशाब्दीं । ब्रह्मघातें षोडशाब्दीं । जलोदर पुढें त्र्यब्दीं । जीर्णज्वर ॥६०॥
हो षण्मासें अतिसार । चों मासानें भगंदर । त्रिदोष शेखीं थोर । मारक जो ॥६१॥
तत्स्त्री जायी विष्णुदंत्ता । शरण तो प्रायश्‍चित्ता । योजी कर्मविपाकोक्‍ता । स्त्रीकरवीं ॥६२॥
जों जों प्रायश्‍चित होत । रोग तों तों होयी नष्‍ट । त्रीदोषा वैद्यशास्त्रोक्‍त । मात्रा पाजी ॥६३॥
विप्र झाला रोगमुक्‍त । मंत्र दे त्या विष्णुदत्त । त्याणें विप्र झाला सक्‍त । दत्तपदीं ॥६४॥
रोग जातां पुष्‍टी रसें । माया जातां ज्ञानें तसें । श्रेय तदर्थ हे असे । शास्त्रोपाय ॥६५॥
एक माता रोग होतां । निंब पाजी निजसुता । तो न पिये लाडू देतां । पीता झाला ॥६६॥
तैसी फलश्रुती गौण । हें जाणे त्या ज्ञानपूर्ण । बाणें नेणें त्या भ्रमण । ये शास्त्रार्थी ॥६७॥
लोकां प्रवृत्ती हो लाडू । भासे निवृत्ती ती कडू । आर्ता दावी फळ लाडू । श्रुतिमाता ॥६८॥
जगीं किंवा स्वर्गीं भोग । प्रयोग कीं शत्रू भंग । करावया हें शास्त्रांग । सांग कसें ॥६९॥
एक देवदत्त देशीं । जातां मागें तत्स्त्रीपाशीं । घेवोनी पतिरुपासी । झोटिंग ये ॥७०॥
म्हणे जाणें ज्या कार्यासी । तो भेटला वेशीपाशीं । परतलों मी शीघ्रेंशीं । प्राणप्रिये ॥७१॥
अशी तिशीं घाली भूली । भार्या सत्य समजली । भोग देतां ती भागली । आली शंका ॥७२॥
मोठी त्याची भोगशक्‍ती । पोटीं ठेवी लाजेनें ती । दाटी शोकें तो मासांती । पती आला ॥७३॥
पिसा म्हणे त्या तूं कोण । विप्र म्हणे मी ब्राह्मण । माझे घरीं तूं रे कोण । मद्रूपानें ॥७४॥
तो म्हणे मी घरधनी । तूं कपटी जा येथूनी । तें ऐकोनी विप्र हाणी । तोही त्यातें ॥७५॥
ग्रामीं लोकां झाला खेद । त्यांच्या रुपा नसे भेद । विष्णुदत्तापाशीं वाद । तोडूं चला ॥७६॥
म्हणोनी ते तेथें आले । विष्णुदत्त त्यांतें बोले । तुल्यरुप दोघां भले । तुल्यध्वनी ॥७७॥
एक सत्य एक धूर्त । दावील हें आतां दत्त । विप्रा श्‍वेत भूता रक्‍त । रेखी मुद्रा ॥७८॥
पुसे एका एका भिन्न । घर वस्त्र धन धान्य । स्त्रीचें लक्षण सामान्य । सांगे विप्र ॥७९॥
इटा कौलें वासे धन । कणसंख्या पात्रमान। स्त्रीचें बाह्यांतर्लक्षण । भूत सांगे ॥८०॥
तो संशय लोकां झाला । विप्र म्हणे या क्षेत्राला । फिरोनी ये पूर्वी त्याला । सत्य मानूं ॥८१॥
क्षणे भूत ये दे खूण । विप्रा लागे अर्धां दिन । म्हणे त्यांतें सांगा खूण । ह्या नगाची ॥८२॥
विप्र षडयामें ये भूत । यामार्धें लोक म्हणत । नर नोहे हांची भूत । विप्र म्हणे ॥८३॥या कुंडीच्या तोटींतून । ये तो घे स्त्री हें ऐकून । रिघे भूत तद्वंधन । विप्र करी ॥८४॥
ॐ हुं फट् भो महाविरा । भूता बांधीं बांधीं वरा । भूमीतळीं गाडी वरा । शिळा ठेवी ॥८५॥
लोकां म्हणे विष्णुदत्त । येंतां ओळखिला भूत । खात्री व्हाया क्रम येथ । हा दावीला ॥८६॥
सर्वां झाला महानंद । ऐसा शास्त्रें जातां खेद । लाभे खरा परानंद । भेद नुरे ॥८७॥
एका विप्रा झाला सुत । पूर्वीचा तो योग भ्रष्‍ट । उन्मत्तसा तो वर्तत । संग भयें ॥८८॥
मोठा होतांहीं तो नेणें । मळ-मूत्र खाणेंपिणें । कोणी म्हणे भूतभेणें । ऐसा हो कीं ॥८९॥
सर्वोपाय तातें केले । ते ते सर्व वायां गेले । विष्णुदत्तापाशीं नेलें । त्या बाळातें ॥९०॥
त्याणें ज्ञानी ओळखिला । लोका म्हणे तुम्ही चला । बोले त्याला कां ह्या लीला । मुला केल्या ॥९१॥
कोणाचा तूं कोठें जासी । वाटे भय मोठें घेसी । आई-बापा कां न देसी । पुत्रसूख ॥९२॥
बाळ वदे हा एकला । सबाह्यांतरीं भरला । जाणें येणें नसे ह्याला । संबंधही ॥९३॥
भक्त वदे सत्य हेंची । तरी भीती का संगाची । चेष्टेपरी घे लोकांची । राहाटी तूं ॥९४॥
घरीं जारिणी वावरे । तिचें चित्त जारीं ठरे । ज्ञाता तेवीं क्रिया चरे । ब्रह्मी लीन ॥९५॥
यांत त्याचा नसे तोटा । उपकार आणि चेष्टा । दोनी लाभे ब्रह्मनिष्‍ठा । नीति शास्त्रें ॥९६॥
मग बाळ सोडी खोडी । ब्राह्मणी त्या जेवूं वाडी । अन्न खातां तें दे दडी । भीती त्याची ॥९७॥
पिता पाहे शांत सुता । म्हणे घालविलें भूता । वंदुनी ते विष्णुदत्ता । जाती घरा ॥९८॥
भ्रममात्र हा संसार । यांत शास्त्रें मिळे सार । सारें भवपारावार । पार होई ॥९९॥
शास्त्रैक्यार्थ सात गाथा । गुरु सांगे देवनाथा । मग दत्तपदीं माथा । राव ठेवी ॥१००॥
इति श्रीदत्तलीलामृताब्धौ सप्‍तगाथाख्या द्वितीयलहरी संपूर्णा । ओव्या ॥२००॥