शनिवार, 9 डिसेंबर 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: रविवार, 15 नोव्हेंबर 2020 (08:17 IST)

भाऊबीज सण साजरा करण्याची पद्धत आणि कथा

कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.
 
भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करतात. भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो दीर्घायुषी व्हावा यामागील खरा उद्देश असतो. या दिवशी बहीण भावाला प्रेमाचा टिळा लावते. यामागे त्याची रक्षा व्हावी तो निरोगी आणि दीर्घायु व्हावा अशी प्रार्थना असते.
 
आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, अशी बहीण प्रार्थना करते. अपमृत्यू निवारणार्थ 'श्री यमधर्मप्रीत्यर्थ यमतर्पणं करिष्ये।' असा संकल्प करून यमाचे १४ नावांनी तर्पण करावे. 
 
या दिवशी भावाने घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. भाऊ नसल्यास या दिवशी चंद्राला ओवाळण्याची पद्धत आहे. म्हणूनच आपण लहान मुलांना चंदामामा अशी हाक मारायला शिकवतो.
 
भाऊबीज कथा : 
या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दल चे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची.
 
 
भाऊबीज सण साजरा करण्याची पद्धत: 
 
कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी भावाने बहिणीकडे जावे.
या दिवशी बहीणीने भावाला तेल-उटणे लावून अंघोळ घालावी.
बहिणीने शुभ मुहूर्त बघून भावाला ओवाळावे.
ओवळताना भावाचे मुख पूर्वीकडे असावे.
ओवळ्यानंतर यमाच्या नावाने चौमुखी दिवा लावून उबंरठ्याबाहेर ठेवावे.
बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करावे.
जेवणात तांदूळाचा पदार्थ अवश्य असावा.
एखाद्या स्त्रीला भाऊ नसल्यास तिने चंद्राला भाऊ मानून ओवाळावे.
भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी.