नरक चतुर्दशीचे महत्त्व, या दिवशी काय करावे
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवसाची महत्ता अशी आहे की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्या प्रित्यर्थ हा सण साजरा केला जातो.
या दिवशी अंगणात सूर्योदयापूर्वीच सडा रांगोळी करतात. पहाटे उठून शरीराला तेल लावतात, सुवासिक उटण्याने स्नान करतात. याला अभ्यंग स्नान असे ही म्हणतात.
या दिवशी यमासाठी दीपदान करतात. या दिवशी गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करून घराच्या पुरुष मंडळींना स्नानाच्या वेळी औक्षण केले जाते. असे म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती अभ्यंग स्नान घेत नाही त्याला नरकासम त्रास भोगावे लागतात.
या दिवशी वाईट लहरींना नाहीसे केले जाते. या दिवशी काही काही भागात कारीट नावाच्या फळाला पायाने ठेचतात. आपल्या इच्छेनुसार ब्राह्मणांना भोजन करवतात, दान देतात, यम दीपदान करतात.
पहाटे अंधारात दिवे लावण्याचं महत्त्व
या दिवसाच्या आदल्या दिवशी वातावरण दूषित होतं. वाईट लहरी उद्भवतात. त्या वाईट शक्तीं याचा लाभ उचलतात. या वाईट शक्तींचा नायनाट करण्यासाठी सकाळी दिवे लावण्याचे महत्त्व आहे, जेणे करून त्या दिव्यांचा तेजामध्ये सर्व असुरी शक्तींचा नायनाट होवो. असुरी शक्तींचा संहार करण्याचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी म्हणून या दिवसाचे महत्त्व सांगितले आहेत.
या दिवशी अभ्यंग स्नान करत हा मंत्र म्हणावा
'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये'
सकाळी अंघोळ झाल्यावर देव्हाऱ्यात दिवे लावताना हे मंत्र म्हणावे
'दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया
चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये'
संध्याकाळी आपल्या घर, दुकानात, कार्यालयात दिवे लावावे. हे व्रत केल्याने नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म देखील याच दिवशी झाला होता.