शुक्रवार, 12 डिसेंबर 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दिवाळी 2025
Written By
Last Updated : मंगळवार, 14 ऑक्टोबर 2025 (11:43 IST)

व्यापाऱ्यांसाठी लक्ष्मी पूजन पद्धत-दुकानात कसे करावे पूजन

Lakshmi Pujan
व्यापारी लोकांसाठी लक्ष्मी पूजन हे विशेष महत्त्वाचे आहे, कारण यामुळे व्यवसायात समृद्धी, स्थिरता आणि प्रगती प्राप्त होते. शास्त्रानुसार दुकानात लक्ष्मी पूजन कसे करावे याची पद्धत खाली दिली आहे.

दुकानात लक्ष्मी पूजनाची तयारी-
दुकानाची स्वच्छता-
पूजेच्या आधी दुकान स्वच्छ करा. फरशी धुवा, सामान नीट लावा, आणि कचरा काढून टाका. तसेच दुकानाला रांगोळी, फुले, तोरण यांनी सजवा.

साहित्य-
लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती किंवा फोटो, लाल कापड, तांदूळ, फुले, हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, खडीसाखर, पंचामृत, अगरबत्ती, कापूर, नारळ, फळे, मिठाई, पान, विड्याची पाने, गंगाजल, तांब्या, ताम्हन, पाट, आसन. व्यवसायाची नोंदवही, पेन.

लक्ष्मी पूजन-
दुकानाच्या मुख्य जागेवर पैशाची पेटी वर लाल कापड पसरवा. त्यावर तांदूळ किंवा गव्हाच्या पिठाने आठ पाकळ्यांचे कमळ काढा. आता लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्ती किंवा फोटो लाल कापडावर ठेवा.
मूर्तींना हळद-कुंकू लावा, फुलांचा हार घाला.

संकल्प-
हातात अक्षता आणि पाणी घेऊन पूजेचा संकल्प करा.“मम व्यवसायात समृद्धी आणि कल्याणासाठी मी लक्ष्मी-गणपती पूजन करीत आहे.”

गणपती पूजन-
प्रथम गणपतीला हळद-कुंकू, फूल, दूर्वा अर्पण करा. मग गणपती मंत्र: ॐ गं गणपतये नमः जपा.
कापूर आणि अगरबत्ती लावून आरती करा. आता लक्ष्मीला पंचामृताने स्नान घालून, गंगाजलाने शुद्ध करा. व हळद, कुंकू, फुले, मिठाई, खडीसाखर अर्पण करा. लक्ष्मी मंत्र: ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः जपा आणि नारळ, विड्याची पाने, आणि फळे अर्पण करा.

खातेपुस्तकांचे पूजन-
व्यवसायाच्या वह्या आणि गल्ल्यावर हळद-कुंकू लावून स्वस्तिक काढा. वह्यांवर तांदूळ, फूल, आणि सुपारी ठेवा. मंत्र: ॐ श्री गणेशाय नमः, ॐ श्री महालक्ष्म्यै नमः म्हणत पूजा करा.
आरती आणि प्रसाद-
लक्ष्मी आणि गणपतीची आरती करा. उपस्थित सर्वांना प्रसाद वाटा.
पूजा करताना सकारात्मक विचार ठेवा आणि व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा. तसेच दुकानात रात्री एक दिवा लावून ठेवा.पूजेनंतर दानधर्म करणे शुभ मानले जाते. गरिबांना अन्न किंवा पैशाचे दान करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik