शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By वेबदुनिया|

दक्षिण भारतातील रांगोळीची परंपरा

भारताच्या दक्षिण किनार्‍यावर वसलेल्या केरळमध्ये रांगोळीसाठी फुलांचा वापर केला जातो. केरळमधील सर्वात महत्त्वाच्या सणाला म्हणजेच ओणमला विशिष्ट पध्दतीने रांगोळी काढली जाते. एक आठवडा चालणार्‍या या सणात प्रत्येक द‍िवशी वेगवेगळ्या पध्दतीने रांगोळी सजविली जाते. प्रत्येक दिवशी नवनवीन कलाकार या कामात आपले योगदान देतात. आणि रांगोळीचा आकार मोठा होत जातो.

आकाराने मोठी होण्यासोबतच रांगोळी सौंदर्यातही भर पडत जाते. ज्या फुलांच्या पाकळ्या लवकर वाळत नाहीत अशाच फुलांचा उपयोग रांगोळी सजविण्यासाठी केला जातो. यात गुलाब, चमेली, मेरीगोल्ड या फुलांचा प्रामुख्याने वापर केला जातो. मोठ्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर रांगोळी सजविताना केला जातो. रांगोळीचे किनारे पूर्ण फुलांनी सजविले जातात. कलाकार फुलांचा उपयोग करताना कोणतीही चूक केली जात नाही. कारण निसर्गाच्या या अनमोल ठेवीतच एक कलाकार स्वत:ची कला फुलवतो. ओणमच्या दरम्यान सजविण्यात येणार्‍या या रांगोळीत विशिष्ट रूपाने विष्णूचे पाय च‍ित्रित केले जातात.

दक्षिण भारतातील इतर राज्यात म्हणजे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात रांगोळी 'कोलम' या नावाने सजविले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी सजविण्यात येणार्‍या कोलममध्ये जरी थोडेफार अंतर असले तरी त्यामागील मूळ अर्थ मात्र एकसारखाच असतो. कोलम हे सममितीय आकारांमध्ये सजविले जाते. यासाठी तांदळाच्या पिठाचा उपयोग केला जातो. तांदळाची कणिक वापरण्यामागे त्याचे सहज उपलब्ध होणे यासोबतच मुंग्यांना खाऊ घालणे हा उद्देश असतो.

कोलमच्या निमित्ताने छोट्या जीवांना खाऊ घालणे ही येथील लोकांची यामागील धारणा आहे. वाळलेल्या तांदळाचे कणिक अंगठा व करंगळी यामध्ये ठेवून साच्यात टाकले जाते. येथील मुलींना लहानपणीच कोलम सजविणे शिकविले जाते. अगदी पहाटेच स्त्रिया कोलम सजवायला सुरूवात करतात. सजविण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू रहाते. सणांच्या दिवसात घराच्या दरवाजावर मोठ्या आकृत्या तसेच घरात लहान आकृत्यांनी कोलम सजविले जाते. व‍िशेष कोलम मध्ये आठ ते सोळा सफेद घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या रथावर असलेल्या सूर्याचे चित्र रेखाटले जाते.

या तर्‍हेचे चित्रांकन पोंगल व संक्रांतीला केले जाते. बाजारात कोलम सजविण्यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध असतात. या पुस्तकांच्या सहाय्यांने कोलममध्ये अनेक रंग भरले जातात.