रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (09:24 IST)

श्री लक्ष्मी कुबेर पूजा साहित्य, पूजन विधी आणि नियम

श्री लक्ष्मी कुबेर पूजा साहित्य
दोन ताम्रकलश (एक पूजेसाठी पाणी ठेवण्याचा, दुसरा लक्ष्मीपूजनाकरिता पाण्याने अर्धा भरलेला). 
केळीचे पान, तीन पाट (एक पूजेत ठेवण्यासाठी, एक पुरोहिताला बसण्यासाठी, एक स्वतः पूजकाला बसण्यासाठी), दोन आसने, लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीची व सरस्वतीची तसबीर, तीन ताम्हने (एक कलशावर ठेवण्यासाठी, एक फुले ठेवण्यासाठी, एक आचमनादि कार्यासाठी), पूजेचे पदार्थ ठेवण्यासाठी एक मोठे ताट, एक भांडे, एक पळी, तीन वाट्या (एक गंधासाठी, एक अक्षतांसाठी व एक मोठी तीर्थ ठेवण्यासाठी), समई, नीरांजन, धूपारती, कापूरारती, समईत तेलवात, निरांजनात तूप व फुलवात, उदबत्तीचे घर, उदबत्त्या, शंख, घंटा, शंखाची बैठक, पंचामृत, कुंकवाचा करंडा, रांगोळी, अत्तराची कुपी, नैवेद्य ठेवण्यासाठी मोठी पात्रे, दोन किलो तांदूळ, 
शुद्ध पाणी, उगाळलेले गंध, अक्षता, अबीर, सिंदूर, काड्यांची पेटी, हळदीकुंकू, धणे, गूळ-खोबरे, साखर- फुटाणे, साळीच्या लाह्या, बत्तासे, पेढे, गुलाबपाणी, अत्तरदाणी, विड्याची १० पाने, १० सुपार्‍या, २ नारळ, 
एक उपरणे, एक खण, गणपतीसाठी कापसाची दोन वस्त्रे, ब्राह्मणाला देण्याची दक्षिणा, पूजेत ठेवण्याच्या दक्षिणेसाठी सुटी नाणी, पूजनासाठी योग्य पात्रात दागिने, सोने नाणे, रत्‍ने, चांदीची नाणी, हिशेबाच्या नवीन संवत्सरांच्या वह्या, दौत, टाक, लेखणी, तराजू, वजनेमापे, दूर्वा, विविध प्रकारची फुले, फुलांच्या माळा, तोरणे, पताका, दिव्यांची रोषणाई, फटाके, आंब्याचे डहाळे, निर्माल्यासाठी परडी, देवीला रात्री निद्रेसाठी एक छोटा पाट.
 
पूजन विधी
दुकान, पेढी, कार्यालय, व्यवसायाची जागा किंवा घरी लक्ष्मी पूजन करावे. 
पूजास्थान स्वच्छ करावे.
पताका, पुष्पमाळा, तोरणे, आम्रपल्लव, विजेची रोषणाई याचे आरास करून ते स्थळ सुशोभित करावे. 
कुटुंबासह पूजा करावी. 
'लक्ष्मी' म्हणून नाणी, सोन्याचांदीचे दागिने, भांडी, पैसे देवासमोर मांडावे.
लक्ष्मी पूजनासाठी घेतलेली नाणी वर्षभर तशीच जपून ठेवावी, तसेच दरवर्षी यथाशक्ती त्यात भर घालून वाढ करावी. 
सरस्वती पूजनासाठी जमाखर्चाच्या वह्या, रोजकीर्दीच्या चोपड्या, इत्यादि साहित्य घेऊन नववर्षासाठी त्या उपयोगात आणावयाच्या म्हणून त्यांची पूजा करावी. 
त्यांच्या पहिल्या पृष्ठावर कुंकुममिश्रित गंधाने स्वस्तिक रेखाटावे. 
संवत्सर, तिथी, महिना यांचा तेथे उल्लेख करावा. ॥शुभ॥ ॥लाभ॥ असे लाल गंधाने त्या पृष्ठावर लिहावे. 
शाईच्या दौती, लेखणी, तराजू, वजने, मापे पूजेसाठी ठेवावी. 
पाटावर किंवा पानावर पसाभर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावं.
कलशात नाणी, फुले घालावे. 
कलशावर आंब्याचा टहाळा, त्यावर तबक, तबकात तांदूळ, तांदळावर कुंकवाने स्वस्तिक, त्यावर लक्ष्मीची मुर्ती आणि त्याच तबकात एक नारळ असे ठेवावे. 
पाटाच्या एका बाजूस थोडे तांदूळ ठेवून वर गणपती प्रतिकस्वरुप एक सुपारी ठेवावी. 
कलशासमोर दागिने, जमाखर्चाच्या वह्या ठेवाव्यात.
 
पूजा करण्यासाठी धूतवस्त्र किंवा रूढी असेल त्याप्रमाणे सोवळे नेसून, उपरणे खांद्यावर घेऊन, स्वतःला मंगल तिलक लावावा.
घरातील देवांना व वडील मंडळींना नमस्कार करून पुरोहिताचे स्वागत करावं. 
पाटावर आसन घालून त्यावर बसावं. 
आपल्या जवळच गुरुजींचं आसन असावं. 
पूजकाने डाव्या हातास पाण्याचा तांब्या, समोर ताम्हन, पळीभांडे, देवाजवळ समई लावलेली, उदबत्ती, निरांजन, शंख, घंटा यांच्या जागी ते ते ठेवावे. 
मग आचमनादि कर्मे करून पूजेस प्रारंभ करावा.