Deepavali 2013 Marathi | फटाक्यांची दिवाळी आता अक्षरांची
WD |
WD
अशा फटाक्याच्या-फराळाच्या वातावरणात परगावी नोकरीला असलेला भाऊ न चुकता विनोदी दिवाळी अंक 'आवाज' घेऊन यायचा. त्यातली विनोदी चित्रे बघून मजा वाटायची. पुढे माझं लेखन दिवाळी अंकातून प्रकाशित होऊ लागले. जून महिन्यापासूनच आता दिवाळीची चाहूल लागते. कारण दिवाळी अंकांच्या संपादकांची पत्रे यायला सुरुवात जूनपासूनच होते. आजकाल वेगवेगळे पदार्थ वर्षभर खायला उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांचे कौतुक उरले नाही.
फटाके उडवणे तर पूर्णपणे थांबले आहे. शुभेच्छापत्रांचा मात्र अजून शौक आहे. मी स्वतःसाठी शुभेच्छापत्र छापत नाही. कारण शुभेच्छापत्र द्यायची ठरवली तर हजारात छापावी लागतील. तरीही मित्रांचा, स्नेह्यांचा गोतावळा संपणार नाही. म्हणून मी भावासाठी व एका स्नेही मित्रासाठी दरवर्षी नवीन कल्पना लढवून शुभेच्छापत्र तयार करतो. माझ्या कवितांना सजवून धजवून दिवाळी अंक घेऊन येतात.
दिवाळीनंतरही अंक येणे सुरूच असते. घरात दिवाळी अंक जमायला लागतात. काय वाचू नि काय नको असे करताना बरेच चांगले वाचायचे राहूनही जाते पण दिवाळीच्या निमित्ताने खूप चांगले वाचायला मिळते. कविता वाचून कुणी तरी फोनवर किंवा पत्रातून कळवतं. एखाद्या वेळी कविता आवडल्याचा विजय तेंडुलकर, विजया राजाध्यक्ष, अमर हबीब, वसंत आबाजी डहाके, प्रशांत दळवी, सुकन्या कुलकर्णी, विश्वास पाटील, विजय पाडळकर, मधुकर धर्मापुरीकर, नरेंद्र लांजेवार, अशोक जैन, अशा ज्येष्ठांचा अचानक फोन येतो. मग तर दिवाळी रोशन होते. एकूण काय तर फटाक्यांची दिवाळी अक्षरांची कधी झाली हे मलाही कळले नाही. अंधाराला दूर सारणार्या दिव्यांची पूजा करण्याची कल्पनाच मला कवितेसारखी वाटते. यानिमित्ताने अक्षरांचा हा प्रपंच होतो म्हणून दिवाळी मला महत्त्वाची वाटते.
