शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. वाचकांची पत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (21:47 IST)

कोरोना निर्बंधांचे पालन करून गणेशोत्सव व्हावा साजरा, तिसऱ्या लाटेचे भान ठेवा

गणेशोत्सव साजरा करतांना कोरोना निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर व सॅनिटायझर या कोरोना त्रिसूत्रीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आणि तिसऱ्या लाटेचे भान ठेवूनच जनजीवन सुरू राहावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. 
 
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गणेशोत्सव काळात महानगरपालिका व पोलीस यंत्रणांकडून आवश्यक सर्व परवानगी घेणे गरजेचे आहे या यंत्रणांनी देखील सुलभ पद्धतीने परवानगी देणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव सुरळीत पार पडावा याकरीता नागरिकांनी सुध्दा गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री  भुजबळ यांनी यावेळी केले.
 
जिल्ह्यात प्रस्तावित असणाऱ्या 24 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांपैकी 5 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. दिलेल्या मुदतीत प्रकल्पांचे काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.